‘‘अगं रती, मी अवघडून गेलोय गं. अभ्यास करता करता तुझा काटकोनाचा सरळकोन झाला आणि मी तुझ्या तोंडावर पडलो बघ. तुला जाग येईल म्हणून पाच मिनिटे वाट पाहिली, पण शेवटी उठवल्याशिवाय रहावेना. तुझ्या अभ्यासाची काळजी वाटली. वर्षभर तुला अभ्यासात मदत करायला मला व्यवस्थित टिकून रहायला हवं. माझ्या पत्रावळी होऊन चालणार नाहीत. सांधे खिळखिळे होऊन चालणार नाही. खरं ना!’’

‘‘हो ऽ रे पुस्तका, माझंच चुकलं. आई नेहमी सांगत असते की बसून वाच. पण मीच विसरून जाते. आणि त्यामुळे तुझी ही अशी अवस्था होते. पण आता यापुढे असं होऊ देणार नाही हं मी. तू अभ्यासात किती मदत करतोस मला.’’ रतीने प्रामाणिकपणे कबुली दिली.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Linguistic Migration of Marathi Stories
मराठी कथांचे भाषिक स्थलांतर..
Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

‘‘अगं, माझा जन्म तुम्हा सर्वाना ज्ञान देण्यासाठीच झाला आहे. पण असं खाली पडून, आपटून जीर्ण होण्यापेक्षा जास्त हाताळल्यामुळे खिळखिळं व्हायला मला आवडेल.’’ पुस्तकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘‘नक्की लक्षात ठेवीन हं मी हे. पण जन्माचा विषय काढलास म्हणून विचारते, तुझा जन्म झाला तरी केव्हा आणि कसा?’’ रती गोष्ट ऐकण्यासाठी उठून बसली.

‘‘माणसांमध्ये संवाद साधण्यासाठी भाषा निर्माण झाली. सुरुवातीला मौखिक परंपरेने भाषेचा विकास होत गेला. मग लिखित अक्षरातून शब्द, शब्दाशब्दांतून वाक्य आणि अनेक वाक्यांतून लेखन तयार होऊ लागले. एकाच लेखनाच्या अनेक प्रतींची गरज निर्माण झाली आणि त्यातून पुस्तकांच्या प्रती वेगाने बनविणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा जन्म झाला. याच प्रयत्नातून १४५५ साली जोहान गटेनबर्ग याने एक अत्यंत जबरदस्त शोध लावला. चर्चसाठी बायबलच्या अनेक प्रती देण्याच्या प्रयत्नातून माझा जन्म झाला.’’ पुस्तकही आपल्या जन्मकथेत रमून गेलं.

‘‘माझ्या दृष्टीने तर शाळा सुरू झाली आणि पुस्तकांची खरेदी केलीकीच तुझा जन्म होतो. नवीन कोऱ्या पुस्तकाचा वास, त्याचं करकरीत देखणं रूप, आखीव-रेखीव व स्वच्छ मांडणी मला खूप आवडते. आणल्या आणल्या अगदी हळुवारपणे पानं उलटत पुस्तक चाळायची मला अगदी घाई झालेली असते.’’ रतीने आपल्याच नादात पुस्तक गालाला लावून तो स्पर्श अनुभवायचा प्रयत्न केला.

‘‘मग तू मला कौतुकानं तपकिरी कागदाचं ‘कव्हर’ अगदी काळजीपूर्वक जराही सुरकुती न पाडता घालतेस. वरच्या बाजूला छान लेबल लावतेस. त्यावर स्वत:चं नाव, इयत्ता, तुकडी लिहून ‘विषय’ म्हणून माझं नाव घालतेस. तेव्हा मी अगदी नटूनथटून तयार होतो. मला ते खूप आवडतं.’’ पुस्तक आनंदाने भावना व्यक्त करीत होतं.

‘‘पण माझ्या दप्तरात पुस्तकं, वह्यंची कोंबाकोंबी होते. तुझं कव्हर फाटतं तेव्हा तुला वाईट वाटत असेल ना,’’ असं विचारतानासुद्धा रतीचा आवाज जड झाला होता.

‘‘हो वाटतं ना, पण तेव्हा तुझा इलाज नसतो. शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सगळी वह्यपुस्तकं शाळेत न्यायलाच हवीत ना! म्हणून तर आजकाल तुमचं दप्तर फार जड होतं म्हणे, अशी कुरकुर सर्वत्र ऐकायला मिळते खरी.’’

