नेहा, तिचे आई-बाबा, काका-काकू आणि त्यांची मुलं असे सगळे दरवर्षी एखाद्या जवळपासच्या रिसॉर्टमध्ये शनिवार-रविवारी जातात. गप्पाटप्पा, जेवणखाण, एकमेकांसोबत निवांत वेळ घालवणं आणि रोजच्या चाकोरीतून बाहेर पडून जरा रिलॅक्स होणं असं सगळंच त्यातून साध्य होतं. शक्यतो गणपती झाल्यावर श्रम परिहार म्हणून हे गेटटुगेदर प्लॅन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुलं तर गणेशोत्सव आणि ही छोटीशी पिकनिक या दोन्ही गोष्टींची आतुरतेने वाट पाहत असतात. नेहा यावेळी या पिकनिकची जरा जास्तच आतुरतेने वाट बघत होती. नुकताच तिने शाळेतल्या ऑफ तासाला मैत्रिणीकडून एक धमाल खेळ शिकला होता. पिकनिकला सगळ्यांबरोबर हा खेळ खेळायचा असं तिने ठरवलंच होतं.

एकदाचे सगळेजण रिसॉर्टमध्ये पोहोचले. गप्पा, जेवणं झाल्यावर नेहाने सगळ्यांना गोल करून बसवलं. प्रत्येकाला कागद आणि पेन दिलं आणि खेळाबद्दल सांगायला सुरुवात केली, या खेळाचं नाव आहे ‘जर-तर’. आपण आधी आपल्याकडच्या कागदाच्या छोटय़ा छोटय़ा चिठ्ठय़ा तयार करायच्या. त्यातल्या एका चिठ्ठीवर ‘जर’ पासून सुरू होणारं वाक्य लिहायचं म्हणजे ‘जर मी शाळेत पहिली आले’ किंवा ‘जर मी खोटं बोलले’ वगैरे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर ‘तर’ पासून सुरू होणारं वाक्य लिहायचं म्हणजे ‘तर मी सगळ्यांना पेढे वाटेन’ किंवा ‘तर आई मला ओरडेल’ वगैरे. मग सगळ्या ‘जर’च्या चिठ्ठय़ा एकत्र ठेवायच्या आणि सगळ्या ‘तर’च्या चिठ्ठय़ा एकत्र ठेवायच्या. त्या वेगवेगळ्या मिक्स करायच्या आणि मग त्यातून न बघता randomly एक ‘जर’ची आणि एक ‘तर’ची चिठ्ठी काढायची आणि उघडून मोठय़ाने वाचायची. प्रत्येकाने लिहिलेले ‘जर-तर’ वेगवेगळे असल्यामुळे ते जेव्हा असे मिक्स होतात तेव्हा ‘जर मी शाळेत पहिली आले’ ‘तर आई मला ओरडेल’ अशी त्याची काहीही कॉम्बिनेशन्स होतात आणि खूप धमाल येते!

नेहाकडून ‘जर-तर’ समजून घेताना ‘याचं आऊटपुट नक्की काय असेल’ अशी थोडीशी शंका मोठय़ांच्या मनात होती, पण खेळायला सुरुवात केल्यावर मात्र ‘जर मला पोहायला आलं’ ‘तर कासव जोरात धावेल’, ‘जर मी ऑफिसला उशिरा गेलो’ ‘तर माझा चष्मा फुटेल’ अशी धमाल कॉम्बिनेशन्स तयार व्हायला लागल्यावर सगळ्या शंकाकुशंका विसरून मोठे पण ‘जर-तर’ची मजा अनुभवायला लागले! चहासाठी ब्रेक घेतल्यावर नेहाचा बाबा म्हणाला, ‘‘साधारण अशाच पद्धतीचा एक कार्ड गेम पण आहे. त्याचं नाव आहे ‘अ‍ॅपल्स टु अ‍ॅपल्स’. त्यात मूळ खेळात १०८ हिरवी आणि ३२४ लाल कार्डस असतात. लाल कार्डवर साधारणपणे ‘नाऊन्स’ आणि हिरव्या कार्डसवर ‘अ‍ॅडजेक्टिव्हज’ असतात. खेळणाऱ्यांपैकी एक जण जज असतो. तो प्रत्येक खेळाडूला सात लाल कार्ड्स वाटतो. हिरव्या कार्ड्सचं वरचं कार्ड उलटून ठेवतो आणि सगळ्यांना मोठय़ाने सांगतो. मग प्रत्येकाने आपापल्या हातातून त्या कार्डला मॅच होणारं कार्ड पटकन निवडून खाली उपडं ठेवायचं. मग सगळ्यांनी उपडी ठेवलेली कार्ड्स मिक्स करून जज ती मोठय़ाने वाचतो आणि त्यातून ‘बेस्ट मॅच’ निवडतो. प्रत्येकालाच जज बनण्याची संधी मिळते आणि खेळाडूंची विनोदबुद्धी जितकी जास्त तितकी या खेळात मजाही जास्त येते! आता ‘अ‍ॅपल्स टु अ‍ॅपल्स’चे अनेक प्रकार मिळतात. नेहाच्या ‘जर-तर’ प्रमाणेच खेळणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी जेवढी जास्त तेवढा हा खेळही जास्त रंगतो!’’

बाबांचं बोलणं ऐकून, एका आंतरराष्ट्रीय खेळाची आठवण करून देणारा खेळ आपण सगळ्यांना शिकवला म्हणून नेहाला फारच बरं वाटलं. आता बाहेर फिरून येऊन मग रात्री पुन्हा ‘जर-तर’ खेळू असं सगळ्यांनीच ठरवलं!

anjalicoolkarni@gmail.com