‘‘नाग फार वाईट असतो ना गं आई?’’ आर्यनने डोळे मोठ्ठे करत विचारलं. त्याच्या हातात एक गोष्टीचं पुस्तक होतं. आईनं हसून विचारलं, ‘‘का? नाग वाईट असतो असं का वाटतं तुला?’’ त्यावर डोळे आणखी मोठ्ठे करत आर्यन म्हणाला, ‘‘हे पाहा ना, या गोष्टीतला एक नाग आहे ना, तो त्या चंद्रानन राजाला चावतो नि राजा बेशुद्ध पडतो. मग प्रधानजी राजवैद्याला बोलावतात नि औषधोपचार करतात. राजा शुद्धीवर येतो आणि त्या नागाचाच एक राजबिंडा पुरुष तयार होतो! तो नाग कोणी साधासुधा नाग नसतो, तो पाताळातील नागलोकचा शापित राजा असतो..’’

‘‘अरे बाळा, जगात कोणीच वाईट नसतं. नागसुद्धा!’’ आई म्हणाली. आर्यनचं तोंड चिमणीएवढं झालं. त्याला काही आईचं म्हणणं पटलं नाही. तो पाय आपटतच त्याच्या अभ्यासाच्या खोलीत गेला. नाग, साप, वाघ, सिंह, अजगर, विंचू, कोल्हे.. हे सारे वाईट असतात. ते माणसाला त्रास देतात, हा त्यानं निष्कर्षच काढला होता.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

संध्याकाळ झाली म्हणून आईनं देवापुढं नंदादीप लावला. रोजच्याप्रमाणे आर्यन उदबत्ती लावायला येईल म्हणून आई वाट पाहत होती. पण हा पठ्ठय़ा काही आला नाही. तो अभ्यासाच्या टेबलावर डोकं टेकवून चक्क घोरत होता. हाक मारत आई त्याच्याजवळ गेली. पाहते तर टेबलभर सापाची नि नागाची हीऽऽ चित्रं त्यानं काढली होती. रंगीबेरंगी नागमोडी साप, पट्टेरी-फणेरी नाग, कुणाच्या फण्यावर १० चा आकडा, तर कुणाच्या फण्यामध्ये चमकणारा मणी..! आई कौतुकानं.. तरी काळजीनं चित्रं पाहत होती. एका चित्राकडं तिचं लक्ष गेलं. त्या चित्रात एका छोटय़ा मुलाच्या पायाला नागानं दंश केलाय आणि तो मुलगा काळानिळा पडलाय.. त्याचे आई-बाप नि आणखी कोणी कोणी काळजीनं त्याच्यापाशी बसलेत. आई तर डोळे पुसतेय..

ते चित्र पाहून खऱ्या आईच्याही डोळ्यांत खरंखुरं पाणी आलं. आता पुन्हा डॉक्टरांकडे जायला हवं, ती मनात म्हणाली. पण त्याआधी आपणही आर्यनशी बोलायला हवं, असं तिनं ठरवलं. कारण डॉक्टरांशी बोलायला हवं. किंवा उद्या डॉक्टरांकडे जावंच लागेल. आजची रात्र आहे ना हातात.. आईनं विचार केला नि हलकेच आर्यनला उठवलं. ‘‘संध्याकाळचं झोपू नये, ऊठ बरं. तू उदबत्ती लावणारेस ना? चल.’’ आई जवळ असताना काडेपेटीनं उदबत्ती लावण्याचा पराक्रम करायला त्याला भारी आवडत असल्यानं तो पटकन उठला.

‘‘चित्र छान काढलीयेस नागांची नि सापांची.’’ आईनं विषयाला हात घातला.

‘‘हो.’’ प्रसाद खाता खाता आर्यन म्हणाला.

‘‘चित्रातल्या मुलाला नाग चावलाय का?’’

