बालमित्रांनो, आपण नव्या वर्षांत प्रवेश केला आहे; आणि दरवर्षी आपण काही-तरी नवीन शिकायचं ठरवत असतो. या नव्या वर्षांत या  नव्या सदरामध्ये आपण आपल्याभोवतीचा निसर्ग, झाडे, पशू, पक्षी तसेच या सर्व घटकांनी युक्त असलेल्या परिसंस्थांमधील छोटय़ा छोटय़ा गमतीशीर गोष्टी पाहणार आहोत. या सर्व गोष्टी bal02आपणास प्रत्यक्ष अनुभवता येऊ शकतील. तसेच त्यातून आपल्याला खूप काही नवीन शिकायला मिळेल.
पहिल्या भागामध्ये आपण एका छोटय़ा व आपल्या अगदी परिचयात असलेल्या झाडापासून सुरुवात करणार आहोत. आपल्यापकी अनेक जणांना अळूची भाजी आवडत असेल. विशेषत: आपल्याकडील बहुतेक लग्न समारंभांत ही भाजी आवर्जून केली जाते; पण तुम्ही याचे झाड व त्यास येणारा फुलोरा पाहिला आहे का?
अनेकांनी अळूची पाने निश्चितच पाहिली असतील; परंतु त्याचा फुलोरा मात्र बघितला असेलच असे नाही. आज या फुलोऱ्याची गंमत आपण पाहूयात. तुम्हाला असा फुलोरा  बघायला मिळाल्यास त्याचे उत्तम निरीक्षण करा व तो तुमच्या मित्रमैत्रिणींनाही दाखवा.
मुलांनो, तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की, अनेक झाडांमध्ये दोन प्रकारची फुले ही स्वतंत्र येतात. म्हणजेच काही झाडांना फक्त फुलेच येतात; पण कधीही फळे येत नाहीत. तर काही झाडांना फुले व फळे दोन्हीही येतात. याचे कारण फळे धारण करणारी फुले ही स्त्री जातीची असतात. या फुलांमध्ये बी तयार करणारे बीजांड असते. तर ज्या झाडांना फक्त फुलेच येतात ती पुरुष जातीची असतात. यात परागकण तयार होतात. या परागकणांचे कीटकांद्वारे वहन होते व त्यामुळे स्त्री जातींच्या फुलांबरोबर संकर होऊन त्यातील बीजांडांचे फळामध्ये रूपांतर होते. अळूच्या फुलोऱ्यात ही नर व मादी फुलांची रचना अगदी वैशिष्टय़पूर्ण असते. यातील फुलोरा हा अगदी मोठा असतो व तो एका स्वतंत्र देठावर येतो. हा देठ थेट जमिनीतूनच उगवतो.
या छायाचित्रात पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, या मुख्य फुलोऱ्यास संरक्षण देण्याकरिता एक भरभक्कम सनिकासारखे उभे असलेले पिवळसर रंगाचे जाडसर कवच आहे. बाहेरून पाहताना हे फारच आकर्षक दिसते व याच्या रंगाच्या वैशिष्टय़ामुळेच त्याच्याकडे कीटक आकर्षति होतात. या संरक्षक कवचाची रचना ही अगदी नजरेत भरण्यासारखी असते. सर्वात खालचा देठाजवळील भाग हा फुगीर असतो, तर त्यावरील भाग लांब पानांसारखा व त्याच्या दोन्ही कडा एकमेकांवर लपेटून घेतल्यासारखा असतो. याच्या आतल्या भागातील दांडीवर तीन प्रकारची फुले असतात. विशेष म्हणजे, ही तिन्ही प्रकारची फुले एकमेकांपासून स्वतंत्र असतात. यातील सर्वात खालच्या भागामध्ये मादी किंवा स्त्री जातीची फुले असतात, तर सर्वात वरच्या भागात नर किंवा पुरुष जातीची फुले येतात. या दोन्ही फुलांच्या मधील भागातील फुले मात्र नपुंसक असतात. ज्या वेळी एखादा कीटक या फुलोऱ्यावर येतो; तेव्हा एकाच वेळी तो फुलोऱ्याच्या वरच्या भागातून खालपर्यंत जातो. साहजिकच वरच्या भागातील परागकण हे त्याला चिकटले जाऊन ते खालच्या भागात असलेल्या स्त्री फुलांपर्यंत विनासायास पोहोचतात व फल प्रक्रियेला सुरुवात होते. खरे तर एवढे सगळे घडत असते ते त्या पिवळसर भक्कम पडद्याच्या आतमध्ये. त्यामुळे आपणास बाहेरून पाहताना हे काहीच दिसत नाही. यातील संशोधनातून असे लक्षात आले, की अळूवर्गीय अन्य झाडांच्या यांसारख्या फुलोऱ्यामध्ये काही कीटक तेवढय़ा काळात आपला जीवनक्रम पूर्ण करतात. आहे ना हे गमतीशीर! तर चला, आपण सर्वानी या आठवडय़ात आपल्या घराजवळच्या अळूच्या फुलोऱ्याचे निरीक्षण करूयात व या तिन्ही फुलांमध्ये काय फरक आहे, हे बघण्याचा प्रयत्न करूयात.