आर्या आणि तिची आई घरात सुट्टीतील उद्योग म्हणून छान छान भेटकार्ड तयार करत बसल्या होत्या. ते करत असताना दोघींच्या गप्पाही चांगल्याच रंगल्या होत्या. तितक्यात बाहेरून आर्याचे आजोबा आले. ते कोणावर तरी खूप संतापले होते. ते ज्या ठिकाणी कामासाठी गेले होते, त्या कंपनीवर ते फारच रागावलेले दिसत होते. आर्याच्या आईनं त्यांचा राग शांत करत विचारलं, ‘‘बाबा, इतकं रागवायला काय झालं?’’
आजोबा म्हणाले, ‘‘मी ज्या कंपनीत कामासाठी गेलो होतो तिथे मला सांगितले की, तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरून द्या. आता त्यांचे सर्व व्यवहार ह्यपुढे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.’’ आजोबांना संगणक हाताळण्याची काहीच माहिती नव्हती आणि म्हणून आजोबांचा रागाचा पारा चढला होता. आपण इतके शिकलेले असून आपल्याला साधा फॉर्म भरता येत नाही ह्यचे शल्य त्यांना अधिक बोचत होते.
‘‘आमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी- ज्यांना संगणक हाताळता येत नाही त्यांनी हे सर्व कसे पार पाडायचे? अशाने आमच्या अडचणीत आणखी भर पडणार नाही का?’’ आजोबांचा राग काही शांत होत नव्हता.
आजोबांचे म्हणणे रास्त असले तरी ह्यपुढे सर्वानाच संगणक वापरणे क्रमप्राप्त होते आणि त्याला अन्य पर्यायदेखील नव्हता. आणि इथेच आर्याला एक कल्पना सुचली. तिने ठरविले या सुट्टीत आपल्या कॉलनीतील आजी-आजोबांना संगणक प्रशिक्षण द्यायचे. आर्याने आईला आपली कल्पना सांगितली. तिच्या आईनेही तिला लगेचंच होकार दर्शविला.
आर्या दुसऱ्या दिवशी आजोबांच्या संध्याकाळच्या कट्टय़ावर जाऊन पोहोचली. तिथे बरेच आजोबा होते, त्यातील एक-दोन आजोबा सोडले तर कोणालाच संगणकाची फारशी माहिती नव्हती. एखाद् दुसरे आजोबा सोडले तर बऱ्याच आजोबांच्या घरी संगणक होता. आर्याने आपली कल्पना सर्वाना नीट समजावून सांगितली आणि ती म्हणाली, ‘‘मी तर शाळेत जाणारी लहान मुलगी आहे. तुम्ही नोकरी-व्यवसाय करताना खूप हुशारी दाखविली आहे. तुमच्यासाठी संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळविणे अजिबात अवघड नाही.’’
‘‘अगं आर्या, पण या वयात नव्याने संगणक शिकणं कसं शक्य आहे?’’- इति आजोबा.
‘‘सहज शक्य आहे आजोबा. तुमच्यासाठी ते काहीच कठीण नाही. मी शिकवेन तुम्हाला संगणक.’’ आर्याने आजोबा-आजींना धरी दिला.
मग तिने सर्वाच्या सहमतीने वेळापत्रक तयार केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कॉलनीतील आजी-आजोबांना आापल्या घरी संगणक शिकवायला सुरुवात केली. हळूहळू आजी-आजोबांना संगणकाची खूपच गोडी लागली. मग ते एकमेकांना त्यातील गमतीजमती सांगू लागले. मग जे आजी-आजोबा आधी तयार नव्हते तेदेखील संगणक शिकविण्यासाठी आर्याला गळ घालू लागले आणि तेही या प्रशिक्षणात सामिल झाले.
आर्याच्या संगणक प्रशिक्षणामुळे आजी-आजोबांच्या मनातली संगणकाविषयीची भीती तर गेलीच, पण त्यावरून त्यांना ई-मेल करता येऊ लागले, हव्या त्या विषयाची माहिती अगदी घरबसल्या त्यावरून त्वरित मिळवता येऊ लागली. रेल्वेची, एसटीची तिकिटं उन्हातानात रांगेत उभे राहून काढण्याऐवजी घरबसल्या काढता येऊ लागली. फेसबुकवरून गेली कैक वर्षे त्यांना न भेटलेले मित्र, परदेशातील नातू-नाती भेटू लागले. यामुळे या मंडळींच्या मनातून संगणकाची भीती तर गेलीच, पण घरबसल्या काम आणि करमणूक आणि खूप साऱ्या गोष्टींची माहिती होऊ लागली.
आता सर्वच आजी-आजोबांना संगणकावर आवश्यक तेवढे जुजबी काम करता येऊ लागले होते. आपण इतके शिकलेले असून नवीन जमान्यात मात्र निरक्षर ठरत आहोत ह्यची बोच उरली नव्हती.
आईला आर्याच्या या प्रशिक्षणवर्गाचं खूपच कौतुक वाटलं. प्रशिक्षण घेतलेल्या सर्व आजी-आजोबांना प्रशस्तीपत्रक देऊ अशी कल्पना आर्यासमोर आईने मांडली. आर्याला आईची ही कल्पना खूपच आवडली. तिने संगणक प्रशिक्षणात कला शिक्षक असलेल्या एका आजोबांकडून संगणकावरच छान प्रशस्तीपत्रकं तयार करून घेतली आणि एक छोटखानी कार्यक्रम करून ती प्रशस्तीपत्रकं आजी- आजोबांना सन्मानपूर्वक दिली. मग सर्व आजी-आजोबांनी गुरुदक्षिणा म्हणून आर्याला गोष्टींची पुस्तकं भेट म्हणून दिली.
मोहन गद्रे – gadrekaka@gmail.com