‘‘हो.. तो मुलगा मीच आहे!’’ आर्यन म्हणाला नि त्यानं आईकडे पाहिलं. आई काहीतरी बोलणार तोच तो म्हणाला, ‘‘नाग नि साप वाईट असतात. त्या दिवशी सर्पोद्यानात साप पाहिल्यापासून मला झोपच येत नाहीय. सारखी स्वप्नं पडतात- नाग चावल्याची. फार वाईट असतात नाग.’’

‘‘निसर्गात वाईट असं काहीच नसतं बाळा.’’ आईनं त्याच्या केसांतून हात फिरवला. ‘‘देवानं किंवा निसर्गानं सगळे प्राणी निर्माण केलेत, ते त्यांचं त्यांचं काम करत असतात. साप उंदरांना खातो. शिवाय तो शेतकऱ्यांचा मित्र असतो, कारण तो जमीन भुसभुशीत करतो.. आहे ना तुझ्या शास्त्राच्या पुस्तकात?’’

आर्यन ओठांचा चंबू करून बसून राहिला. मग आठवल्यासारखं करत म्हणाला, ‘‘वाघ, बिबटे वाईट असतात. ते माणसांना खातात.’’

‘‘ते वाईट नसतात. माणसानं जंगलं तोडली, तिथं आपली घरं बांधली. त्यांना राहायला जागा कुठेय? म्हणून ते बाहेर येतात. ते वाईट कसे?’’ आईनं सारं सोपं करत सांगितलं. आता काय बोलायचं असा विचार करत आर्यन म्हणाला, ‘‘हा, आठवलं, कुत्री फार वाईट असतात. ती आपल्या दारात घाण करतात. नेहमी माझा नाही तर बाबांचा पाय भरतो.’’ असं म्हणत तो फिसकन हसला.

‘‘कुत्रीही वाईट नसतात. त्यांना कुठे असतं आपल्यासारखं शौचालय किंवा कमोड? आणि असला तरी ते काही ‘माणूस’ नाही. ते आपली विष्ठा मातीत, जमिनीवरच टाकणार.’’ आई क्षणभर थांबली नि हसऱ्या स्वरात म्हणाली, ‘‘आणि बरं का, प्राण्यांची विष्ठा म्हणजे शीसुद्धा वाईट नसते हं! निसर्गात काहीच वाईट, घाणेरडं, त्याज्य नसतं. अरे, प्राण्यांची घाण असते ना, तेसुद्धा किडय़ांचं नि अळ्यांचं अन्न असतं! आणि उरलेल्या घाणीची माती होते. खत होतं. त्यावर आपण अन्न पिकवतो, नि तेच खातो.’’

‘‘शीऽऽऽ’’ आर्यननं नाक वाकडं केलं. हसूही आलं त्याला.

आईला आता भलताच उत्साह आला, ‘‘अरे, आपल्या बागेत झाडांचा पाचोळा पडतो. त्याला तू ‘कचरा’ म्हणतोस, पण निसर्ग त्याला ‘कचरा’ समजत नाही. तो ऋतुचक्राचाच भाग असतो. जे मातीतून उगवते, ते मातीत परत जाते. निसर्गात ना एकावर एक अवलंबून असं सारं असतं. एक साखळी असते- अन्नसाखळी.’’

आता मात्र विषय फार गंभीर होऊ  लागला. आर्यनच्या पोटात कावळेही ओरडत होते. त्याच्या हातावर लाडू ठेवत आई म्हणाली, ‘‘मग काय आर्यनशेठ, संपले का तुझ्या डोक्यातले प्रश्न?’’

