एकेक करीत आपले महाराज, बाबा तुरुंगात जाताहेत. यामागे काहीतरी आंतरराष्ट्रीय षडयंत्र असले पाहिजे असे मला आजकाल वाटायला लागले आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर भारत जर पाश्चिमात्य लोकांच्या पुढे निघून गेला तर ज्या राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध दुखावले जातील, त्यांचाच हा कुटिल डाव असला पाहिजे. वेगवेगळे महाराज आणि त्यांचे चित्रविचित्र पंथ ही भारताची राष्ट्रीय विरासत आहे. या विरासतीच्या जिवावर तर ‘आपल्याकडे सगळेच ज्ञान पूर्वी होते’ हे आपण बिनधास्त सांगू शकतो. आपल्या भव्य-दिव्य आध्यात्मिक परंपरेचा एक प्रवाह असलेले हे महाराज व बाबा हल्ली गजाआड जायला लागलेत, हे अतीव दु:खाचे आहे.

गेल्या दहा वर्षांत मिळून आपले छोटे-मोठे सुमारे ७० बाबा आणि महाराज कोणत्या ना कोणत्या कारणाने तुरुंगात गेले आहेत. त्यातले बहुतांश बलात्काराच्या गुन्ह्य़ांत गजाआड गेले आहेत. आणि त्या बहुतांशांतील बहुतांश हे आपल्या शिष्य महिलेला अनुग्रह देण्याच्या गुन्ह्य़ाखाली गजाआड आहेत, हे मोठेच खेदाचे आहे.

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये जवळजवळ प्रत्येक प्रापंचिक समस्येवर काही ना काही तोडगे सांगितलेले असतातच. त्यातल्या दिव्य अनुग्रह दीपिका, स्कंध सोळामध्ये अनुग्रहाचे विविध प्रकार सांगितले आहेत. आपल्या भक्तांना कशा आणि कोणत्या प्रकारे अनुग्रह केला जाऊ  शकतो याचे तपशीलवार वर्णन यात केले आहे. त्यातल्या शयनानुग्रहाने आपल्या शिष्यांचे कल्याण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराजांना नंतर थेट तुरुंगात टाकले गेले, हे मोठे अन्यायाचेच आहे.

नुकतेच न्यायालयाने बाबा राम रहीम यांना आपल्या आश्रमातील साध्वींवर अनुग्रह केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा ठोठावली. ही बातमी वाचल्यावर मी खूप दुखावला गेलो आहे. मागेही जेव्हा संत आसारामबापू यांना पोलिसांनी उचलून नेल्याची दृश्ये मी पाहिली होती तेव्हाही असाच दुखावला गेलो होतो. इतके मोठे संत हे न्यायालयाच्या न्याय करण्याच्या कक्षेबाहेर असले पाहिजेत. या महाराजांच्या अनुग्रहांना अत्याचार समजण्याइतकी नादान आपली न्यायव्यवस्था आहे. आपल्या विद्वत्तेने प्रचंड मोठय़ा समूहावर गारुड करणाऱ्या आणि वेळ पडल्यास मोठय़ा संख्येने अनुयायांना रस्त्यावर उतरवण्यास सक्षम असलेल्या या सगळ्या संतांना न्यायालयाच्या आदेशाच्या कक्षेबाहेर ठेवले पाहिजे. सामान्य लोकांसाठी न्यायालये, संसद, पोलीस, कायदे वगैरे सारे आहे. अशा मोठय़ा संतांचा तुमच्या-माझ्यासारख्या लोकांना लागू असलेल्या फडतूस कायद्याशी काय संबंध? त्यांना परमोच्च ईश्वराचे नियम आणि कायदे लागू आहेत. त्यांच्या एकेक लीला जरी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की हे वाण सामान्य नाही.

