दिवाळीची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती. चिनू दुपारभर टी.व्ही.वरचे चॅनेल्स नुसते धडाधड बदलत बसला होता. पण त्याला टी.व्ही.वर त्याच्या आवडीचं काहीच सापडत नव्हतं. शेवटी त्याने टी.व्ही. बंद केला आणि तो बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. घरचा कॉम्प्युटरही दोन-तीन दिवस झाले बंद होता. सोसायटीतले त्याचे काही मित्र सुट्टी लागताच गावाला गेले होते. त्यामुळे सुट्टीत काय करायचं, असा प्रश्न त्याच्यासमोर ‘आ’ वासून उभा होता. इतक्यात त्याला बिल्डिंग खालून त्याचा मित्र सुबोध जाताना दिसला. चिनूने त्याला घरी खेळायला बोलावलं, पण तोही तबल्याच्या क्लासला चालला होता. म्हणजे आज खाली खेळायलाही कुणी नव्हतं. चिनू खट्टू होऊन पुन्हा घरात आला.

‘‘काय रे, असा कंटाळलेला का दिसतोयस?’’ आई चिनूकरिता दूध घेऊन आली.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

‘‘बोअर झालंय मला.’’ चिनू आईच्या हातातला ग्लास घेत म्हणाला.

‘‘का रे? आत्ताच तर लागलीये सुट्टी. लगेच बोअर पण झालं?’’ आई म्हणाली.

‘‘यावर्षी ताईची दहावी म्हणजे आपण कुठेच नाही जायचं नं?’’ चिनू ओठांचा चंबू करत म्हणाला.

‘‘हो मग? समजून घ्यायचं एक वर्ष.’’ इति आई.

‘‘आज ती दुपारी क्लासला गेली होती म्हणून तू टी.व्ही. तरी बघू दिलास मला. नाहीतर तोही दिवसभर बंद. मग करायचं काय?’’ चिनू हताशपणे म्हणाला.

‘‘शोध नं तू कसं रमवशील स्वत:ला ते!’’ आईने सुचवलं.

‘‘आणि मग तिची बारावी असेलच!’’ चिनू चिडवत म्हणाला.

‘‘आपण पण जाणार आहोत म्हटलं दहावी-बारावीला. विसरू नका, राजे! आणि एरवी आपण मजा करतोच नं? आता इतकी छान सुट्टी मिळाली आहे तर असा कंटाळा-कंटाळा का करायचा? एखादी जवळची लायब्ररी लाव. पुस्तकं वाच. एक वाचून झालं की बदलून नवीन आणायचं. किंवा सकाळी पोहायला जात जा, सायकल चालव. बाबा आणि मी सांगून दमलो. मित्र नाहीत, टी.व्ही. नाही म्हटलं की लागलीच कंटाळा कसा येतो तुम्हाला?’’ आई आता जरा रागावून म्हणाली. यावर चिनू काहीच बोलला नाही.

‘‘बरं, आपल्या घराजवळ दिवाळीनिमित्त एक प्रदर्शन लागलंय. मी जाणार आहेच तिथे आत्ता. तू येतोस का माझ्याबरोबर? ताई क्लासहून घरी यायच्या आत परत यायचंय आपल्याला.’’ आईने लगबगीने विचारलं.

‘‘चालेल. येतो.’’ चिनू जरा वैतागतच म्हणाला.

प्रदर्शनामध्ये खूप गर्दी होती. चिनू आधी गर्दी पाहून थोडा चिडला होता, पण हळूहळू तिथल्या स्टॉल्सने त्याचं लक्ष वेधून घेतलं. कपडय़ांचे, खेळण्यांचे, गृहोपयोगी वस्तूंचे असे अनेक स्टॉल्स तिथे लागलेले होते. दोन-तीन स्टॉल्स तर फक्त दिवाळीच्या फराळाचे होते- चकल्या, अनारसे, चिवडा, कडबोळी, शंकर पाळे असे बरेच खाद्यपदार्थ त्या स्टॉल्समध्ये आकर्षक पॅकिंग करून ठेवलेले होते. त्याचप्रमाणे रांगोळी, रंग, रांगोळी काढण्यासाठी तयार डिझाइनचे साचे, रांगोळीची पुस्तकं, जमिनीवर चिकटवण्याचे रांगोळ्यांचे स्टीकर्स, पणत्या यांचेही खूप स्टॉल्स होते. आईने फराळाची दोन-तीन पाकिटं आणि ताईकरिता काही रांगोळीची पुस्तकं घेतली. ताई दरवर्षी दिवाळीला सुरेख रांगोळ्या काढायची.

