१९८८ साल असावे. ते तिसऱ्या महायुद्धाचे दिवस होते. मला आजही नाशिक शहरातला तो भयाण दिवस आठवतो. रशियन फौजा संगमनेपर्यंत आल्या होत्या. जर्मन फौजा कधीही कसारा घाट चढतील आणि इगतपुरीच्या दिशेने कूच करतील अशी शक्यता होती. शहराच्या मुख्य रस्त्यावरून रणगाडे फिरत होते आणि वातावरणातील तणाव वाढवत होते. स्कूलबसचा कुठे पत्ताच नव्हता. त्यामुळे घरी कसे जायचे, या विवंचनेत मी आणि माझे मित्र शाळेबाहेर उभे होतो. शेवटी मीच धाडस केले. (मी पूर्वीपासूनच धाडसी आहे. आणि संकटाला अजिबात डगमगत नाही.) तेव्हापासूनच माझे मित्र मला ‘डेअर डेव्हिल’ म्हणतात. मी एका रणगाडय़ाला हात दाखवला आणि ‘नाही तरी रिकामाच आणि विनाकारणच फिरतो आहेस, तर मला आणि माझ्या मित्रांना इंदिरानगरला सोडतोस का?’ असे विचारले. तो ‘हो’ म्हणाला. आम्ही सिटी बसच्या भाडय़ापेक्षा जास्त पैसे देऊ  शकणार नाही, असेही बजावून सांगितले. रणगाडा या वाहनाविषयी माझा त्यावेळी जो भ्रमनिरास झाला तो आजही कायम आहे. फक्त एका माणसाला मान वर काढून बघता येते. बाकी आम्ही सगळे गाडीच्या डिकीत सामान भरल्यासारखे त्याच्या पोटात बसलो होतो. नंतर कळले, की आम्हाला लिफ्ट देणारा रणगाडा हा मुळात गस्त घालतच नव्हता. त्याला बटाटे आणायला गंगेवर पाठवले होते. पुढचे तीन-चार दिवस जर युद्धाच्या भयाने स्कूलबस सुरूच होणार नसतील तर आम्हाला शाळेत सोडायला आणि न्यायला येशील का, असे आम्ही रणगाडा चालकाला विचारले. त्यावर त्याला युद्धासाठी कधीही बोलावणे येऊ  शकते, त्यामुळे नक्की सांगता येणार नाही, असे तो म्हणाला.

माझी बहीण आणि तिच्या मैत्रिणी बंकरमध्ये बसून होत्या. त्यांनी बंकरमध्ये पाव लपवले होते. मी आणि माझ्या मित्रांनी त्यांनी लपवलेले पाव हिसकावून घेऊन खाल्ले. युद्धामुळे सगळ्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. पाव तर अजिबात मिळायचे नाहीत. खरं तर ते पाव माझ्या बहिणीचे होते. पण मी भुकेने कासावीस झालो होतो. पोट भरल्यावर मला रडू यायला लागले. आपण पाव खाताना आपल्या बहिणीचा विचारदेखील केला नाही म्हणून मी कासावीस झालो. माझी बहीण म्हणाली, ‘दादा, रडू नकोस. हे दिवसही जातील. आपली परिस्थिती पालटेल.’ तिचे म्हणणे खरे ठरले आणि आम्ही दोघेही आज या मोठय़ा पदाला येऊन पोहोचलो आहोत. पण तेव्हाचे दिवस फारच भीषण होते.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