बाबा रामरहीम यांच्या अटकेने एका मोठय़ा मौल्यवान नररत्नाला आपण २० वर्षांसाठी गजाआड टाकले आहे. ‘शेर दहाडते है तो कापते हुए गिद्धड गिरते है! हम तो वो हैं- जो शेरो के मूंह में हाथ डाल के उनके दात गिनते है!’ बाबा रामरहीम यांच्या एका चित्रपटातला हा डायलॉग आहे. आता असले डायलॉग असलेले सिनेमे आपल्याला पुढची वीस वर्ष बघायला मिळणार नाहीत. बाबा रामरहीम हे आता जेलमध्ये गेलेत म्हणून, अन्यथा त्यांचा प्रत्येक पिक्चर त्यांनी ऑस्करसाठी पाठवला होता. ऑस्करने त्यांचा चित्रपट स्वीकारला नाही, इतकेच. इथून पुढेही प्रत्येक पिक्चर ते ऑस्करसाठी पाठवणार होते. आता त्यांच्या या मिशनचे काय होणार याची मला मोठीच काळजी लागून राहिली आहे. दरवर्षी पाच तरी पिक्चर बनवायचे असा रामरहीम बाबांचा निर्धार होता. शेवटचा एक पिक्चर तर त्यांनी कल्पना सुचल्यापासून एडिट होऊन पूर्ण तयार होईपर्यंत २९ दिवसांत सगळा खेळ संपवला होता. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवरचा हा चित्रपट. सर्जिकल स्ट्राइकच्या बातम्या आल्या आल्या त्यांनी तो बनवायचे ठरवले. ‘पण आमचा संशोधनात खूप वेळ गेला,’ अशी बाबांची तक्रार होती. मला खात्री आहे, नाहीतर त्यांनी पाच-सहा तासांत तो साडेचार तासांचा पिक्चर बनवला असता. ‘हिंद का नापाक को जवाब’ असे या नेत्रदीपक चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे कथानक जे मला लक्षात आले ते सांगतो. कदाचित ते संपूर्ण वेगळेही असू शकेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबा रामरहीम इन्सान आणि त्यांची मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान अशा दोघांनी केलेले आहे. त्यामुळे माझा असा वहीम आहे, की बाबा रामरहीमला काहीतरी वेगळे दाखवायचे होते आणि हनीप्रीतला काहीतरी वेगळे सांगायचे होते. दोघांनी पिक्चर वेगवेगळा शूट केला आणि नंतर जोडून टाकला. हाय काय आणि नाय काय! तर बाबा रामरहीम सैन्यात कमांडो असतात किंवा तेच बहुतेक सैन्यदलप्रमुखही असतात.

ते पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करायचे ठरवतात आणि शपथ घेतात, की ते संपूर्ण लग्नाची वरात घेऊन पाकिस्तानला जातील, वरात थोडा वेळ वाट बघेल. तितक्यात ते सैन्य घेऊन पाकिस्तानवर हल्ला करतील आणि त्यांचा नि:पात करतील. मग त्याच वेळेला त्यांची मानलेली मुलगी- जी पण एक महिला कमांडो आहे, ती दुसऱ्या एका कॅम्पवर हल्ला करेल आणि त्यांच्या तावडीत असलेल्या त्यांच्याच देशातल्या मुली, ज्या फावल्या वेळात विकणे हा तिथल्या कर्नलचा गृहउद्योग आहे त्यांची सुटका करेल. ‘बेटीया तो बेटीया होती हैं, चाहे वो हिंदुस्थान की हो या पाकिस्तान की’ अशा एक अप्रतिम संवादाने ती भारतातल्या करोडो लोकांना माहीत झाली असा तिनेच दावा केलाय आणि मग बापाने पाकिस्तानचा कॅम्प जाळला, मुलीने दुसऱ्या एका कॅम्पमधल्या मुलींची सुटका केली, की मग लांबून इतका वेळ पाकिस्तानात लपून राहिलेले बाया बापडय़ा, म्हातारेकोतारे असे सगळे वऱ्हाडी पळत पळत येतात आणि मग रामरहीमचे तिथे लग्न होते आणि मग वऱ्हाडी लग्नाचा शकुन म्हणून एक ‘अणुबॉम्ब’ पटकन तिथेच फोडतात.. अशी काहीतरी चित्रपटाची कथा असल्याचा माझा समज आहे. याच चित्रपटात रामरहीम बाबा एक रिक्षाच्या आकाराचे गुलाबी रंगाचे हेलिकॉप्टर घेऊन निघतात आणि एकटेच पाकिस्तानमधले अनेक लोक टिपून टिपून मारतात, हा शॉट तर अनुभवण्याचीच गोष्ट आहे! यावेळेला एक गाणे सुरू होते, ‘ढोल बाजे हो बाजे नगाडा, चारो तरफ हो री झिलमिल झिलमिल, इज्जत का रखवाला शेरदिल शेरदिल’- ट्रॅक्टरचे मागचे मोठे टायर उचलून बाबा या गाण्यात जे नाचलेत त्याला तोड नाही! या चित्रपटात बाबांनी जितके पाकिस्तानी मरताना दाखवलेत तितकी मुळात पाकिस्तानची लोकसंख्या तरी आहे का, याबद्दल मला शंकाच आहे.

