जपानमधील एका खेडेगावात एक शेतकरी जोडपं राहत होतं. शेतकऱ्याचं नाव होतं मिया ऊसुई. त्याच्या पत्नीचं नाव होतं चँग कै. या दोघांचं एक लहानसं शेत होतं. शेताच्या एका बाजूला छोटंसंच घर होतं. दोघेही पती-पत्नी आपल्या शेतात दिवसभर राबत. खूप कष्ट करत. धरतीनं पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरे. दोघेही आनंदी वृत्तीचे होते. शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करत. कोणाच्याही अडीअडचणीला धावून जात. कष्ट हाच त्यांनी आपला परमेश्वर मानला होता. दोघेही सुखानं, आनंदानं जीवन जगत होते. त्यांच्या मनाला एकच दु:ख होतं आणि ते म्हणजे त्यांना बाळ नव्हतं.

फ्युजियामा हा जपानमधील एक पर्वत! जपानी लोक त्याला देव मानत. नवस केला असता फ्युजियामा पावतो असा जपानी लोकांचा समज होता.

सकाळची वेळ होती. चँग कैने सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. दूरवरून फ्युजियामा दिसत होता. चँग कैने फ्युजियामाला हात जोडले. डोळे मिटले. फ्युजियामाची मनापासून प्रार्थना केली असता तो  इच्छित गोष्ट देतो अशी चँग कैची भावना होती. तिनं मनोभावे त्याची प्रार्थना केली. ‘‘फ्युजियामा, आम्ही दोघेही आमच्या संसारात सुखी आहोत; पण घरात बाळ नाही. फ्युजियामा, आम्हाला आणखी सुखी करण्यासाठी तू आम्हाला एखादं बाळ नाही का देऊ शकणार?’’ रोजच्यासारखी प्रार्थना करून चँग कै घरात आली.

मिया ऊसुई आणि चँग कै रात्रीच्या वेळी अंगणात बसले होते. पौर्णिमेचं सुंदर चांदणं पडलं होतं. मंद, गार वारा वाहत होता. चंद्रबिंब मनाला आनंद देत होतं. दोघांचंही लक्ष चंद्राकडे गेलं. त्यांना त्या चंद्रबिंबावरून उतरत असलेली एक आकृती दिसली. ते एकटक त्या आकृतीकडे पाहू लागले. लहानशी दिसणारी ती आकृती मोठी मोठी होत गेली. त्या दोघांनी पाहिलं, चंद्रावरून एक सुंदर स्त्री त्यांच्या अंगणात येऊन उभी राहिली. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं.

‘‘कोण तू?’’ शेतकऱ्यानं विचारलं.

‘‘मी मून लेडी.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘चंद्रावर राहणारी स्त्री.’’

‘‘तुझ्या हातात काय आहे?’’

‘‘एक छोटंसं बाळ.’’

‘‘काय? बाळ?’’

‘‘हो, तुम्हाला बाळ हवं होतं ना? मग घ्या हे बाळ. फ्युजियामानं हे बाळ तुमच्यासाठी पाठवलंय.’’

‘‘हे बाळ..’’

‘‘ही मुलगी आहे.’’

‘‘काय हिचं नाव?’’

‘‘हिचं नाव मून बीम.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘चंद्रकिरण.’’

‘‘किती सुंदर आहे ही मून बीम!’’ चँग कै त्या बालिकेकडे पाहत म्हणाली.

‘‘आवडली?’’

‘‘हो, खूपच. आम्हाला पाठवलीय ही फ्युजियामानं? खरंच?’’ अत्यानंदानं चँग कै म्हणाली.

‘‘हो. हिचा तुम्ही दोघेही चांगला सांभाळ करा, पण..’’

‘‘पण काय?’’

‘‘ही वीस वर्षांची झाली की, मी हिला पुन्हा घेऊन जाईन.’’

‘‘पण असे का?’’

‘‘फ्युजियामानंच तसं सांगितलं आहे.’’

चँग कै थोडीशी हिरमुसली. मिया ऊसुई  तिला म्हणाला, ‘‘अगं, देवानं पाठवलेलं आपण आनंदानं घेतलं पाहिजे. आपणा दोघांनाही किती आनंद मिळेल या मुलीमुळे. आतापर्यंत आपण दोघंच तर राहत होतो. द्या ती मुलगी आम्हाला.’’ मिया ऊसुई मून लेडीला म्हणाला.

मून लेडीनं त्या जोडप्याच्या हातात ती बालिका दिली आणि ज्या चंद्रकिरणांवरून ती उतरली होती, त्यावरूनच ती चंद्रबिंबाकडे परतली. नंतर चंद्रबिंबातच विलीन झाली.

