कायम कोकणात राहिलेल्या आपटेकाकू मॉडर्न सुनेबरोबर नातवंडांसोबत मॉलमध्ये गेल्या. मॉल बघून त्यांच्या तोंडात सहज उद्गार आले, ‘‘मयसभाच आहे ही!’’ अर्थात नातवंडांना याचा अर्थबोध होईना. झालं, lok10काकूंना त्यांच्या रूपात श्रोते सापडले. काकू नातवंडांना सांगू लागल्या, ‘मय हा एक राक्षस होता. पण त्याला उत्कृष्ट आणि दुर्मीळ अशी वास्तुकला आणि शिल्पकला अवगत होती. पांडवांनी खांडववन या वनाचे इंद्रप्रस्थ नावाच्या अभूतपूर्व राजधानीत रूपांतर केले. त्यात या मय राक्षसाचा खूप मोठा हात होता. त्याला अर्जुनाने वाचवले म्हणून त्याची अर्जुनासाठी काहीतरी निर्माण करण्याची इच्छा होती. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून त्याने युधिष्ठिराच्या राजवाडय़ात असा एक दरबार निर्माण केला, की त्यात भलेभले गांगरून जात. त्यासाठी कैलास पर्वतावरून आणलेली रत्ने वापरली होती. अनेक अमूल्य अशी रत्ने, दुर्मीळ वस्तू वापरल्या होत्या. फुले वगैरे अशी काही नैसर्गिक, खरी वाटत की फुलपाखरेही फसून त्यावर बसत. जिथे पाणी आहे असे वाटे तिथे जमीन असे. आणि जमीन आहे म्हणून चालावे तर पाण्यात पडावे. भिंत आहे असे वाटले तर तेथे दरवाजा असे. आणि दरवाजा आहे असे समजून चालावे तर भिंतीला आपटावे, अशी काही अद्भुत निर्मिती केलेली होती. ही वास्तू मयाने निर्माण केली म्हणून  त्यास मयसभा असे नाव पडले. म्हणून आजही जेव्हा एखाद्या अशा ठिकाणी आपण जातो, की कुठे कसे जावे कळत नाही तेव्हा ‘मयसभाच आहे!’ असे म्हणतात. काकूंचे हे ज्ञानामृत जवळपासच्या सर्वानाच मिळाले.