माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमची दोस्ती माझ्या एका जुन्या मित्राशी करून देणार आहे, कारण त्यामुळेच मला खूप सारे नवे मित्र मिळाले. हे पुस्तक आमच्या घरी आलं बाबाच्या वाढदिवशी. धाकटय़ा काकाने भेट दिलेलं हे पुस्तक माझ्या कपाटात कधी जाऊन बसलं ते कळलंच नाही. बाबाला पुस्तक मिळालं तेव्हा मी जेमतेम आठ-नऊ वर्षांचा होतो. नवं कोरं पुस्तक पाहून मी हरखून गेलो. पुस्तक चाळायला लागलो तर प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक सुरेख रेखाचित्र होतं. मी एकेक प्रकरण चाळत गेलो आणि त्यातल्या चित्रांनी माझं लक्ष वेधून घेतलं. शेवटच्या प्रकरणाच्या सुरुवातीला माझ्या ओळखीचा चेहरा होता- डॉ. सालिम अलींचं एक छान चित्र होतं.

खूप दिवस हे पुस्तक आमच्या कपाटात पडून होतं. बाबानं वाचलं असावं, मी फक्त चित्रं पाहिली. मग कुण्या एके  दिवशी पुस्तक वाचायला घेतलं. अक्षरं लावत, शब्द जुळवत आणि वाक्यांचे अर्थ लावत नेटाने वाचायला लागलो आणि एक धम्माल जग माझ्यासमोर उलगडत गेलं. प्रत्येक प्रकरणातून एकेक माणूस भेटत गेलं. त्याच्या अजब, अचाट आणि अफाट साहसी कामाची माहिती उलगडत गेली.

पहिलंच प्रकरण आहे सिंदबादच्या सफरींचा मागोवा घेणाऱ्या एका आयरिश धाडसी तरुणाबद्दल- टिम सेव्हरिन. या तरुणाने सिंदबादच्याच निधडय़ा छातीने, मध्य आशियापासून चीनपर्यंत स्वत: बांधलेल्या जहाजातून प्रवास केला. सिंदबादच्या प्रवासाच्या वृत्तांतावरून टिम सेव्हरिनने या सफरीवर जायचं ठरवलं. त्याकरिता सिंदबादच्या काळी वापरात असलेल्या लाकडी जहाजाच्या बांधणीचा चंग बाधंला. भारतातून लाकूड, श्रीलंकेतून काथ्या, आणखी कुठून मजूर अशी सामग्री गोळा करत हे जहाज टिमने ओमानमध्ये बांधलं. अदमासे दोन महिन्यांच्या प्रवासानंतर हे जहाज लक्षद्वीप, श्रीलंका, सिंगापूर माग्रे चीनपर्यंत पोहोचलं. सिंदबादच्या गोष्टींप्रमाणेच टिम सेव्हरिनच्या या प्रवासाची गोष्ट अत्यंत थरारक आणि खिळवून ठेवणारी आहे.

पुढे एका प्रकरणात ओरिया आणि इआन डग्लस-हॅमिल्टन हे जोडपं भेटतं. आफ्रिकेत मन्यारा सरोवराच्या आसपासच्या जंगलात या जोडप्याने पाच र्वष हत्तींवर संशोधन केलं. हत्तींच्या संवर्धन आणि संरक्षणाकरिता जिवाचं रान केलं. प्रकरणाची सुरुवातच ओरिया आणि इआनच्या प्रेमकहाणीच्या सुरुवातीने होते आणि प्रकरणाचा शेवट ओरिया आणि तिच्या आवडत्या हत्तिणीसोबतच्या निरोपाच्या प्रसंगाच्या वर्णनाने होतो. मन्याराहून निघताना ओरिया स्वत:च्या पाच महिन्यांच्या मुलीसोबत- साबासोबत, या हत्तींच्या कळपात निरोप घ्यायला गेली. कळपाच्या मुख्य मादीशी, व्हर्गोशी तिची ही निरोपाची भेट ओरिया, इआन आणि त्यांच्या हत्तींमधल्या प्रेमाची साक्ष आहे. या भेटीबद्दल सांगताना ओरिया लिहिते, मी तिच्या जवळ गेले आणि गार्डेनियाचं फळ भेट म्हणून दिलं. ती सोंडेच्या अंतरावर होती. तिनं फळ घेतलं, तोंडात घातलं आणि सोंड पुढं करून साबाला हुंगलं. आठ आकडय़ाच्या आकारासारखी सोंड तिच्या चेहऱ्यासमोर फिरवली. साबा हे माझं बाळ आहे, हे तिला कळलं का? मी माझं मूल आणि ती तिचं मूल घेऊन समोरासमोर कितीतरी वेळ निश्चल उभ्या होतो. अतिशय कोमल असा हा क्षण होता.

