एकदा एक भाऊ -बहीण घरातून शाळेत जायला निघाली. त्यांची शाळेची वाट एका सुंदरशा घनदाट सावलीच्या वनराईजवळून जाणारी होती. रस्त्यावर कडक ऊन पडलं होतं. उन्हातून चालणं त्यांना कठीण झालं होतं. पण वनराईत मात्र घनदाट झाडीमुळे कसं थंडगार आणि उत्साही वातावरण होतं.
चालता चालता भाऊ  आपल्या बहिणीला म्हणाला, ‘‘तुला माहिती आहे का शाळेला जायला आपल्याला अजून खूप वेळ आहे! शाळेत उन्हामुळे गरम तर होतंच, पण कंटाळवाणंही वाटतं. उलट या वनराईत खूप मज्जा येईल आपल्याला! ऐक, पक्षी सुंदर गातानाचा आवाज येतोय. त्या खारुताई तर बघ, कशा या फांदीवरून त्या फांदीवर उडय़ा मारतायत.. आपण जाऊया का तिथे?’’
भावाचं म्हणणं बहिणीलाही पटलं. मग दोघांनीही आपली दप्तरे गवतावर भिरकावली आणि ती दोघंही त्या वनराईत एकदम गडप झालीसुद्धा! त्या घनदाट वनराईत पक्ष्यांच्या किलबिलाटानं, किडय़ांच्या वेगवेगळ्या आवाजानं अतिशय आनंदी वातावरण होतं. पक्षी कोणताही खंड न पडता उडत होते. कोणी गात होते, तर कोणी ओरडत होते. खारुताई झाडांच्या फांद्यांवरून उडय़ा मारत होत्या. नाकतोडे, किडय़ांची गवतात मस्तपैकी दंगामस्ती जाणवत होती.
मुलांना सर्वात प्रथम सोनेरी चमकणारा भुंगा दिसला. ‘‘आमच्याबरोबर उडय़ा मार ना!’’ मुलांनी भुंग्याला विनंती केली.
‘‘आनंदाने मारल्या असत्या रे. पण.. पण मला काम आहे. माझं खाद्य शोधणं मला भाग आहे.’’
‘‘ए आमच्याबरोबर खेळ ना!’’ मुलांनी पिवळ्या केसांच्या गांधील माशीला विनवले.
‘‘तुमच्याबरोबर खेळायला मला आजिबात वेळ नाही. मला मध गोळा करणं आवश्यक आहे.’’ माशी उत्तरली.
नंतर त्यांना एक मुंगी दिसली. मग मुलांनी मुंगीलाच खेळण्यासाठी गळ घातली. पण मुंगीला तर त्या मुलांचं बोलणं ऐकायलाही वेळ नव्हता. ती आपलं घर बांधण्यासाठी आपल्यापेक्षाही दुप्पट काडी लगबगीनं घेऊन जाण्यात गर्क होती.
मग मुलांनी आपला मोर्चा त्या वनराईतील खारुताईकडे वळविला. ते तिला म्हणाले, ‘‘ए खारुताई, आमच्याशीही खेळ ना गं थोडंसं!’’
आपली झुपकेदार शेपूट हलवत खारुताई त्यांना म्हणाली, ‘‘अरे, कसं शक्य आहे तुमच्याशी खेळणं? लवकरच बर्फ पडायला सुरुवात होईल त्याआधी बिया, दाण्याची तजवीज करून ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर थंडीत माझी पंचाईत नाही का होणार?’’
एक कबुतर त्यांना म्हणालं, ‘‘आमच्याकडे लवकरच लहानग्या कबुतराचं आगमन होणार आहे, मला त्याच्यासाठी घर नको बांधायला?’’
राखाडी रंगाचा ससा झऱ्याकडे पळाला आणि लांब जाऊन त्यानं आपलं तोंड आपल्या पंजांनी पुसून काढलं. जंगलात सर्वत्र जमिनीवर उगवलेल्या पांढऱ्या फुलांनाही मुलांबरोबर डोलायलादेखील वेळ नव्हता. कारण सुंदर वातावरणाचा उपयोग करून मधुर फळे बनवण्यात ती गुंग झाली होती.
