मागल्या लेखामध्ये तुम्ही किनाऱ्यानजीकच्या वनस्पतीजीवनाची ओळख करून घेतली. या लेखामध्ये मी तुम्हाला भरती-ओहोटीदरम्यानच्या प्रदेशातल्या खास जीवनाची सफर घडवतो. तर मग तय्यार व्हा पाण्यात बुडी मारायला!

समुद्रात बुडी मारून सागरी जीवन पाहण्याचा आनंद सगळ्यांनाच घेता येईल असं नाही. मात्र भरती-ओहोटीच्या क्षेत्राची गंमत सगळ्यांनाच अनुभवता येते. भरतीवेळी संपूर्णपणे खाऱ्या पाण्याखाली बुडून जाणाऱ्या आणि ओहोटीवेळी संपूर्णपणे पाण्याशिवाय असणाऱ्या या प्रदेशातील सजीव या भरती-ओहोटीच्या पाण्याच्या चक्राला सरावलेले, अनुकूल असेच असतात.

भरती-ओहोटीच्या या क्षेत्राचे चार प्रमुख भाग पाडता येतात- लाटांच्या उसळणाऱ्या पाण्याने चिंब होणारा भाग, भरतीरेषेनजीकचा, मध्यरेषेजवळचा आणि ओहोटीरेषेच्या आसपासचा भाग. या चारही भागांमध्ये विविध प्रकारचे, त्या भागाला वैशिष्टय़पूर्ण अनुकूलन असलेले सजीव आढळतात. उदाहरणार्थ, खडकाळ किनाऱ्यांवरच्या लाटांच्या उसळणाऱ्या पाण्याने चिंब होणाऱ्या भागामध्ये नारिंगी-राखाडी शैवाक अर्थात लायकेन्सच्या वसाहती आढळतात. सोबतच, चिमुकल्या समुद्री गोगलगायींचं अन्न असणाऱ्या शैवालांच्या प्रजातीदेखील आढळतात. भरतीरेषेनजीकच्या भागामध्ये चुनखडीपासून बनवलेल्या छोटय़ा पेटय़ांसारखे दिसणारे बार्नकल्स दिसतात. किनाऱ्यावरच्या खडकांवर, जहाजांच्या पाण्याखालच्या भागामध्ये किंवा देवमाशांसारख्या मोठाल्या समुद्री जिवांच्या अंगावर चिकटलेले शिंपल्यांसारखे जीव आठवतात का? तेच हे बार्नकल्स मध्यरेषेजवळच्या भागामध्ये प्रामुख्याने शंख, शिंपले आणि गोगलगायी नांदतात.  तर ओहोटीरेषेच्या आसपासच्या भागामध्ये समुद्री वनस्पतींसोबतच समुद्रफूल, अर्चिन्स, समुद्रकाकडी, खेकडे, तारामासे, गोगलगायी आणि समुद्री-किडय़ांच्या विविध प्रजाती आढळतात.

ऋषिकेश चव्हाण

शब्दांकन : श्रीपाद

rushikesh@wctindia.org