या पुस्तकातलं सगळ्यात छोटं प्रकरण आहे कूनो स्टुबेनच्या नाईल प्रवासाबद्दलचं. ‘मी कूनो- एकाकी खलाशी!’ अशी स्वत:ची ओळख करून देणाऱ्या कूनोने एकोणीसशे सत्तर साली एका छोटय़ा बोटीतून, तराफ्यावरून, आदिवासी पाडय़ात उपचार आणि पाहुणचाराचा अनुभव घेत नाईल नदी एकटय़ाने पार केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक खलाशांनी हार मानलेल्या नाईल नदीवर कूनो स्वार झाला. तिथल्या अनेक साहसी अनुभवांतून तावून सुलाखून निघत त्याने हा अत्यंत साहसी प्रवास पूर्ण केला.

याच पुस्तकात जेन गुडाल भेटल्या; त्यांच्या चिंपाझी वानरांच्या संशोधनाआधी त्यांनी गोम्बे नॅशनल पार्कमध्ये केलेल्या रानकुत्रे, कोल्हे आणि तरसांविषयी केलेल्या संशोधनाविषयी वाचायला मिळालं. जेन गुडाल आणि ुगो या दोघांनी नोंदवलेली निरीक्षणं, प्राण्यांच्या वर्तनाचे दाखले आणि जंगलातल्या आयुष्याविषयी लिहिलेले अनुभव मनोरंजक तर आहेत, अतिशय साहसी आहेत यात शंकाच नाही. उत्तर भारतातील गढवालमध्ये आयुष्य घालवलेल्या ब्रिटिश शिकारी जिम कॉब्रेट, उत्तर ध्रुवावरील बर्फातून खडतर प्रवास करणारा फल्रे मोवॅट, पक्ष्यांच्या संशोधनाकरिता आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉ. सालिम अलींसारख्या अवलिया माणसांची, त्यांच्या कामाची ओळख याच पुस्तकातून पहिल्यांदा झाली.

हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेव्हा एक रंजक पुस्तक यापलीकडे त्याचं महत्त्व वाटलं नाही. पुढे दहावी-अकरावीत येईपर्यंत हे पुस्तक अनेकदा वाचून झालं होतं. त्यातल्या माणसांविषयी, त्यांच्या कामाविषयी अपार ओढ वाटायला लागली होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सभासदत्वामुळे डॉ. सालिम अलींविषयी अधिक जाणून घ्यायची संधी मिळाली. त्यांचं आत्मचरित्र वाचायला मिळालं. या पुस्तकात उल्लेख आलेल्या पुण्याचे पक्षीअभ्यासक डॉ. प्रकाश गोळेंना प्रत्यक्ष भेटता आलं. त्यांचा स्नेह लाभला. सोसायटीच्याच वाचनालयात असलेली जिम कॉब्रेट आणि इतर अनेक शिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचून काढली. शिकारीच्या थरारापेक्षा त्यांच्या लिखाणातून डोकावणारं जंगलांविषयीचं ज्ञान आणि प्राण्यांविषयीच्या अभ्यासामुळे मी थक्क होऊन गेलो. महाविद्यालयात असताना अनेक अभ्यासाकरिता अनेक वाचनालयांचा सभासद झालो. त्यातच केव्हातरी जेन गुडाल यांचं सायलेंट किलर्स हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका प्रकरणातही भावून गेलेल्या त्यांच्या संशोधनाविषयी सविस्तर वाचल्यावर मी जेन बाईंच्या इतर पुस्तकांचाही फडशा पाडला. इआन डग्लस-हॅमिल्टनच्या पुस्तकाकरिता जंग जंग पछाडलं, हे पुस्तक तब्बल एका तपानंतर दोन वर्षांपूर्वीच मला गवसलं.

शाळेत वाचलेल्या अशी माणसं, अशी साहसं या व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकाने आयुष्यभर साथ करायची असं ठरवूनच माझ्या चिमुकल्या आयुष्यात प्रवेश केला असं वाटतं. माडगूळकरांच्या या पुस्तकातली दोन माणसं, त्यांची पुस्तकं मला अजूनही मिळालेली नाहीत. केव्हा मिळतील ठाऊक नाही, मात्र या साहसी माणसांनी आणि त्यांच्या अफलातून आयुष्यांनी मला भुरळ घातली आहे. माडगूळकरांच्या पुस्तकाचा उद्देश सफल झाला हे नक्की, कारण या एका पुस्तकाशी मत्रीमुळे मला कितीतरी अनोखे मित्र मिळाले आहेत. त्यामुळेच हे लहानपणी केव्हातरी वाचलेलं पुस्तक आजही माझ्या कपाटात दिमाखाने मिरवतंय. तुम्हाला आवडेल या पुस्तकाशी आणि त्यातल्या माणसांशी मत्री करायला?

हे पुस्तक कुणासाठी? गोष्ट, साहस आणि पुस्तकं आवडणाऱ्या माझ्या छोटय़ा वाचकांसाठी.

पुस्तक : अशी माणसं : अशी साहसं

लेखक : व्यंकटेश माडगूळकर

प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन

श्रीपाद –  ideas@ascharya.co.in