महाराष्ट्रातले लोक डी. एड. करणे आणि इस्टेट एजंट बनणे या दोन करिअरना सर्वाधिक पसंती देतात असा माझा अनुभव आहे. या करिअरना असलीच तर स्पर्धा फक्त कवी बनणे या करिअरची आहे. मध्यंतरी नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, नागपूर, पिंपरी चिंचवड, पनवेल या शहरांत अचानक लोकांना गाठून त्यांचे खिसे तपासले तेव्हा १० पैकी ९ जणांच्या खिशात लोकांच्या विकायला काढलेल्या जमिनींचे सात-बाराचे उतारे होते. आणि ज्या एकाकडे नव्हता, त्यानेही सांगितले की, दहा मिनिटांत उतारा आणून देतो. अख्खे शहरच इस्टेट एजंट या एकमेव व्यवसायात आहे की काय अशी शंका यावी अशीच ही परिस्थिती आहे. लोकांच्या जमिनी विकण्याची इस्टेट एजंटची तीव्र ओढ मला नेहमीच थक्क करून टाकते. अशीच तीव्र ओढ मला कविलोकांमध्ये आढळते. एखादा सराईत इस्टेट एजंट जसा तुम्हाला गरज असो-नसो, त्याच्याकडच्या जमिनीचे कागद तुम्हाला दाखवतो; तसा सराईत कवी तुम्हाला त्याची कविता वाचून दाखवतोच.

मानवी प्रज्ञेने अनेक अशक्यप्राय गोष्टींचे शोध लावले. त्यातल्या थोडय़ा गोष्टी माणसाला उपयोगाच्या होत्या. बऱ्याचशा फुटकळ आणि अनावश्यक गोष्टींचे शोध लावण्यात बरीच मानवी प्रज्ञा खर्च होते याची मला नेहमीच काळजी वाटते. हल्ली एक मशीन निघाले आहे, जे वापरले की आपल्याला घरच्या घरी आपले ब्लड प्रेशर किंवा शुगर तपासता येते. बाहेर कोणाकडे जायची आणि विचारायची गरज पडत नाही. असेच एखादे मशीन शोधायला हवे, की जे आपण बोगस कविता लिहिली आहे हे घरच्या घरी कवींना सांगू शकेल. आणि त्यासाठी त्यांना कवी संमेलनात जाण्याची किंवा इतरांना पकडून कविता ऐकवण्याची गरजच पडू नये. भिकार कविता लिहिण्यापासून तर आपण लोकांना रोखू शकत नाही. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे आपण कोणालाच कशाहीपासून रोखू शकत नाही. पण जर त्यांचे त्यांनाच आपोआप मशीनद्वारे कळले, आणि जर त्यांनी एश्ट मशीनवर पडलेला उमेदवार दाखवतो तसा अविश्वास दाखवला नाही, तर खूप साऱ्या बोगस कविता ऐकण्याच्या त्रासापासून अनेक जणांची सुटका होईल. आपण महाराष्ट्रीय लोक फटकळ आहोत. आपण जे काय आहे ते तोंडावर बोलून टाकतो. आपण कोणाच्या बालाही कधीच भीत नाही. पण या स्पष्ट बोलायला जे काही अपवाद आहेत, त्यात आपण तोंडावर एखाद्याला ‘तू भिकार  कविता लिहिली आहेस,’ हे सांगू शकत नाही. त्यामुळे त्याची भीड चेपते. आणि ज्या अर्थी आपण हे भिकार आहे असे म्हणालो नाही, त्या अर्थी ते महान असणार असे समजून कवी वारंवार भिकार लिहीत राहतो आणि ऐकवतही राहतो. आणि आपण काहीही करू शकत नाही.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

एखादा सराईत पाकीटमार जसा भर गर्दीतूनही बरोबर ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला हेरतो आणि ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचेच पाकीट मारतो, तसे कवी मला भरगर्दीत हेरतात आणि डाव साधतात. माझ्या चेहऱ्यातच काहीतरी दिव्य असे आहे, की त्यांना मीच भिकार कविता ऐकवायला योग्य माणूस आहे असे वाटत राहते. मी भिकार कविता ऐकण्यात जेवढा वेळ वाया घालवलाय तेवढा जर एखाद्या मूलभूत कामाला दिला असता तर चार-दोन नोबेल आत्तापर्यंत माझ्या नावावर असती. पण मी कविता ऐकून घेतो, भीड पडते म्हणून तिला वाईट म्हणत नाही. आणि मग लोक वारंवार मला त्यांच्या भिकार कविता ऐकवत राहतात. बरे, जो येतो तो ‘तुला माझ्या काळजातल्या काही ओळी ऐकवतो,’ असे म्हणून सुरुवात करतो. आता तुझ्या काळजातून फार कंटाळवाणे आऊटकम आलेय, हे सांगायलाही भीड तर पडतेच ना! मी पूर्वी एकदा एकाला हिंमत करून ‘अरे, तुला अजिबात कविता लिहिता येत नाहीये.. तू दुसरे काहीतरी कर,’ असे सांगितले होते. तर त्याने ‘तुम्ही प्रस्थापितांनी ज्ञानेश्वरांचेही हाल केले. तुकोबाच्या गाथाही तुम्ही पाण्यात बुडवायला निघाला होतात. पण कवितेचा सच्चा स्वर कधी दबत नसतो. तुम्ही जेवढा उपहास कराल, तेवढा कवितेचा हुंकार उफाळून प्रकट होईल,’ असा मलाच वर दम दिला. मी मनापासून घाबरलो. मला धोका लगेच लक्षात आला. मी विनातक्रार भिकार कविता ऐकत राहायचं ठरवलं.

