सारा शहर मुझे लॉयन के नाम से जाणता है! सिंह गर्जना.. जंगलाचा राजा.. सिंहाचा छावा.. वगैरे वगैरे विशेषण लावलेला. महाप्रचंड शक्ती असणारा असा सिंह! याबद्दल मनामध्ये कुतूहल व भीती दोन्ही असतं. सर्कस गेल्यानंतर खऱ्या सिंहांचे दर्शन ‘द लायन किंग’ या सिनेमात झालं. ज्यात जंगलातील राजगादीविषयी झगडा दाखवलेला. तसा सिंह वाघापेक्षा कमी क्रूर, पण तरी रोज मटण खातो. त्याची गर्जना म्हणजे बाबारे बाबा.. अख्खं जंगल हादरवून टाकते.

त्याची शिकार म्हणजे एकच फाइट अन् वातावरण टाइटसारखी.. सिंघम सिनेमातल्या हिरोसारखी! एका पंजात आपल्यासारख्यांना लोळवू शकेल अशी शक्ती. म्हणूनच जगातील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूवर, बोधचिन्हात, झेंडय़ावर सिंहाची छबी असते. आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोटांवरदेखील सिंहिणीचे चित्र आहे. खूपशा बँकांच्या प्रवेशद्वारांवर सिंहांचे पुतळे असतात.

पण तुम्हाला खरी गंमत महित्येय का? सिंह हा बऱ्यापैकी शांत स्वभावाचा असतो. शांत म्हणजे तसा आळशीच! सतत झोपा.. ते आपण उंदीर आणि सिंहाच्या गोष्टीत पहिलंच आहे.

अभ्यास नाही- कामं नाहीत.. फक्त दिवसभर सावलीत लोळायचे. मुलांनाही सिंहीणबाईच सांभाळणार, बायकोच्या शिकारीवर जगणं, कधी गरज लागलीच तरच मोठी शिकार करायला उतरेलं. एकदा तर एका व्हिडीओत काही गव्यांनी मिळून अस्सा काही धुतलाय ना एका सिंहाला की बिचारा ढगातच गेला.. एकदा काय तर जिराफावर उडी मारली तेव्हा जिराफाने फुटबॉलसारखा लाथडला हो त्याला!

तर अशा महान राजाची शान-मान-इज्जत मिट्टीत मिळवणाऱ्या सिंहाची खरे रूप (प्रत्यक्ष टीव्हीवर जाण्याआधीच) काही शिल्पकारांनी रेखाटलेले आहे.

या विविध छटा कोरून, शिल्पित करून ठेवल्यात. आणि एक वेगळा सिंह आपल्याला पाहायला उपलब्ध केलाय. कार्टूनमध्ये आपण प्राण्यांचे भावजीवन पाहतोच.. पण इथे शिल्पात ते करणं तसं कठीणच.

या एके ठिकाणी सिंहिणीला बाण मारून बेजार केलंय आणि ती बिचारी रांगत स्वत:ला वाचवतेय. एकीकडे सिंह हसतोय, एकात चक्क कंटाळून झोपा काढतोय, एक हसतोय, एक आश्चर्याने पाहतोय, तर कधी भावूक झालाय.. ही शिल्पं धमाल आहेत. बाकीची शिल्पं उगाच पासपोर्ट फोटोसारखी भाव खात असतात.

खरा सिंहपण असेच करत असेल का हे पाहायला मी निघतो.. जंगलात. तुम्ही मात्र कोणत्या देशात, कोणत्या काळात हे केलं गेलं ते गुगलदादाला विचारून घ्या.

– श्रीनिवास आगवणे

shreeniwas@chitrapatang.in