आता मिया ऊसुई आणि चँग कै हे दोघेही मून बीममुळे खूप आनंदी आणि उल्हसित झाले. मून बीम फार सुंदर आणि गोड होती.

शेतकरी आणि त्याची पत्नी या दोघांनाही मून बीमचा खूप लळा लागला. तिच्यासाठी त्यांना दिवस पुरेनासा झाला. मून बीमला कुठे ठेवू नि कुठे नको असं त्यांना होई.

मिया ऊसुई एकटाच शेतावर जाई. चँग कैचा वेळ घरकाम आणि मून बीमचं संगोपन करण्यात जाई.

मून बीम आता मोठी होऊ लागली. तिच्या आईनं तिच्यासाठी छान छान कपडे शिवले. निरनिराळ्या रंगांच्या आकर्षक कपडय़ांमध्ये मून बीम खूपच गोड दिसे. चँग कै तिच्यासाठी तिला आवडणारी फुलं तोडून आणी. त्या दोघांनी तिच्यासाठी तऱ्हेतऱ्हेची खेळणी आणली. मून बीम आपल्या आई-वडिलांना खूप आनंद देई. ती स्वभावानं मनमिळाऊ होती. तिचं सगळ्यांशी चांगलं पटे. आपल्या गोड स्वभावानं ती सगळ्यांची खूप लाडकी झाली. तिचा मित्रपरिवारही मोठा होता.

पाहता पाहता मून बीम लग्नाची झाली. आता तिच्यासाठी वर बघणं आवश्यकच होतं. ‘‘आपल्या गोड गोजिरवाण्या मून बीमला साजेसाच नवरा पाहून द्यायला हवा.’’ चँग कै  पतीला म्हणाली.

‘‘हो खरंच, माझ्या लक्षातच आलं नाही.’’ मिया ऊसुई म्हणाला.

एव्हाना मून बीमच्या सौंदर्याची, तिच्या गुणांची ख्याती सर्वदूर पसरली होती.

उतिनच्यॉ हा त्या प्रदेशाचा राजपुत्र होता. त्याच्याही कानावर मून बीमच्या रूपगुणांची ख्याती पोचली. तिला एकदा बघावं आणि तिच्याशी लग्न करावं असं त्याच्या मनात आलं. त्यानं आपली इच्छा आपल्या पित्याजवळ बोलून दाखवली.

आणि एके दिवशी राजा-राणी आपल्या पुत्राला घेऊन मिया ऊसुई आणि चँग कै यांच्या घरी येऊन पोचले. प्रत्यक्ष राजा आपल्या परिवारासह आपल्या घरी आल्याचं पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी आपल्यापरीनं सगळ्यांचं स्वागत केलं.

‘‘मिया ऊसुई, आम्हाला तुमची मुलगी मून बीम आवडली आहे. तिचं लग्न राजकुमार उतिनच्यॉ ह्य़ाच्याशी व्हावं अशी आमची इच्छा आहे. कृपा करून नाही म्हणू नका.’’ राजा म्हणाला.

दोघाही पती-पत्नींना खूप आनंद झाला. आपली मुलगी राजपुत्राची बायको होणार, राजदरबारी जाणार म्हणून ते खूप खूश झाले.

मून बीमच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सगळीकडे आमंत्रणं गेली. खूप उत्साहाचं वातावरण होतं. मून बीमसाठी तिच्या आई-वडिलांनी नवीन कपडे, दागिने घेतले.

लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाची वेळ संध्याकाळची होती. सगळा राजपरिवार लग्न समारंभास आला होता. मून बीमच्या मित्र-मैत्रिणी, मिया ऊसुई आणि चँग कै यांचे नातेवाईक सारे जमले. आता दोघांचं लग्न होणार एवढय़ात.. एवढय़ात चंद्रकिरणांवरून मून लेडी उतरताना दिसली. मून बीम आज वीस वर्षांची झाली होती. मून लेडी तिला न्यायला आली आणि तिला बघताच मिया ऊसुई आणि चँग कै यांना मून लेडीचे शब्द आठवले. त्यांना खूप वाईट वाटलं. मून बीम जाणार?

सगळ्यांनीच मून लेडीकडे पाहिलं. तिनं मून बीमचा हात धरला आणि.. तिला घेऊन ती निघाली. सगळ्यांनाच खूप दु:ख झालं. सगळ्यांचे डोळे आसवांनी भरून गेले. मून बीमच्याही डोळ्यांत पाणी आलं. राजपुत्र उतिनच्यॉ ह्य़ाचेही डोळे पाण्यानं डबडबले.

..आणि सगळ्यांच्याच नेत्रांतील अश्रूंचे झाले काजवे. हे काजवे रात्री चमचमतात. रात्रीच्या अंधारात मून बीमची आठवण करून देतात.

मंगला दिघे

(जपानी लोककथा)