त्यावर आपल्याच दंडावर जोरात फटका मारत आर्यन म्हणाला, ‘‘हे डास-मच्छर फार वाईट असतात.’’ दंड खाजवत तो पुढं म्हणाला, ‘‘मलेरियाऽऽऽ डेंग्यूऽऽऽ चिकुनगुनियाऽऽऽ’’

‘‘डास वाईट असतात.. असं नाही म्हणता येणार. कारण तेही निसर्गानं निर्माण केलेत. त्यांच्यामुळे रोगराई पसरते, हे बरोबर आहे. पण आपण रोगराई होणार नाही, असं स्वच्छ वातावरण ठेवायला हवं. पसारा, कचरा, पाणथळ जागेतली घाण.. यांची व्यवस्था लावायला हवी. डास होणार नाहीत असं बघायला हवं. हे पहा आर्यन, तू कित्ती पसारा केलायस. कचऱ्याचा डबाही उघडाच ठेवलायास. केळय़ाचं साल भिरकावलंयस कोपऱ्यात. बागेत नारळाच्या करवंटय़ा पडल्यात. त्यात पाणी साठलंय. बघ त्यात डासानं अंडी घातली असतील! म्हणजे पाहा, आपण डासांना आमंत्रण देतो, त्यांना हवं तसं घाणेरडं वातावरण तयार करतो, गलिच्छ कचरापेटय़ा, उघडी गटारं.. म्हणजे जणू डासांसाठी नव्या वसाहतीच! आणि मग म्हणतो- ‘डास वाईट असतात’.. हे बरोबर आहे का?’’

आर्यननं नकारार्थी मान डोलावली.

‘‘सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना, कीटकांना, झाडांना, वेलींना जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम असतं. ते ते करत असतात. खरं तर ही सारी झाडे, प्राणी आहेत म्हणूनच आपण आहोत. ही एक साखळी आहे.’’

‘‘साखळी? चेन?’’

‘‘होय. साखळी. आणि आपली ही पृथ्वी काही फक्त माणसांची नाही. सर्वाची आहे. कुठल्याही गोष्टीचा शांतपणे मुळातून विचार करायचा, म्हणजे मग कसलीच भीती वाटत नाही. भीतीचं मूळ कारण शोधायचं नि ते दूर करायचं. काळजी घ्यायची, काळजी करत नाही बसायचं. काय?’’

आर्यन ऐकत होता, पण त्याचे डोळे मात्र भिंतीवरच्या पालीकडे होते. एकाएकी पाल सरसर धावत गेली नि तिनं एक झुरळ गट्टम केलं. आर्यनचे डोळे लकाकले. तेवढय़ात एक कोळी तोंडातून जाळी टाकत गॅलरीच्या गजावरून खाली आला. चंद्राच्या प्रकाशात त्याचं जाळं चमकत होतं. आर्यन आईला म्हणाला, ‘‘आई, कोळी वाईट नसतात ना?’’ त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघत आई हसली नि म्हणाली, ‘‘चला, स्पायडरमॅन, आता जेवायची वेळ झाली.’’ आर्यनने मनगटातून खोटाखोटा धागा सोडला नि त्याला धरून त्यानं स्टूलवरून उडी मारली.

रात्री आईनं डॉक्टरांना फोन केला नि आनंदानं सारा वृत्तान्त सांगितला. आर्यनला पूर्वी ‘भयगंड’ हा आजार झाला होता. गेल्या वर्षी त्याला पोहायचा क्लास लावला होता. तिथल्या प्रशिक्षकानं त्याला बळेच पाण्यात ढकललं होतं. तेव्हापासून  तो पाण्याला, पावसाला घाबरू लागला. त्यानं तो तापानं फणफणला. त्यातून तो हळूहळू बरा झाला, पण तो घरातच बसायचा. दोन महिने शाळेतच गेला नाही. शाळेत जबरदस्तीनं सोडलं तर त्याला तापच यायचा. कुण्णाशी बोलायचाही नाही. नंतर तो नागाला, सापाला, विंचवालाही घाबरू लागला. डॉक्टरांनी त्याच्याशी सतत चर्चा केली नि त्याला वेळोवेळी धीर दिला होता. ते ‘मना’चे डॉक्टर होते ना!

आजच्या गप्पांमधून आईला असं वाटलं, की उद्या डॉक्टरकडे जावं लागणार नाही. आईच आता डॉक्टर झाली होती नि पेशंट बरा व्हायला लागला होता..

– आश्लेषा महाजन
ashleshamahajan@rediffmail.com