मी कवी इंद्रजीत भालेरावांचा चाहता आहे. शहरात राहणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणांना ग्रामीण भागातले नातेसंबंध, त्यातली श्रीमंती, शेतकऱ्याची मूल्यव्यवस्था आणि दुष्काळाचे कराल रूप त्यांनी दाखवले आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातल्या भगभगीत उन्हाच्या वर्णनाने वातानुकूलित खोलीत माझ्यासारख्यांना घाम फोडला. पण आता इंद्रजीत भालेरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण आणि दुष्काळी कविता लिहिणाऱ्यांनी वात आणलाय. शेतकरी जितक्या आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात, तितक्या आतुरतेने काही कवी दुष्काळाची वाट पाहत असतात की काय, असे वाटायला जागा आहे. मधे तर एकदा धो-धो पावसात मराठवाडय़ात दुष्काळी कवितांचे संमेलन झाल्याची माझी माहिती आहे. दुष्काळ हटल्याची शासनाने जेव्हा घोषणा केली तेव्हा अनेक ग्रामीण कवींच्या चेहऱ्यावरची चिंता हटत नव्हती. दुष्काळ हटल्यावर जनावरांच्या चारा छावण्यांचे किंवा टॅँकरचे ठेकेदार यांना जसे हताश वाटते, तसे भाव घेऊन अनेक ग्रामीण कवी फिरत होते.

मराठवाडय़ात तर एकूण लोकसंख्येपेक्षा ग्रामीण कवी जास्त असावेत असा माझा अंदाज आहे. कारण अनेक कवी मला असे माहिती आहेत- जे स्वत:च्या नावानेही कविता लिहितात आणि टोपणनावानेसुद्धा कविता करतात. त्यामुळे एकूण लोकसंख्येपेक्षा कवींची शिरगणती जास्त भरते. ग्रामीण भागावर शहरी नेते अन्याय करतात, असा एक सर्रास आरोप केला जातो. ग्रामीण कवी हे त्याचे कारण आहे का, याचा कधीतरी अभ्यास व्हायला हवा. जी गोष्ट ग्रामीण कवींची, तीच गोष्ट विद्रोही कवींची. ढसाळांनी विद्रोही कविता लिहिल्यावर विद्रोही आणि धाडसी कवितांचे पीक फोफावले. एकाने तर बाराखडीत अ ते ज्ञ जितक्या शिव्या असतील तितक्या अश्लील शिव्या सलग लिहून काढल्या आणि मला म्हणून दाखवल्या. मी चिडलो आणि म्हणालो, ‘शिव्या का देतोस?’ तर म्हणाला, ‘शिव्या कुठे देतोय? मी तर कविता वाचतोय.’ मी कविता ऐकताना संकोचलो. पण तो वाचताना संकोचला नाही. मी म्हणालो, ‘अरे, जरा सभ्य भाषेत तरी लिहायचे.’ तर तो म्हणाला, ‘अंत:करणातली धग अशी धूर बनूनच बाहेर पडणार. आमच्यावर अन्यायच असा झालाय, की त्याच्या अभिव्यक्तीला कसले सभ्य-असभ्यतेचे नियम लावतोस?’ मी पुन्हा एकदा आता काय बोलणार, अशा अवस्थेत गेलो. पूर्वी एखाद्यावर कुठे अन्याय वगैरे झाला तर मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायची; आता दहशत वाटते. एखाद्याच्या मनाची आपल्यावर अन्याय झालाय अशी नुसती समजूत जरी झाली, तरी तो उचलला पेन लावला कागदाला असे करतो. आणि मग त्यातून जी अभिव्यक्ती होते त्याने दहशतच बसते.

कवींना आपली कविता काय दर्जाची आहे, हे कळणारे मशीन जसे असायला हवे, तसेच कोणी कविता ऐकवायची याचेही काही मापदंड असायला हवेत. सध्या साक्षर असणे हे कवी बनण्यासाठी पुरेसे आहे. त्यात बदल करून ग्रामपंचायत किंवा नगरपालिका पातळीवर कवींसाठी जसे मद्यपानासाठी असते तसे वेगळे परमिट देता येते का, यावर विचार व्हायला हवा. शासनाने काहीजणांना कविता ऐकण्यासाठी पगार द्यावा, गावाबाहेर त्यांच्यासाठी वेगळी सोय करावी आणि तिथे एखाद्याला कविता झाली तर शुल्क भरून त्याला ती ऐकवता येईल अशी व्यवस्था करावी. आणि त्यांनी जर पास केले तरच त्या कवींना गावभर कविता ऐकवायला सोडावे, अशी माझी सूचना आहे.

खूप साऱ्या भिकार कविता वारंवार ऐकायला लागतात याने माझा सात्त्विक संताप होतो. असे म्हणतात की, खाणीमध्ये खूप सारा गाळ उपसला की कधीतरी हिरा हाती लागतो. खूप साऱ्या भिकार कविता ऐकल्यावर कधीतरी वीज चमकून जावी तशी एखादी लखलखीत कविता हाती लागते, हेही सत्यच आहे. तुम्हाला जर भिकार कविता ओळखायचे मशीन बनवता येणार नसेल, चांगल्या कवींना परमिट देण्याची व्यवस्था करता येणार नसेल, तर भिकार कवितांचा गाळ उपसून हिरा सापडण्याची वाट बघत बसण्याशिवाय आपल्या हाती दुसरे काय उरते?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com