मधुरा, मल्हार आणि सुट्टीत राहायला आलेली त्यांची आत्तेभावंडं जय आणि वीरजा खेळून घरी आले तेव्हा खोलीतला पांढऱ्या कांद्यांचा ढीग पाहून ‘‘अय्या! हे  काय आहे? आपलं घर आहे की कांद्याचं शेत?’’ मधुरा अक्षरश: किंचाळली. त्यावर  ‘‘अगं, आपल्या शेतात पहिल्यांदाच कांद्याचे पीक आले ना! ते माळीमामांनी डायरेक्ट इथेच पाठवले. त्यांना बिचाऱ्यांना इथल्या जागेची कल्पना नव्हती म्हणून हा सारा पसारा झालाय. आणि नेमके तुमचे आई-बाबा टूरवर गेलेत..’’ आजी गोंधळून गेली होती.

‘‘पण आज्जी, इतक्या कांद्यांचं आपण आता करायचं तरी काय?’’- मल्हार.

‘‘तोच विचार चाललाय माझा.. बरं, आता तुम्ही मला थोडी मदत कराल का?’’ – आजी.

आजीने तिथे बसकण मारून टोपली- टोपलीभर कांदे एकेका प्लॅस्टिक पिशवीत भरून त्या पिशव्या त्यांच्या मजल्यावरच्या आठ-दहा  शेजाऱ्यांकडे द्यायला पाठवले. तरीही कांद्यांचा ढीग बऱ्यापैकी उरला होताच.

‘‘आज्जी, आता किनई यापुढे आपण रोजच्या रोज कांद्याचेच पदार्थ खाऊ.’’ – वीरजा म्हणाली.

‘‘हो.. कांदाभजी, कांद्याचे थालीपीठ, कांदेपोहे, कांद्याची भाजी असं काय काय करू या.’’ – जयची सूचना.

‘‘हट् वेडय़ांनो, त्याने कितीसे संपणार हे कांदे! आणि दोन दिवसांनी तुम्हीच कंटाळाल खायला. बघू, उद्यापर्यंत काहीतरी सोय करू या,’’ म्हणत आजी आत गेली.

इतका वेळ शांत बसलेल्या मधुराचे डोळे एकदम चमकले. तिने तिघांना जवळ बोलावून म्हटले, ‘‘मला एक आयडिया सुचलीय. तुम्ही मला मदत करणार का, बोला?’’

‘‘आधी आयडिया सांग, मग ठरवू.’’ मल्हार म्हणाला.

‘‘अरे, आपल्या वाडीत खाली कट्टय़ावर बरेचजण वस्तू विकायला बसतात की नाही, तसंच आपण हे कांदे तिथे जाऊन विकले तर..?’’ – इति मधुरा.

त्यावर ‘‘हो.. हो.. चालेल. मस्त आयडिया.’’ मल्हार, जय, वीरजा यांच्या मोठय़ा आवाजाने बाहेर आलेल्या आजीने विचारले, ‘‘अरे, किती मोठय़ाने ओरडताय? आणि काय चालेल?’’

तेव्हा मधुराने आपली आयडिया लगेचच आजीला सांगितली. पण आजीने ताबडतोब त्याला नकार दिला. ‘‘अरे, आपल्या त्या एवढय़ाशा फार्महाऊसमध्ये आपण हौसेने थोडय़ा भाज्या आणि फळझाडे लावलीत ती काही पैसे कमावण्यासाठी नाही. थोडंफार काही येतं ते आपण खातो.. आणि कौतुकाने आपल्या घरचे म्हणून इतरांना त्यातले काही वाटतो. हे कांदेसुद्धा बाबाने हौसेने लावायला सांगितले ते विकून पैसे मिळवण्यासाठी नाही. हे विकण्याचे खूळ डोक्यातून काढून टाका पाहू.’’ आजीने समजावले.

‘‘पण आज्जी, आम्ही पण पैसे कमवायला नाही विकणार कांदे. आमचाही काहीतरी प्लॅन आहे. तो तुला नंतर सांगू. पण प्ली..ज.. उद्या आम्ही खाली कट्टय़ावर जातो ना, कांदे विकायला..’’ मधुराची री ओढत बाकीच्या तिघांनीही ‘‘आजी, प्ली..ज, प्ली..ज’’ म्हणत तिच्यामागे भुणभुण सुरू केली. अखेर आजीचा होकार मिळवूनच ते शांत झाले.

जय आणि वीरजाने त्यांच्या शाळेच्या फन फेअरमध्ये स्टॉल लावला होता. त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होताच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चौघांनी आजीच्या मदतीने कांद्यांचे सॉर्टिंग केले. घरात चार मध्यम टोपल्या कांदे ठेवून बाकीच्या कांद्यांच्या सुकलेल्या लांब लांब पातींची गाठ बांधली आणि प्रत्येकी २०-२५ कांद्यांची एक जुडी अशा भरपूर जुडय़ा तयार झाल्या. ‘दहा रुपयाला एक जुडी’ हा भाव त्यांनी नक्की केला. तसेच मधुरा सर्वाची ताई असल्याने पैशांचा व्यवहार तिने करायचा असे ठरले. त्यासाठी तिने ऐटीत आईची पर्स खांद्याला अडकवली. पोटपूजा करून झाल्यावर सर्वानी त्या जुडय़ा चार मोठाल्या पिशव्यांत भरल्या. आजीचा आशीर्वाद घेऊन सगळे उत्साहाने कट्टय़ाशी पोहोचले.

येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायला ‘‘कांदे घ्या कांदे.. ताजे ताजे कांदे..’’ मधुराने लाजत लाजत सुरुवात केली. तेव्हा वीरजा आणि मल्हारनेही ‘‘कांदे घ्या कांदे.. आत्ताच शेतातून आणलेले कांदे..’’ म्हणत कांदे विकायला सुरुवात केली. सुरुवातीला वाडीतल्याच ओळखीच्या लोकांसमोर असे ओरडताना खासकरून मल्हार आणि मधुराला जरा लाजल्यासारखे झाले. पण बरेच जण कौतुकाने तिथे येऊन त्यांच्याकडून जुडय़ा घ्यायला लागले तेव्हा सगळ्यांनाच मज्जा वाटायला लागली. त्यांची मैत्रीण प्रचीतीसुद्धा हौसेने कांदे विकण्यात सामील झाली.

‘‘कांदे घ्या कांदे.. गोरे गोरे कांदे.. गोरे गोरे कांदे घ्या..’’ जयने नवीन स्टाईलने ओरडायला सुरुवात केली. तेव्हा ‘‘ए, कांदे काय गोरे असतात का? पांढरे कांदे म्हणतात..’’ मल्हारने समजावले. त्याबरोबर ‘‘मग काय झालं गोरे कांदे म्हटलं तर? आपण ‘एलिझाबेथ एकादशी’ सिनेमा पाहिला होता ना- त्यात नाही का ती मुलगी ‘गरम गरम बांगडय़ा घ्या’ म्हणते. जर त्यांनी ‘बांगडय़ा गरम’ म्हणून विकल्या, तर आपल्या पांढऱ्या कांद्यांना ‘गोरे गोरे कांदे’ म्हणून का नाही विकायचे?’’ असे म्हणून जयने मुद्दामच पुन्हा ‘‘घ्या, कांदे घ्या कांदे.. गोरे गोरे कांदे..’’ म्हणत ओरडायला सुरुवात केली. सगळेच  मग ‘गोरे गोरे कांदे घ्या..’ ओरडू लागले. त्या मजेशीर आरोळीने बरेच जण त्यांच्याभोवती कांदेखरेदीला जमले. एकतर कांदे खरोखरच ताजे आणि छान दिसत होते. बाजारापेक्षा स्वस्तही होते. शिवाय वाडीतल्याच या गोड मुलांना प्रोत्साहन म्हणून बऱ्याचजणांनी कांदे खरेदी केले. एक मावशी पाच जुडय़ा मागायला आल्या तेव्हा त्यांच्या चारही पिशव्या रिकाम्या झाल्याचे मुलांच्या लक्षात आले. मावशींचा निराश चेहरा पाहून मधुराला घरातल्या चार टोपल्या आठवल्या. त्यांना थांबायला सांगून पटकन् तिने घरी जाऊन त्यांच्यासाठी कांदे आणून दिले. शेवटच्या ग्राहक म्हणून त्यांना तिने मॉलमध्ये देतात तसे चार जुडय़ांवर एक जुडी फ्री देऊन खूश करून टाकले. कांद्यांनी भरलेल्या चारही पिशव्या जरी रिकाम्या झाल्या होत्या तरी मधुराची पैशांची पर्स मात्र बऱ्यापैकी भरली होती. कट्टय़ावरचा कांद्याचा पालापाचोळा वगैरे साफ करून सगळे विजयी चेहऱ्याने घरी आले तेव्हा आजीला त्यांचे किती कौतुक करू असे झाले होते. आजीने त्यांच्यासाठी कांदाभज्यांचा मेनू तयार ठेवला होता. पण त्याआधी हात-पाय धुऊन सगळे मधुराभोवती हिशेबासाठी जमले. एकूण विकलेल्या जुडय़ा आणि आलेल्या पैशांचा हिशेब मधुराने बरोब्बर जुळवला. स्वत:च्या मेहनतीतून मिळालेले पैसे पाहून ‘येस्स..’ म्हणत सर्वानी आनंदाने एकमेकांना मिठय़ाच मारल्या. नंतर मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असलेल्या आजीकडे सर्वानी मोर्चा वळवला आणि तिच्या हाती ते पैसे ठेवले.

‘‘आज्जी.. तू म्हणालीस ना, की आपण शेतातल्या वस्तू विकत नाही! पण आम्ही आज कांदे विकले ना, त्यामुळे आम्हाला आज  वस्तू विकायचा नवीन अनुभव मिळाला ग.’’ मल्हार, जयचा आजीला पटवायचा प्रयत्न.

‘‘ त्यामुळे आमची ही सुट्टी पण आता आमच्या कायमची लक्षात राहील.’’ – वीरजा.

‘‘आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सगळ्यांनी असे ठरवलेय, तू हिंगण्याला भाऊबीज फंडासाठी दरवर्षी पैसे पाठवतेस ना, त्यात या आमच्या मेहनतीच्या पैशांची भर टाक. आम्ही चौघांनी हे कालच ठरवले होते. हो की नाही?’’.. मधुराच्या प्रश्नाला सगळ्यांनी एका सुरात होकार दिला. तेव्हा त्यांना जवळ घेऊन शाबासकी देताना आजीचे डोळेच भरून आले.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com