त्या स्टॉलवरून पुढे जात असताना त्या दोघांना कुणीतरी पाठीमागून हाका मारतंय असं वाटलं. मागे वळून पाहतात तर एका स्टॉलवरून त्यांना कुणीतरी बोलवत होतं. दोघे तिथे गेले.

‘‘अरे रवीदादा, तू इकडे?’’ चिनूने आश्चर्याने विचारलं.

‘‘हो! यावर्षी इथेपण स्टॉल आहे माझा.’’ तो स्टॉल दाखवत म्हणाला.

रवी देशमुख हा चिनूच्या बाबांच्या बँकेत कामाला होता. त्याला चित्रकलेची, हस्तकलेची लहानपणापासूनच खूप आवड होती. बॅँकेच्या कामांमधून वेळ काढून प्रत्येक सणाला ग्रीटिंग कार्ड्स, दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारांचे आकाशकंदील, असं बरंच काही तो बनवायचा. त्याचा छंद आता त्याचा पर्यायी व्यवसायही बनला होता. त्याच्या घराजवळच्याच एका भाडय़ाच्या खोलीत, सात-आठ गरजू मुलांना घेऊन तो हे काम करायचा. दरवर्षी दिवाळीला चिनूचे बाबा आणि बँकेतील इतर काही स्टाफ त्याच्याचकडे आकाशकंदील आणि भेटकार्डाची ऑर्डर द्यायचे. चिनूच्या घरचा आकाशकंदीलही दरवर्षी रवीदादाकडूनच आणलेला असायचा.

रवीदादाने वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे आकाशकंदील त्याच्या स्टॉलमध्ये छान मांडून ठेवले होते. चिनू स्टॉल न्याहाळू लागला. चांदण्या, गोलाकार-चौकोनी-षटकोन-अष्टकोनी, काडय़ांचे, करंज्यांचे असे कितीतरी प्रकारचे आकाशकंदील त्याने स्टॉलमध्ये लावलेले होते. त्यामुळे स्टॉल अगदी आकर्षक दिसत होता.

‘‘रवीदादा, हे सगळे आकाशकंदील तू स्वत: बनवतोस नं?’’ चिनूने कौतुकाने विचारलं.

‘‘हो! मी आणि माझे मदतनीस मिळून.’’ रावीदादा म्हणाला.

‘‘मस्त आहेत रे एकदम! तू कधीपासून बनवतो आहेस आकाशकंदील?’’ चिनूची आई कौतुकाने म्हणाली.

‘‘साधारण आठवी-नववीत असेन. एक र्वष गंमत म्हणून दिवाळीला दहा-एक कंदील बनवले. साधे गोलाकार- करंज्यांचे. आजूबाजूच्या लोकांना ते आवडले म्हणून त्यांनी विकत घेतले. त्यावर्षी दिवाळीला आईला स्वत: कमावलेल्या पैशातून साडी घेतली. छान वाटलं. मग दरवर्षीच आकाशकंदील बनवू लागलो.’’ रवीदादा समाधानाने म्हणाला.

‘‘भारी! रवीदादा, हे सगळे पारंपरिक आकाशकंदील आहेत नं?’’ चिनूने कौतुकाने विचारलं. रवीने होकारार्थी मान डोलावली. चिनू मग रवीदादाला तो आकाशकंदील कसा बनवतो ते विचारू लागला.

‘‘अरे चिनू, असं विचारण्यापेक्षा तू शिकूनच का नाही घेत आकाशकंदील बनवायला?’’ रवीदादाने सुचवलं.

‘‘खरंच? शिकवशील तू मला?’’ चिनूने विचारलं.

‘‘अरे नक्की. उद्याच ये घरी! दोन-तीन दिवसांत शिकशील असा आकाशकंदील बनवायला. तू बनवलेला पहिला आकाशकंदील घरी लाव की मस्त या दिवाळीला!’’ रवीदादा उत्साहाने म्हणाला. चिनूने आईला विचारलं. तीसुद्धा लगेच ‘हो’ म्हणाली. दिवाळीच्या सुट्टीत चिनू स्वत:हून काहीतरी नवीन शिकायचं म्हणतोय हे पाहूनच तिला खूप बरं वाटलं.

