मी माझ्या घरच्या बोक्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करीत बसलो होतो. तो वारंवार त्याचा चेहरा पायात लपवीत होता आणि मी त्याची मान उचलून चेहऱ्यावरचे भाव पाहत होतो. करायला काहीच नाही म्हणून फेसबुकवर लोकांच्या मुलांना ‘सो क्यूट..!’ म्हणणे, किंवा एखाद्याने त्याची चुलत मावशी गेल्याची माहिती उघड केल्याबद्दल त्याला ‘RIP’ आणि त्याबरोबर एक पडेल चेहऱ्याचा इमोजी पाठवणे, याचाही मला अनेकदा कंटाळा येतो. फेसबुकवर गेलो की लोक सारखे त्यांच्या पोरांचे फोटो पाठवत असतात, किंवा गेलेल्या माणसाबद्दल हिरीरीने माहिती देत असतात. त्यामुळे मला तर हल्ली पूर्वीपेक्षा खूपच जास्त मुले नव्याने जन्माला येत असावीत, किंवा गावात टपटप माणसं मरत असावीत असेच वाटत राहते. ‘RIP’ किंवा ‘सो क्यूट..!’ करून झाल्यावर २०१४ नंतर त्यातल्या त्यात इतकाच दिलासा आहे, की पटकीची किंवा प्लेगची साथ यावी तसे खूपच जास्त लोकांनी फेसबुकवर राष्ट्रभक्तीच्या प्रसाराला वाहून घेतले आहे. देशप्रेमाने फसफसलेल्या या पोस्ट वाचतानाही कॉम्प्युटरसमोर ताठ उभे राहूनच वाचाव्यात की काय असे मला वाटायला लागले आहे. फेसबुक नसते तर इतक्या मोठय़ा संख्येने दडून बसलेल्या राष्ट्रभक्तांबद्दल आपल्याला कळलेच नसते, या भावनेने फेसबुकबद्दल माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली आहे.

पण शेवटी दिवसभर कृतज्ञ राहायचाही कंटाळा तर येतोच ना! तुमच्याकडे काहीच्या काही भरपूर रिकामा वेळ असेल तर तुम्हालाच जीव रमवायचे नवनवे उपाय शोधावे लागतात. त्यामुळे बोक्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे, हा एक चांगला उपाय आहे. निरीक्षणातून माझ्या असे लक्षात आले, की आमच्या बोक्याला त्याच्या पूर्वजांबद्दल जराही कुतूहल नाही. म्हणजे तो समर्थाघरच्या मांजराचा वंशज आहे की जंगली मांजराचा, याची त्याला जराही फिकीर नाही. मी आपले कथेत असे वाचले होते की, बोका हा पट्टेरी वाघाचा मावसोबा असतो. आता इतक्या सामर्थ्यशाली भाच्याचा एखाद्याने किती गौरवाने उल्लेख केला असता? आपल्या भाच्याच्या पूर्वजांना ट्रान्सपोर्ट म्हणून डायरेक्ट परमशक्तिशाली देवीने वापरल्यावर एखाद्याने त्या गौरवाच्या किती कहाण्या सांगितल्या असत्या! पट्टेरी वाघाचा मावसोबा ही आजसुद्धा खूपच पॉवरफुल ओळख आहे. नाक्यानाक्यावर अगदी गर्वाने ज्याच्या भाच्याचे फोटो लागलेत, त्याने तर ही ओळख वापरून किती रुबाब करायला हवा! पण एकूणच आपल्या पूर्वजांविषयी माहिती ठेवण्याची पूर्ण अनास्था आणि सांप्रतकाळी एखादा नातलग काहीतरी देदीप्यमान करीत असला तरी त्याच्या भानगडीत न पडता आपले काम आपण करीत राहणे, यावर माझ्या बोक्याचा विश्वास आहे असे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळेच विकासाच्या ज्या टप्प्यावर माझा बोका येऊन पोहोचला आहे तिथे मानवाला पोहोचायला अजून बराच काळ जाऊ द्यावा लागेल असे दिसते.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

पूर्वज आणि त्यांचा अभिमान हा व्हायरस माणसाच्या आयुष्यात कुठून आला असावा, याबद्दल मला अपार कुतूहल आहे. आणि गंमत म्हणजे आपले पूर्वज हे नक्की कर्तृत्ववानच असतील, ही अंधश्रद्धा कशी जोपासली गेली असावी हे कधीतरी शोधायलाच हवे. आज रिक्षा चालवणाऱ्याला खात्रीच असते, की त्याचे पूर्वज रथाचे ड्रायव्हर होते. मागच्या दोन-चार पिढय़ांबद्दल आपल्याला माहिती असते आणि त्यांनी काय कर्तृत्व गाजवले याची थोडीफार कल्पनाही असते. पण दोन-चार पिढय़ांमागचे लोक- ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही, ते एकदा पूर्वज झाले की त्यांच्या जगण्याला एक कर्तृत्ववानतेची झळाळी प्राप्त होते. आणि मग सगळ्याच गोष्टी बदलतात. खरं तर पूर्वज म्हणजे आपल्या ओळखीचे ना पाळखीचे! पण ते विद्वान असणार, त्यांचे आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्याच असणार, ते तेजस्वी आयुष्यच जगले असणार, त्यांच्या जगण्यात सात्त्विकताच असणार, त्यांच्या पाठीचा कणा ताठच असणार, त्यांनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला! ते तो पाळतच असणार.. म्हणजे जे काही जगण्यातले भव्य-दिव्य ते सारे पूर्वीच होते, अशी एक जागतिक अंधश्रद्धा आहे.

