‘न ऐकलेली गोष्ट’ आणि ‘फुगा’ ही स्वाती राजे यांची पुस्तकं लहानग्यांच्या अनोख्या विश्वात घेऊन जातात.

‘न ऐकलेली गोष्ट’ या पुस्तकात एका चिमुरडीची कथा आहे. आईने दिलेला दुधाचा ग्लास कधीच नकोसा असलेल्या चंदाची ही गोष्ट. एक दिवस शाळेत जाताना एका दृश्यानं तिचं मनोविश्वच बदलून जातं. रस्त्यात तिला गाईचं वासरू दिसतं, जे पान्ह्यसाठी आसुसलंय, पण तिला ते मिळत नाहीए. गोष्ट तशी साधीच, पण चंदासारख्या मनस्वी मुलीच्या मनात ती खोलवर रुजते. तिला आठवतो- आईने प्रेमाने भरून दिलेला दुधाचा ग्लास- जो  पिण्यास आपण कुरकुरतो आणि  या वासराला आईचं दूध प्यायचं आहे, पण तिला ते मिळत नाहीए. ही गोष्ट तिच्या बालमनाला इतकी लागते, की ती दिवसभर तिचा पिच्छा पुरवते. ती अनेकांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते आहे, पण कोणालाच तिची गोष्ट ऐकण्यासाठी वेळी नाही. मग तिने ही गोष्ट अंगणातल्या झाडाला सांगितली आणि अशातच तिला गोष्ट गुंफण्याचं वेड लागलं आणि ती गोष्ट रचत गेली..

‘फुगा’ हीसुद्धा अशीच बालसुलभ सिद्धार्थ आणि त्याच्याच वयाच्या फुगेवाल्या मुलाची गोष्ट आपलं सुखी आयुष्य जगत असताना, त्याचा भरभरून आनंद घेत असताना दुसरीकडे आपल्याच वयाच्या मुलांचं कष्टकरी आयुष्य पाहून मनातून हेलावलेला सिद्धार्थ आणि त्याच्या जीवनाला लागलेलं एक वेगळं वळणं.. समजुतीचं आणि समजूतदारपणाचं..

स्वाती राजे यांची ही छोटेखानी पुस्तकं मुलांचं मोठय़ांना अपरिचित असलेलं भावविश्व उलगडून दाखवतात. या लहानशा गोष्टींमधूनही खूप चांगला संदेश देणारी ही पुस्तक सुट्टीत अवश्य वाचावीत अशीच आहेत. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची सुरेख चित्रे या गोष्टी अधिक खुलवतात.

‘न ऐकलेली गोष्टी’,  ‘फुगा’

स्वाती राजे

चित्रे- चंद्रमोहन कुलकर्णी

प्रकाशक-  भाषा मल्टिमीडिया

मूल्य- ८५ रुपये (प्रत्येकी)

मुलांना चित्रं रंगवायला आवडतात. मुलांची चित्रं रंगवण्याची नैसर्गिक आवड लक्षात घेऊन जिल्पा निजसुरे यांनी ‘निसर्गातील घटकांची चित्रे रंगवा’ ही तीन पुस्तके खास मुलांसाठी तयार केली आहेत. ही केवळ चित्रे रंगवा छापाची पुस्तके नाहीत हे विशेष. या पुस्तकांमधली चित्रं रंगवताना तुम्हाला निसर्गातील घटकांना रंगवायचं आहे ते त्यांच्या मूळ रंगात. त्यामुळे मुलांना निसर्गातील विविध घटकांशी ओळख होते, नकळत कुठेतरी मैत्रीही होते.

मुलांमध्ये रंगकामातून निसर्गाबद्दलची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकांतील पक्षी, फुलपाखरे व वनस्पती या  चित्रांना रंगकामासाठीचे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक चित्राला त्याच्या खऱ्या रंगाप्रमाणे रंगवायचे आहे. ्रपरिणामी चित्र रंगवल्यानंतर तो पक्षी किंवा फूल किंवा फुलपाखरू हे  खरेच भासतात. त्याचबरोबर प्रत्येकाची मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत थोडक्यात माहिती दिलेली आहे. सुट्टीमध्ये मुले ही पुस्तके रंगवून निसर्गाचा व रंगवण्याचा एक वेगळाच आनंद लुटू शकतील. तसेच चित्र रंगवताना निसर्गातील अनेक गोष्टी मुलांना शिकायला मिळतील. लहान वयातच निसर्गाची आवड निर्माण झाल्यामुळे मुले निसर्गाचे मानवी जीवनासाठीचे महत्त्व सहजपणे समजून घेतील.

रंगवल्यावर तयार होणारी चित्रे निसर्गातील घटकांशी साम्य असणारी आहेत. या पुस्तकांत खंडय़ा, बुलबुल, कोतवाल, भारद्वाज, दयाळ यांसारखे पक्षी, तसेच बहावा, तामण, पळस यांसारखी फुले आहेत. सेलर, यलो ऑरेंजटीप, ग्रेट एगफ्लाय अशी फुलपाखरे आहेत. प्रत्येक पुस्तकात १६ चित्रे आहेत. ल्ल

‘निसर्गातील घटकांची चित्रे रंगवा’- भाग १ ते ३.

लेखक व प्रकाशक- जिल्पा निजसुरे

मूल्य- ५० रुपये (प्रत्येकी)