‘एमएसजी- द मेसेंजर ऑफ गॉड’, ‘लायन हार्ट १ आणि २’, ‘जट्टू इंजिनीअर’ हे आणि असे चित्रपट म्हणजे रामरहीम बाबांच्या प्रतिमेला आलेली फुलेच. पहिल्या चित्रपटात बाबांनी हीरो, डायरेक्टर, गीतलेखक आणि पटकथा लेखक अशा भूमिका वठवल्या होत्या. नंतर माध्यमाची भीड चेपल्यावर त्यांनी शेवटच्या चित्रपटात एकूण ४२ भूमिका वठवल्या होत्या आणि हनीप्रीतने २६. एका चित्रपटात जॅकी चेनने १६ भूमिका वठवल्याचा विश्वविक्रम होता, तो बाबा आणि त्यांच्या कन्येने तोडला. या रामरहीम बाबाचे सगळे सिनेमे सुपरहिट आहेत. आपल्यावर परमेश्वराने गुणांची उधळण केली आहे, असा बाबांचा दावा होता. त्यांनी विराट कोहलीला क्रिकेट शिकवले होते, एकूण ३२ खेळांमध्ये त्यांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते आणि १६ खेळांसाठी ते राष्ट्रीय कोच होते, असा त्यांचा दावा आहे. ते गाडय़ा डिझाइन करायचे, ते इंटेरियर डिझायनर होते, कवी होते, तत्त्वज्ञ होते, रॉकस्टार होते, संगीतकार होते आणि स्वत:चे कपडे स्वत:च डिझाइन करायचे. त्यांनी स्वत:साठी डिझाइन केलेली एक भडक पिवळ्या रंगाची पॅन्ट ज्यावर जांभळी आणि लाल गुलाबाची शे-दोनशे फुले आहेत ती तर जागतिक महत्त्वाचा ऐवज म्हणून सांभाळून ठेवायला हवी. मी तेव्हाच बाबांचे वेगळेपण जाणले होते जेव्हा त्यांनी मध्यभागी ताजमहाल आणि त्याच्या चार मिनारच्या जागी बुर्ज खलिफा असलेला शर्ट घालून पत्रकार परिषद घेतली होती. आज हा जागतिक महत्त्व असलेला माणूस २० वर्षांसाठी गजाआड गेला आहे.