आमच्याकडे एक मार्गारेट नावाची गाय होती. सगळीकडे बॉम्बवर्षांव सुरू झाल्यावर तिला गडगडाटात घाबरायला व्हायचे म्हणून आम्ही तिला आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत नेऊन बांधले होते. मी आणि माझा भाऊ  जेव्हा तिला तीन मजले जिन्याने ओढत नेत होतो तेव्हा तिने प्रतिकार केला. पण माझ्या भावाने मोठय़ा चतुराईने तिला वर नेलेच. माझा भाऊ पण मोठा होऊन खूपच मोठा झाला. आम्ही जेव्हा मार्गारेटला गॅलरीत नेऊन बांधले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता दाटून आली. तिने कृतज्ञतेने माझ्या बहिणीचे गाल चाटले.  तिला उरापोटावर ढकलत मी आणले; आणि ती माझ्या बहिणीशी कृतज्ञ झाली म्हणून माझा भाऊ रुसला होता. पण तेव्हा त्याला आयुष्यातला एक महत्त्वाचा धडा मिळाला, की जो कष्ट करतो त्याच्याशी कृतज्ञ राहण्यात कोणालाच- अगदी जनावरांनाही इंटरेस्ट नसतो. तुमच्या हाताला घट्टे  पडले म्हणून तुमचे गाल चाटण्याच्या लायकीचे होत नाहीत. असे कितीतरी प्रसंग आहेत. काय काय सांगणार आणि काय काय लिहिणार? मी रस्त्यावरच्या दिव्याखाली भरपूर वेळा बसून अभ्यास केलाय. अनेकदा तर मी दिवसादेखील दिव्याच्या खांबाखाली अभ्यासाला बसायचो. तेव्हा कोणीतरी अफवा पसरवली होती, की रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला की चांगले मार्क पडतात. आणि नाही पडले, तरी नंतर लोकांना सांगायला भारी वाटते. मी पुढे जाऊन खूप मोठा व्हायचे ठरवलेच होते. त्यामुळे मी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचा कधीच कंटाळा केला नाही. ‘दिव्याखाली मंदार’ म्हणून खूप लोकांनी माझी हेटाळणी केली. लोकांनी माझी हेटाळणी केली की मला खूप हायसे वाटायचे. खूप मोठय़ा लोकांना बालपणी लोकांच्या हेटाळणीला सामोरे जावे लागले. ज्या अर्थी आपली हेटाळणी होतेय त्या अर्थी आता आपण नक्कीच मोठे होणार याची मला, माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला खूपच खात्री होती. या रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करता करताच कधीतरी आपल्याला दिव्य ज्ञान होईल आणि हा खांब ‘कल्पखांब’ म्हणून ओळखला जाईल याची मला खात्रीच होती. माझ्या सहस्रचंद्रदर्शनापर्यंत रस्तारुंदीकरणात जर महापालिकेने हा खांब काढून टाकला तर जगातला किती मोठा ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, या कल्पनेने मला खडबडून जाग आली आणि वास्तवाची मला जाणीव झाली. आपले बालपण जराही खडतर नव्हते. आपण खाऊन-पिऊन सुखी होतो. आपल्याला कोणीच छळले नाही. आणि आपली व आपल्या भावंडांची कधीच अन्नान्नदशा झाली नाही. त्यामुळे माझ्या आणि माझ्या भावंडांच्या थोर होण्याच्या सगळ्याच शक्यता धुळीला मिळाल्याचे लक्षात आले. आणि मग अशा परिस्थितीत माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहोळ्यात आपल्याला आपल्या बालपणाबद्दल अगदीच काहीतरी सपक बोलावे लागेल, हेही माझ्या लक्षात आलेय.