खरं म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धान्त यापेक्षा वेगळा आहे. आपला सगळ्यांचाच आद्य पूर्वज हा शेपूट असलेले माकड होते. शतकानुशतके आपण उन्नत होत होत आता आहोत तिथे येऊन पोहोचलो आहोत. त्यामुळे उत्क्रांतीचा प्रवास हा वाईटाकडून चांगल्याकडे, दुर्बलतेकडून सबलतेकडे आहे. त्यामुळे आपण पूर्वजशोधात जितके मागे जाऊ, तितके आजच्यापेक्षा कमी दर्जाची माणसे असण्याचीच शक्यता अधिक आहे. आज जर बँकेचा हफ्ता भरताना तुम्ही मेटाकुटीला आला असाल, तर तुमचे पूर्वज हे लोकांकडून हातउसने घेऊन परागंदा झालेले असण्याचीच शक्यता जास्त आहे. रोज सकाळी उठल्यावर चष्मा उशीखाली ठेवला की बाहेरच्या खोलीत ठेवला, हे शोधण्यात तुमची रोज दमछाक होत असेल तर तुमच्या पूर्वजांनी विश्वाचे रहस्य शोधलेले असण्याची थोडीही शक्यता नाही. आपण जितके मागे जातो, तितके माकडाच्या जवळ जातो आणि जितके पुढे येतो, तितके माकडापासून दूर जातो.. इतका हा सोपा हिशेब आहे. आमचा बोका त्याच्या पूर्वजांच्या खऱ्या-खोटय़ा कर्तृत्वाशीही देणे-घेणे ठेवत नाही. आणि स्वर्ग मिळाल्यावर सोन्याच्या वाटीत दूध प्यायला मिळेल असा दूधखुळा आशावादही बाळगत नाही. त्याला पूर्वजांचे ओझे पाठीवर नाही आणि भविष्याचीही चिंता नाही. तो आजचा दिवस महत्त्वाचा मानतो. आणि संधी मिळताच घरातली सर्वात गार जागा पटकावून झोपी जातो. भूतकाळाच्या ओझ्यातून आणि भविष्यकाळाच्या चिंतेच्या जंजाळातून पाय सोडवून घेतले तर वर्तमानकाळात किती सुटसुटीत चालता येते!

पूर्वजांचा अभिमान आणि स्वर्गाची ओढ हे दोन्ही एकाच सापळ्याच्या दोन बाजू आहेत. आणि तो सापळा म्हणजे आज काहीतरी मौल्यवान, अतीव महत्त्वाचे करायचा आळस! पूर्वजांचा अभिमान बाळगायची सोय एकदा माणसाने स्वत:ला ठेवली की नंतर शेकडो प्रश्नांची मालिका समोर उभी राहते. मग भूतकाळातल्या गौरवास्पद घटनांवर आपल्याला आपलाच अधिकार वाटायला लागतो. भूतकाळातले अपमान हे आपल्याला आपले अपमान वाटायला लागतात. एखाद्याचा पूर्वज जर कुठल्या हलक्या दर्जाच्या कृत्यात गुंतलेला असेल तर त्याला हिणवता येते. आणि मुख्य म्हणजे ज्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही अशा गोष्टींबद्दल स्वत:ला श्रेष्ठ समजायची सोय होते. आपले पूर्वज गौरवशाली गोष्टी करीत होते की चोर होते? बुद्धिमान होते की मठ्ठ होते? युद्धात लढले की पळून गेले, की गद्दारी केली? या वायफळ प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रवास हा शेवटी जात, धर्म, वंशश्रेष्ठत्व या बदनाम गावांना जाऊन पोहोचतो.

आमच्या बोक्याला या काही भानगडीच नाहीत. त्याला ना पुण्याची मोजणी, ना पापाची टोचणी. तो पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या उठाठेवीत पडतच नाही. आपल्या पूर्वजांचा इतिहास हा देदीप्यमान आहे की लाजिरवाणा, याच्याशी त्याला देणे-घेणे नाही. बोक्याच्या निरीक्षणाला मी सुरुवात केली होती, पण हळूहळू त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला मला त्रास व्हायला लागला.

गतकाळातल्या लज्जास्पद किंवा गौरवशाली खरकटय़ाचं शेपूट गळून पडून त्याच्याइतके उत्क्रांत व्हायला मला किती वर्षे लागणार आहेत, कोणास ठाऊक!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com