आठवा आसारामबापूंना.. होळीच्या दिवशी फायर ब्रिगेडचा बंब बोलावून आपल्या भक्तांवर ते रंग उधळायचे तेव्हा काय दिसायचे! एकदा ते डोक्यावर मोरपीस लावून आले होते, तेव्हा तर साक्षात कृष्ण प्रगट झाल्याचा साक्षात्कार होत होता. थुईथुई नाचत जेव्हा ते भजन म्हणायचे तेव्हा भक्त पागल होऊन जायचे! आज तेही कोणत्या तरी मूर्ख शिष्येने मनाविरुद्ध अनुग्रह का दिलात म्हणून गुरूविरुद्ध तक्रार केली म्हणून तुरुंगात आहेत. कायद्याची प्रत्येक लढाई आसारामबापू हरले. त्यांचा मुलगाही गजाआड गेला. पण त्यांच्या भक्तांना आजही असेच वाटते, की काहीतरी कट रचून बापूंना अटक झालीये. दुसऱ्या एक होर्डिगेश्वरी माता एकदा एअरपोर्टवरच बेभान होऊन भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. त्यांना कायमच नशेत ठेवतात, ज्यामुळे त्या आशीर्वाद देण्यालायक राहतात म्हणे!

ज्ञानेश्वर, तुकाराम, बुद्ध नाही सांभाळले तरी चालेल, पण या असल्या बाबा आणि बाई लोकांची विरासत सांभाळली गेलीच पाहिजे. किंबहुना आपल्याच लोकांच्या खांद्यावर ही विरासत उभी आहे. आपल्याला मुक्ती हवी आहे, आपल्याला मोक्ष हवा आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला तो इन्स्टंट हवा आहे. पूर्वी सत्याच्या शोधात लोक हिमालयात जायचे, गुरूची सेवा वगैरे करायचे. ही असली लचांडे आता कोण मागे लावून घेणार? गुरूच्या शोधात आपण कुठेच जाणार नाही आता, तर गुरूच पूर्वी कसे गावोगाव सर्कशीचे प्रयोग लागायचे तसे सत्संगाचे प्रयोग लावेल आणि तिथे आपण सत्याच्या शोधात सोवळे नेसून जाऊ . तिथेही जायचा कंटाळा असेल तर गुरू कोणत्यातरी चॅनेलवर लाइव्ह येईल आणि आपल्याला दर्शन देईल. दोन मिनिटांत एकीकडे नूडल्स तयार करत असताना दुसरीकडे सत्याचे आकलन! सगळा कसा झटपट मामला. आपल्याला सुरेल गाणे कुठे ऐकायचे आहे? आपल्याला आयटम साँग ऐकायचे आहे. आजचे जवळजवळ सगळे आध्यात्मिक गुरू आयटम गर्ल बनून नाचताहेत. आपलेही मन त्यातच तर लागते आहे.

आपले कोणते तरी गुरू पकडले गेलेत! निष्पक्ष तपास झाला तर तपासाचे धागेदोरे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील. आपल्या खांद्यांवर यांच्या पालख्यांच्या दांडय़ाचे वळ सापडतील.

चला तर मग! आता आपण न्यायालयाच्या निर्णयांवर शंका घेऊ या. गावागावांत निदर्शने करू या. गुरूच्या डीएनए रिपोर्टचे जरी पुरावे असतील तरी ते नाकारू या. दुसऱ्या कोणत्या तरी धर्मातले गुरू आपल्यापेक्षा संख्येने चार टक्के कमी पकडले गेले असतील तर आपण त्याचीच चर्चा करू या. सरकार बदलवू या. वर्तमानपत्रे पेटवू या. पोलिसांना मारहाण करू या. न्यायाधीशांच्या मुलीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकू या.

आपण गाढवाला मोक्षाचा मार्ग विचारला. ते आपल्याला उकिरडे फुंकायला घेऊन गेले. आता आपण कचऱ्याच्या मध्यभागी आहोत आणि गाढव पसार आहे. आपण उकिरडय़ाच्या मध्यभागी आहोत, हे जाणवले तर काही परिस्थितीत सत्याच्या मार्गावरचा प्रवास सुरू होईल आणि उकिरडय़ाबाहेर पडता येईल.

अन्यथा.. जय हो, जय हो!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com