एका रात्री गंमतच झाली,

चित्र काढता काढता मला झोप लागली.

स्वप्नात कमाल झाली,

चित्रकलेची वही मला आभाळात दिसली!

 

माझं चित्र सरांना कधी कळतच नाही,

चित्राच्या कोपऱ्यात मोठ्ठं प्रश्नचिन्ह नेहमी.

आभाळात ते चक्क मला उत्तरेला दिसलं,

सरांच्या सहीऐवजी ध्रुवबाळ गवसलं.

 

प्रश्नचिन्हाच्या शेपटीवरून प्रवास सुरूझाला,

स्वाती, चित्रा नक्षत्रांवरून हस्तावर आला.

नंतर मला दिसली छान छान परी,

खुर्चीत मोठय़ा ऐटीत बसली होती स्वारी.

 

एकदोन नाही तर चित्रांनीच भरलं होतं आकाश,

आठवली तेवढी सकाळी लिहून ठेवली खास.

बाबांना ही गंमत सांगितली खरी,

म्हणाले ते मला, ‘तू वेडाच भारी! आकाशात चित्रं दिसतील का कधी?’

पण देवाशप्पथ खरं सांगतो, गोष्ट आहे खरी.

चित्रकलेची वही मला आकाशात दिसली!

माझ्या छोटय़ा दोस्तांनो, आज ज्या पुस्तकाविषयी मी लिहिणार आहे, त्याविषयी मी शाळेत असतानाच लिहून ठेवलं आहे. तीच ही कविता, शाळेत असताना लिहिलेली. हे पुस्तकदेखील मला बाबाकडूनच मिळालं. या पुस्तकात मला काय आवडलं हे मला आजतागायत कळलेलं नाही. काळ्या पाश्र्वभूमीवर काढलेली रात्रीच्या आकाशाची चित्रं आणि तारे, ग्रह, तेजगुच्छ, धूमकेतू, आकाशगंगांची खूप सारी माहिती असं हे पुस्तक पहिल्याक्षणी पाहताच खास कंटाळवाणंच आहे.

मात्र हे पुस्तक माझ्याकरता रोज रात्री जिवंत होत असे. आई-बाबासोबत रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी जाताना आकाशातल्या चांदोबासोबतच पूर्वेकडून उगवणारे किंवा पश्चिमेकडे मावळणारे तेजस्वी बुध, शुक्र पाहायचो. मंगळाचा लालबुंद ठिपका मजेदार वाटायचा. पुढे केव्हातरी या आमच्या प्रवासात बाबाने आणलेलं नवं खेळणं सामील झालं. एक साधीशीच द्विनेत्री. मात्र त्यातून पहिल्यांदा चंद्रावरची विवरं पाहिली तेव्हा चंद्र किती जवळ, अगदी हाताच्या अंतरावर आला याची किती अपूर्वाई वाटली होती, हे आजही आठवतं. मग मंगळाचा लाल ठिपका थोडा जवळ आला. गुरूचे चंद्र पाहिले. एकदा रात्री समईच्या वातीवर काच काळी करून दुसऱ्या दिवशी शाळेला चांगला तासभर उशीर करून आई-बाबांसोबत खंडग्रास सूर्यग्रहण पाहिलं. व्याधाचे, सप्तर्षीमधले द्वैती तारे पाहताना, मृग नक्षत्रातला एम् ४७ हा तारागुच्छ पाहताना भान हरपून जायचं.

या माझ्या रात्रीच्या सफरीचा सोबती म्हणजे आकाशाचा नकाशा किंवा एटलास असलेलं हे पुस्तक. वाचायला लागलो तेव्हा तर या पुस्तकाची, आकाशदर्शनाची गोडी दिवसेंदिवस वाढतच गेली. ग्रह-नक्षत्रांच्या आकाराविषयी, त्यांतल्या महत्त्वाच्या ताऱ्यांविषयीच्या गोष्टी वाचताना आपोआपच अनेक गोष्टी लक्षात राहायला लागल्या. शिवाय, या चिमुकल्या ग्रह-ताऱ्यांचे आकार, आयुष्यमान, त्यांचं आपल्यापासूनचं अंतर हे सारं अवाढव्य जग माझ्या डोक्यात रुंजी घालायचं. मृगातला तो मला आवडणारा तारागुच्छ आपल्यापासून १,६०० प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे. आपल्याला रोज दिसणारा सूर्य आठ प्रकाशमिनिटांच्या अंतरावर आहे. आपल्याच ग्रहमालेतला गुरू ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा कितीतरीपट मोठा आहे आणि त्याला कितीतरी अधिक चंद्र आहेत वगैरे वगैरे माहितीचा खजिनाच या पुस्तकातून माझ्यासमोर खुला व्हायचा. या अनोख्या पुस्तकामुळे, त्यातल्या अजब-गजब माहितीमुळे, आणि रात्री आकाशात पाहिलेल्या अनंत गमतींमुळे मी वर्गमित्रांच्यातही भाव खाऊन जायचो.

आकाशदर्शनाच्या या छंदापायी मी किती वेडा झालो होतो याची कल्पना तुम्हाला माझ्या कवितेवरून आलीच असेल. जसजसा मोठा होत गेलो तसतसा अनेक खगोलीय घटनांचा मागोवा घेत राहिलो. कॉमेट, हेल-बॉप अशा धूमकेतूंना पाहण्याकरता जिवाचं रान केलं. अनेक निसर्गसहलींना जाताना पक्षी पाहण्याकरता जशी द्विनेत्री बाळगायचो तशीच एक उत्तम दुर्बीण रात्रीचं आकाश न्याहाळण्याकरता घ्यायची अशी माझी खूप इच्छा होती.

आता मात्र नव्याच काळजीने ग्रासलं आहे. आपल्या शहरा-गावांतून रात्रीचं एवढं प्रकाशप्रदूषण असतं की टिपूर चांदणं पडलेलं आकाश पाहण्याकरता दूर कुठेतरी खेडय़ापाडय़ात, जंगलातच जावं लागतं. घराघरातल्या दिव्यांपासून ते रस्त्यांवरच्या, गाडय़ांच्या, जाहिरातींच्या दिव्यांमुळे आकाशात ग्रह-तारे दिसेनासे झाले आहेत.

माझ्या छोटय़ा वाचकांनो, आता तुम्हाला आकाशदर्शनाच्या छंदाची मजा अनुभवायची असेल, तर आता या पुस्तकाचा आणि कधी गावी किंवा जंगलसफरींवर गेलात तर दिसणाऱ्या आकाशाचाच आधार आहे. मी सांगितलेलं पुस्तकच नाही तर इतरही अनेक लेखकांची अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. हौशी खगोल अभ्यासकांच्याच भाषेत सांगायचं तर, ‘शोधा म्हणजे सापडेल!’

हे पुस्तक कुणासाठी? आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांविषयी जिज्ञासा असणाऱ्या माझ्या लहानमोठय़ा वाचकांसाठी.

पुस्तक : सृष्टिज्ञान आकाशदर्शन अ‍ॅटलास अथवा हा तारा कोणता?

लेखक : प्रा. गो. रा. परांजपे

प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ

ideas@ascharya.co.in