दुसऱ्या दिवशीपासून चिनू रवीदादाच्या खोलीवर आकाशकंदील शिकायला जाऊ  लागला. त्याची खोली चिनूच्या घराच्या अगदी जवळच होती. तिथे पोहोचल्यावर चिनू पाहतो तर तीन-चार मुलं आकाशकंदील बनवण्यात गुंग होती. कुणी करंज्या बनवत होतं तर कुणी झिरमिळ्या कापत होतं. दोघेजण आकाशकंदिलाचा काठय़ांचा सांगाडा तयार करत होते. एकाचं नक्षी आणि फुलं बनवणं सुरू होतं.

खोलीच्या एका कोपऱ्यात तासून ठेवलेल्या भरपूर बांबूच्या काठय़ा चिनूला ठेवलेल्या दिसल्या. त्याचबरोबर रंगीत कागद, सोने-चांदीचे कागद, पट्टय़ा, पेन्सिली, कात्र्या, खोडरबर, दोरे, सुतळ्या, फेव्हिकॉलचे डबे- आकाशकंदील बनवायला लागणारं असं बरंच साहित्य अगदी नेटकेपणाने तिथे रचून ठेवलेलं होतं.

रवीदादाने दिनेश नावाच्या एका मुलावर चिनूला आकाशकंदील शिकवायची जबाबदारी सोपवली. दिनेशही कॉलेजमध्ये शिकत, घरात थोडा हातभार लागावा म्हणून रवीदादाकडे काम करत होता. पारंपरिक पद्धतीचा आकाशकंदील बनवायला शिकायचं हे अर्थात आधीच ठरलेलं होतं. काठय़ा जोडून तयार झालेले चौकोनी-त्रिकोणी आकार, त्यावर चढवलेले रंगी-बेरंगी कागद, वर-खाली सजवलेल्या करंज्या, त्यांच्यावर सोनेरी टिकल्या, झिरमिळ्या, गोंडे, फुलं- असं सगळं लागलं आणि त्यात दिवा लावला की तो आकाशकंदील दिसतो ही एकदम सुरेख!

दिनेशने एक काठी दुसरीला बांधत, काठय़ांचे आठ चौरस करून, उभ्या चार काठय़ांना व्यवस्थित उभं-आडवं बांधून, दीड-दोन तासांतच आकाशकंदिलाचा सांगाडा तयार केला. तो त्यात एकदम मास्टर होता. चिनू त्याचं काम अगदी निरखून पाहात होता. मग त्याने चिनूला करंज्या आणि झिरमिळ्या बनवायला शिकवल्या. दिनेशने त्यानंतर हिरव्या रंगाचे चौकोनी आणि पिवळ्या रंगाचे त्रिकोणी, अशा आकारांचे मोठे कागद कापले. त्या त्या जागी ते बरोबर चिकटवले. तोपर्यंत चिनूने पिवळे, चौकोनी लहान कागद कापून दिनेशने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या करंज्या बनवल्या. दिनेशने त्या करंज्या आकाशकंदिलाच्या वरच्या आणि खालच्या भागात लावल्या. आकाशकंदील आता जवळ जवळ तयार झाला होता. त्यानंतर एका मुलाने कापून तयार ठेवलेल्या हिरव्या कागदाच्या झिरमिळ्या दिनेशने आकाशकंदिलाला चिकटवल्या. सोनेरी कागदाची नक्षी कापून प्रत्येक मोठय़ा हिरव्या चौकोनात लावली. चौकोन-त्रिकोण जोडलेल्या बाजूंना सोनेरी पट्टय़ा चिकटवल्या. पिवळ्या कागदाची फुलं बनवली आणि कंदिलाच्या प्रत्येक चौकोन-त्रिकोण जोडलेल्या टोकाला लावली. अजून एका मुलाने त्याला मदत केली. चिनूने कारंज्यांच्या मध्यभागी लहान सोनेरी टिकल्या कापून लावल्या आणि अशा रीतीने चार-पाच तासांतच पिवळ्या-हिरव्या अशा मिश्र रंगांचा सुंदर आकाशकंदील तयार झाला.