खूप खूप मोठे झाल्यावरही आणि आयुष्यातले अनेक पावसाळे भिजून झाल्यावरही ज्यांना अजून बालपणातले चटकेच आठवतात त्यांचे मला भारीच अप्रूप वाटते. इतक्या मोठय़ा आयुष्याचा प्रवाही प्रवास पुरा केल्यावरही रस्त्यात कधीतरी लागलेला भोवराच लोकांच्या लक्षात का राहत असावा? एखाद्या सुरेल गाण्याची सीडी कुठेतरी अडकावी आणि त्यातून फक्त रडगाणीच ऐकायला यावीत, तसे आजकाल अनेकदा यशस्वी माणसांच्या मुलाखती ऐकताना, त्यांचे आत्मचरित्र वाचताना किंवा त्यांच्याशी बोलताना वाटत राहते. महाराष्ट्रातले काही ख्यातकीर्त अजूनही आपल्या बालपणातल्या खडतर काळातल्या गोष्टी सांगून लोकांना वात आणतात. आता त्यांचे बालपण आणि खडतर काळ त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊनही साठ वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. पण अजूनही त्या खडतर काळाच्या कहाण्या त्यांना सांगाव्याशा वाटतात. आयुष्याचा पट किती मोठा! अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यातही किती रंगीबेरंगी घटना घडतात. रोज दिवस नव्या उत्साहाने उगवतो. आठवडा, महिना, वर्ष असे कॅलेंडरच्या हिशेबात आपण दिवस बसवले ते आपल्या सोयीसाठी.. अन्यथा कालच्या दिवसाचा आजच्या दिवसाशी काही संबंध नाही. दिवस तर सोडाच; मागच्या तासाचा आत्ताशी काही संबंध नाही. पण सरून गेलेला काळ लोक असे वर्षांनुर्वष सांभाळत राहतात. स्मरणाच्या कुपीत आयुष्यात वाटय़ाला आलेल्या सुंदर क्षणांचा सुगंध सांभाळायचा सोडून कुरूप क्षणांचा दर्प सांभाळत बसायची ओढ माणसाला का वाटते, हे मला कोडेच आहे. मग ही माणसे जिथे संधी मिळेल तिथे आपली कुपी उघडतात आणि दर्प पसरवायला सुरुवात करतात. असे नक्की काय होत असावे लोकांच्या आयुष्यात- की त्यांच्या आयुष्यातून जगण्याबद्दलची कृतज्ञता निघून जाते आणि फक्त तक्रारी उरतात. आयुष्याबद्दल फक्त तक्रारी सांगत बसावे अशा कितीतरी घटना ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात घडल्या! आई-बापाची सामाजिक प्रतिष्ठा हरवलेली, समाजात निर्भर्त्सना वाटय़ाला आलेली, सदासर्वकाळ अन्नान्न होऊन फिरायची वेळ, ज्याच्या ज्ञानाचा साक्षात्कार स्वत:ला झालाय त्या गुरू असलेल्या भावाबद्दलही जगाला यत्किंचितही आदर नाही, आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या लहान भावंडांचेही पोट भरता येऊ  नये अशी सगळी हताशा त्यांच्या वाटय़ाला आलेली. अशा माणसाच्या लेखणीतून ‘सुखिया झाला’ अशी कृतार्थता आणि आयुष्याबद्दलची कृतज्ञता उतरली आहे.

खडतर भूतकाळ किंवा आयुष्यात वाटय़ाला आलेल्या दु:खाच्या कहाण्या घेऊन येणाऱ्या लोकांवर मला एक जालीम उपाय सापडलाय. मी त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली की त्यांना ताज पॅलेसमध्ये टेबल बुक करायला सांगतो. पंचतारांकित हॉटेलशिवाय मी कुठल्याही हॉटेलमध्ये दु:ख ऐकत नाही, याची मी त्यांना कल्पना देतो. ‘अरे, पण तिथे पंधरा-वीस हजारांचे बिल होईल,’ अशी एखाद्याने कुरकुर केली की मग मी त्याला जाब विचारतो. स्वत:चे दु:ख माझ्या मेंदूत डाऊनलोड करायला जर तू पंधरा-वीस हजारही खर्च करायला तयार नसशील, आणि जर ते तुला तितके महत्त्वाचे वाटत नसेल तर टपरीवर चल.. मी तुला चहा पाजतो. आणि तुझ्या आयुष्यातल्या धमाल गोष्टी मला सांग, अशी ऑफर देतो.

माझ्या पैशाने चहा पिण्यापेक्षा माझ्यावर पंचतारांकित हॉटेलमध्ये खर्च करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.. याला आता काय करणार?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com