‘‘ते जाऊ दे, पण अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय कितीतरी प्रकारची पुस्तकं असतात ना. विविध भाषांमधील लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं, खूप चित्रांची पुस्तकं, मोठय़ांच्या कथा, कादंबऱ्या, कविता, प्रवासवर्णनं, ललित, आध्यात्मिक ग्रंथ आणि पाकशास्त्राची पुस्तकं.. आईने पाकशास्त्राचं पुस्तक उघडलं, की आज काय नवीन खायला मिळणार या कल्पनेने मी खूश होते. शिवाय वार्षिक दिवाळी अंक, मासिकं, साप्ताहिकं अशा कितीतरी प्रकारांनी तू ज्ञान, माहिती, मनोरंजन करत असतोस.’’ रतीच्या नजरेत कौतुक होतं.

‘‘कोणी काही लिहितंय असं कानावर आलं, की मला आपल्या संख्येत वाढ होणार म्हणून आनंद होतो. मग माझं लक्ष प्रकाशकांकडे लागून राहतं. त्यांनी मनावर घेतल्याशिवाय माझा जन्म कठीण.’’

‘‘कसा कसा आकार येतो रे तुला?’’ रतीने हातातलं पुस्तक उलटसुलट बघत विचारलं.

‘‘आधी लिहिलेल्या मजकुरात शुद्धलेखनाच्या चुका नाहीत ना, हे तपासलं जातं. मग पुस्तकाचा आकार ठरवून पानांवर तो मजकूर छापला जातो. वेगवेगळे भाग असतील तर त्यांना शीर्षकं दिली जातात. पहिल्या पानावर प्रकाशक, लेखक यांची माहिती, माझी किंमत अशा आवश्यक बाबींची नोंद असते. लेखकाचे मनोगत, प्रस्तावना अर्पणपत्रिका तयार होतात. चित्रकार सुंदर मुखपृष्ठ तयार करतो. मलपृष्ठावर लेखकाचा फोटो, पुस्तक उत्सुकतेने घ्यावेसे वाटेल, वाचावेसे वाटेल अशी पुस्तकासंबंधी माहिती किंवा अभिप्रायाची नोंद होते. आतही चित्रांची सजावट होते. पानांचे आकडे मला जाडी प्राप्त करून देतात. सरतेशेवटी नाव ठेवून माझं बारसं केलं जातं आणि मी वाचकांच्या हातात पडतो.’’ पुस्तकाने एका दमात सगळं सांगून टाकलं.

‘‘किती मजेदार प्रवास आहे तुझा. आता कुठलंही पुस्तक हातात घेतलं, की मला हे सारं आठवेल. अथपासून इतिपर्यंत बघितल्याशिवाय मला चैनच पडणार नाही.’’ रतीने हातातलं पुस्तक चाळायला सुरुवात केली.

‘‘रागावणार नसशील तर एक गोष्ट सांगू का? पुस्तक वाचताना कधी कोपरे, पानं दुमडायची नाहीत. वेदना होतात गं. बुकमार्कस् असतात ना, त्याचा वापर करायचा किंवा कोणतेही जुने जाहिरातींचे कागद असतात ना ते दुमडून तिथे ठेवायचे. काहीजण तर चक्क आपल्याला हवी असलेली पानेच फाडून घेतात. ही जखम न भरून येणारी असते. अशा अवस्थेत ज्याच्या हातात पडतो तो नाराज होतो आणि रागाने रद्दीतसुद्धा टाकून देतो. म्हणजे चक्क अस्तित्वावरच गदा! कशा यातना होत असतील विचार कर. अभ्यासाच्या पुस्तकांत तुम्ही मुलं महत्त्वाच्या शब्दांवर, वाक्यांवर, खुणा करता. खाली रेघ मारता. केवळ तुम्ही अभ्यास करता म्हणून ‘गुदगुल्या’ समजून या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो. पण धडय़ाच्या खालचे गाळलेल्या जागा भरा, जोडय़ा लावा हे प्रश्न सोडवताना चक्क उत्तरे लिहून ठेवता, ते मला अजिबात आवडत नाही. जरा स्मरणशक्तीला ताण द्या, आठवत नसेल तर धडा  पुन्हा वाचा, तेव्हा तुमचा अभ्यास योग्य दिशेने होईल आणि मला समाधान वाटेल. तुझ्याशी बोलताना खूप बरं वाटलं, पण थोडं जास्तच मोठ्ठं भाषण ठोकलं का गं मी?’’

‘‘नाही रे पुस्तका, उलट तू सांगितलेल्या गोष्टी मी नीट लक्षात ठेवीन आणि माझ्या  मैत्रिणींनाही सांगेन. आणखीन एक गंमत करणार आहे मी. खूण म्हणून मोरपीस किंवा पिंपळपान ठेवणार आहे. कशी वाटते कल्पना?’’

‘‘अगं, कसली कल्पना, कसलं मोरपीस.’’ आईने हलवून विचारलं. रती काहीच न बोलता उठली आणि पुस्तकांच्या कपाटाजवळ जाऊन त्यावर हात फिरवत राहिली. आज तीच पुस्तके तिला वेगळी वाटत होती.