एव्हाना चिनूला आकाशकंदील कसा बनतो त्याचा अंदाज आला होता. पण खरी कसब होती ती बांबूच्या काठय़ांपासून सांगाडा बनवण्याची. त्याने दिनेशकडून ते व्यवस्थित शिकून घेतलं. अख्खी भूमिती या आकाशकंदिलात दडली आहे असं चिनूला वाटलं. नंतर नक्षी, फुलं, गोंडे, टिकल्या कसे बनवायचे तेही तो शिकला. आणि दोन दिवसांतच चिनूचा पहिला गुलबाक्षी रंगाचा आकाशकंदील तयार झाला.

चिनूचा उत्साह पाहून दिवाळीआधीच घराच्या बाल्कनीत बाबांनी चिनूचा आकाशकंदील लावला. त्यात एक बल्ब सोडला. कंदिलाच्या दोन्ही बाजूला रंगीबेरंगी दिव्यांच्या लुकलुकणाऱ्या माळा लावल्या. दिवे लागल्यावर तर चिनूचा आकाशकंदील अजूनच आकर्षक दिसू लागला. चिनूच्या ताईने कंदिलाच्या खाली ठिपक्यांची सुरेख रांगोळी काढली. तोपर्यंत आईने पणत्या लावल्या.

चिनू तर भलताच खुशीत होता. त्याचा ‘पहिला आकाशकंदील’ तो सगळ्या बाजूंनी सारखा न्याहाळत होता. इतक्यात समोरच्या बििल्डगमधून त्याच्या मित्राने- सुबोधने चिनूला हाक मारली.

‘‘चिनू, मस्त आहे रे तुझा आकाशकंदील! सगळ्यांपेक्षा एकदम वेगळा! कुठून आणलास?’’ चिनूला ऐकू जावं म्हणून सुबोधने जरा ओरडतच विचारलं.

‘‘अरे, यावर्षी मी बनवलाय आकाशकंदील. शिकून घेतला कसा बनवायचा ते.’’ हे म्हणताना चिनूला खूपच भारी वाटत होतं. त्याचे बाबा शेजारीच उभे होते.

‘‘काय चिनूशेठ, कसं वाटलं आकाशकंदील बनवायला?’’ बाबांनी चिनूची पाठ थोपटत विचारलं.

‘‘खरंच बाबा, धम्माल आली. दोन दिवस कसे गेले कळलंच नाही.’’ इति चिनू.

‘‘आपण स्वत: केलेली निर्मिती, मग ती कितीही लहान असो किंवा मोठी, तिचा आनंद काही निराळाच असतो. आता दर वर्षी बनवणार नं मग आकाशकंदील?’’ बाबा म्हणाले.

‘‘हो बाबा, नक्की बनवेन!’’ चिनू थम्स-अप करत म्हणाला.

‘‘बाळा, मित्र आपल्याला असायलाच हवेत. पण आपण एखादा छंद जोपासला- म्हणजे एखाद्या कलेचा, एखादं वाद्य वाजवण्याचा किंवा वाचनाचा- तर तो आपला सगळ्यात जवळचा मित्र होऊ  शकतो. गंमत म्हणजे, तो कायम आपल्याबरोबरच राहतो. मग वेळ कसा घालवायचा, असा प्रश्नच आपल्याला पडत नाही आणि कधी एकटंही वाटत नाही.’’ आई बाल्कनीमध्ये येत म्हणाली. तिने अलगद मुद्दय़ावर बोट ठेवलं होतं.

‘‘त्यामुळे इथून पुढे कुणी खेळायला नाही म्हणून अजिबात कुरकुरायचं नाही. आपला आनंद आपण स्वत: शोधायचा. काय?’’ ताई चिनूच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. तीसुद्धा तिच्या दहावीच्या अभ्यासातून वेळ काढून न चुकता तिचा छंद जोपासत होती, हार्मोनियम शिकत होती.

चिनूला एकदम पटलं. ओरीगामीसारखा एखादा छंद आपण जोपासायचा हे त्याने पक्कं ठरवून टाकलं. त्याने आकाशकंदिलाकडे पाहिलं. त्याच्या झिरमिळ्या वाऱ्यावर छान डोलत होत्या.

प्राची बोकिल prachibokil@yahoo.com