मातृभाषेव्यतिरिक्त विविध भाषा जर येत असतील तर त्याचे होणारे फायदे हे केवळ मोठय़ांनाच नाही, तर बालकांनाही आता माहिती झालेत. आजच्या बालमित्रांची भाषा ही केवळ त्यांच्या मातृभाषेपुरतीच मर्यादित राहिली नसून, शाळेत, सोसायटीत, विविध क्लासेस्मध्ये त्यांचा वावर असल्यामुळे मातृभाषेबरोबरच अन्य भाषाही मुलं सहजपणे बोलतात. ज्यांना विविध भाषा शिकायला-बोलायला, विविध देशांमधील मित्र-मैत्रिणी करायला आवडते, विविध भाषांमधील चित्रपट सबटायटल्सशिवाय असले तरी बघायला आवडतात, त्यांना तर जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषा शिकणे आता सोपे झाले आहे. अर्थात त्यासाठी कष्टांची तयारी आणि नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर मार्ग सापडू शकतो. अशाच मंडळींसाठी एक सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे- तो देवनागरीतून जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषा शिकण्याचा. देवनागरी लिपीचा उपयोग करून संस्कृत, हिंदी, मराठी, कोंकणी, सिंधी अशा अनेक बोलीभाषा लिहिता येतात. त्यामुळे याच लिपीत या भाषा शिकताना सोपे जाते, हे जाणून ‘पामीर पब्लिकेशन’च्या पटवर्धनांनी तीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. ‘बालकांचे फ्रेंच’, ‘सर्वाचे इटालियन’ ही दोन पुस्तके प्रा. अरविंद पटवर्धन यांनी लिहिली असून ‘आपले जर्मन’ या पुस्तकाचे लेखन अंजली पटवर्धन यांनी केले आहे. या पुस्तकांचा उपयोग करून सहा ते दहा या वयोगटातील मुले जर्मन, फ्रेंच, इटालियन या तिन्ही भाषा बोलण्यास सुरुवात करू शकतील. ही तीनही पुस्तके मराठी येणाऱ्या मंडळींसाठी आणि विशेषत: प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लिहिली आहेत. ‘सर्वाचे इटालियन’ या पुस्तकात इटालियन मूळ अक्षरे, संख्या क्रम, नावे-आडनावे-देश, सामाजिक आचार, नाती-गोती, पाठांतरासाठी शब्द, भारतीय फळे, थंड प्रदेशातील फळे, अन्नपदार्थ, विविध भारतीय भाज्या, युरोपियन भाज्या, कपडे, पाळीव प्राणी, पक्षी, वर्गातल्या वस्तू, विविध रंग, किराणा, पेयांची नावे, जेवण, क्रोकरी, ऋतू, हवामान, सूचना, इटालियन लोकांचे कौतुक, इटालिया कसे आहे असे? अशा विविध गोष्टींची माहिती चाळीस पानी साठ रुपयांच्या पुस्तकात मिळते. ‘बालकांचे फ्रेंच’ पुस्तकात इटालियन पुस्तकाप्रमाणेच सर्व माहिती असून, फ्रेंचच्या पुस्तकाबरोबरच ऑडियो कॅसेटदेखील उपलब्ध आहे. या बत्तीस पानी पुस्तकाची किंमत चाळीस रुपये आहे. ‘आपले जर्मन’ या पुस्तकातही इटालियन, फ्रेंच भाषेप्रमाणे जर्मन मुळाक्षरे, अंकसंख्या अशा सर्व माहितीबरोबरच जर्मन लोकांचे कौतुक, जर्मन देश कसा आहे याविषयीची माहिती आहे. चाळीस पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत साठ रुपये आहे. या पुस्तकात रोमन लिपीबरोबरच सोपे व्याकरण दिले आहे. या छोटेखानी पुस्तकांच्या माध्यमातून जर्मन, फ्रेंच, इटालियन शिकण्याची इच्छा असणाऱ्या मंडळींचा भाषा शिकण्याचा श्रीगणेशा होऊ शकतो आणि त्यातून पुढे अधिक अभ्यास करून करिअरच्या वेगळ्या संधी मिळण्यास मदत होऊ शकते. श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com