बालमित्रांनो, सुट्टी म्हटली की गंमत, मज्जा, गप्पा, गाणी, गोष्टी हे सगळं काही ओघानं येतंच. पण अगदी खरं ऽऽ खरं ऽऽ सांगा हं, साधारणपणे सुट्टीचे दोन- चार दिवस उलटले की, ‘‘शी बाबा कंटाळा’’ ‘‘ मी आता काय करू?’’ अशी कुरबुर सुरू होतेच. टी.व्ही., मोबाइल्स्, कम्प्युटर हे सगळ करूनही वेळ उरतोच आणि ‘‘मी आता bal07काय करू?’’ हा प्रश्न तुम्हाला सतावतोच आणि त्या प्रश्नाने तुम्ही घरातल्यांना सतावता. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही आता सज्ज आहोत. वर्षभर तुम्ही टय़ुशन्स्, शाळा, क्लासेस यात दंग असता, त्यामुळे अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टी राहूनच जातात. अशा छोटय़ा गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. हे कोणासाठी म्हणता? अगदी सगळयांसाठी. ज्यांना ज्यांना उन्हाळयाची सुट्टी आहे त्या सगळयांसाठी! पेन-पेन्सिल, वही शोधायला लागलात.. नो यार! गरज नाहीेए त्याची. फक्त तुमचं सजग मन आणि कार्यतत्पर पंचेंद्रिय तयार ठेवा आणि लागा कामाला. मग काय? एकदम तय्यार ना! आणि तुम्ही यातलं काय काय केलंत हे आम्हाला नक्की कळवायचंय!

आत्ता कुठे सुट्टी सुरू झालीये त्यामुळे तसा फारसा कंटाळा यायला सवडच नाहीए, हे एकदम मान्य आहे आम्हाला. पण बघा हं, दुपारी टी.व्ही. बघताना कधीतरी कंटाळा येतोच ना! किंवा सक्काळी म्हणजे सूर्य बराच वर आल्यावर दूध बिस्कीट खातानाही कंटाळा येण्याचा संभव असतोच. अशावेळी एक गंमत करता येईल बरं का! अगदी बसल्या जागेवरून जिथे असाल तिथेच ही गंमत चालू करायची.
डोळे गच्च मिटायचे, पण जरा अलगद बरं का! आणि आजूबाजूचे आवाज ऐकायचे. घरातल्या वेगवेगळया रूम्समधून वेगवेगळे आवाज येत असतील. बाहेरच्या रस्त्यावरून वाहनांचे आवाज येत असतील, झाडावर कावळा ओरडत असेल, मोबाइल्सच्या िरग्ज् गर्जत असतील. असे अनेक छोटे-मोठे आवाज ऐकायचे आणि त्यावरून त्या घटनेचं चित्र डोळयांसमोर आणायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला माहीत आहे का पहाट, सकाळ, माध्यान्हं, दुपार, सायंकाळ, रात्र, मध्यरात्र अशा वेगवेगळया प्रहरी वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळे चित्र अनुभवता येईल. काय म्हणता? जमत नाही. लगेच जमणार नाही, पण सोडून नाही हं द्यायचं. हळूहळू नक्की जमणार, मज्जा येणार. बरं, हे एकटय़ानेच करायचं असं नाही. मित्रमंडळींबरोबर हा खेळ खेळून मग अनुभवांच शेअिरगही करू शकता. मग काय कधी करताय सुरुवात?