जो तो आपापल्या कामात इतके गुंग झाला होता की, मुलांसोबत खेळायला कोणालाही वेळ नव्हता. त्यामुळे मुलांनाही चांगलाच कंटाळा आला होता. मग मुले झऱ्याकडे पळाली. झऱ्याचं पाणी दगडातून झुळझुळ वहात होतं. आम्हाला वाटतेय की, तुला काही काम नाही, मग आपण एकत्र खेळूया? ’’ मुलांनी ओढय़ाला विचारलं.
‘‘काही करायला नाही, असं कसं म्हणता?’’ जोरात खळखळाट करीत रागानं ओढा म्हणाला. ‘‘अच्छा, तुम्ही आळशी मुलं! बघा तरी माझ्याकडे, मी एक क्षणही विश्रांती न घेता रात्रंदिवस काम करतोय. तुम्हाला काय वाटतं, मी काय माणसं, जनावरांची तहान भागवत नाही? माझ्यामुळे कपडे धुतले जातात. होडय़ा माझ्याच अंगावर खेळतात. आग विझवण्यासाठी माझाच उपयोग केला जातो. एक नाही, कितीतरी कामं आहेत मला. त्यामुळे माझं डोकं नुसतं गरगरायला लागलं आहे!’’ असं सांगून ओढय़ानं पुन्हा आपला खळखळाट सुरू ठेवला.
आता मात्र मुले फार कंटाळली. त्यांनी विचार केला, प्रथम त्यांना शाळेत गेलं पाहिजे आणि नंतर शाळा सुटल्यावर परतताना या वनराईत यायला हवं. वनराईतून बाहेर पडताना भावाचं लक्ष एका हिरव्यागार झाडाच्या फांदीकडे गेलं. त्यावर एक सुंदर लालभडक पिसं असलेला रॉबिन पक्षी बसलेला दिसला. तो शांत बसून शीळ घालत होता. जणू काही त्याला करायला काहीच काम नव्हतं..
‘‘ए, तू छान गातोस! तुला काही काम नाही वाटतं, मग आपण मस्तपैकी खेळू या?’’ मुलगा रॉबिन पक्ष्याला म्हणाला.
‘‘काय, मी फक्त शीळ वाजवून गाणं म्हणत होतो? मी काय बिनकामाचा आहे?’’ जरा रागानंच रॉबिननं मुलाला विचारलं.
‘‘माझ्या तान्हुल्यांना भरवण्यासाठी मी काय चिलटं पकडली नाहीत? या क्षणी मी एवढा थकलो आहे की मला माझे पंख वर उचलणंही कठीण झालं आहे. आणि हो, माझ्या तान्हुल्यांसाठी मी अंगाई गीत गात होतो. आळशी मुलांनो, तुम्ही रे काय केलं दिवसभर? शाळेला दांडी मारली. काहीच नवीन शिकला नाहीत ना दिवसभर? या वनराईतून इकडून तिकडे पळून तुम्ही दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय मात्र आणलात हे कळतंय का तुम्हाला? तुम्हाला जिकडे जाण्यासाठी पाठवलंय तिकडे जा बरं आधी.. आणि हो, ज्याने आपल्या वाटय़ाचं काम संपवलं आहे, त्यालाच खेळण्याचा, आराम करण्याचा अधिकार आहे बरं!’’ रॉबिनचे हे खडे बोल ऐकल्यावर आता मुलांना स्वत:चीच खूप लाज वाटू लागली. ते शाळेत उशिरा का होईना गेले आणि शाळेत मन लावून, प्रामाणिकपणे अभ्यास करू लागली.
(मूळ रशियन कथा)
विद्या स्वर्गे-मदाने – vedvidya@yahoo.co.in

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Kidnapping of a minor girl by giving lure of chocolate
चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण, दारुड्या युवकाने…
Loksatta Chaturang The world of birds wandering in the wilderness Interesting
मनातलं कागदावर: लोभस हा इहलोक…!