रविवारचा बाजार भरला होता. सकाळची वेळ. निरनिराळय़ा हिरव्या रंगाच्या ताज्या ताज्या भाज्या ऐटीत टोपल्यांमध्ये विसावल्या होत्या. प्रत्येक भाजीला आपल्या रंगरूपाचा गर्व होता. सगळय़ा खेळीमेळीने राहायचं सोडून, एकमेकींचा राग राग करीत ‘मीच कशी श्रेष्ठ’ अशा तोऱ्यात टोपलीत बसल्या होत्या. वांगं, फुलकोबी, मटार, टोमॅटो, श्रावणघेवडा, कांदे, बटाटे, आलं-लसूण, सिमला मिरची सगळय़ा भाज्या होत्या. भाजीवाल्याकडे अजून गिऱ्हाईक यायला सुरुवातही झाली नव्हती. शेवटी टोमॅटोंनी भांडण उकरून काढलंच. तो शेजारच्या काटेरी वांग्याला म्हणाला, ‘‘शी! नेमकं बरं हे टोचत आहेत, आई गं? माझं इतकं छान नाजूक अंगं. भद्द, जाडंभरडं, ढब्बू काटेरी वांगं कुठलं!’’ मग काय, ते वांगं थोडीच इतकी सारी निंदा ऐकून शांत बसवणारे. चिडून वांगं म्हणालंच, ‘‘ए, जा रे जा. पिचकू टमाटय़ा, जरा दाबला गेलास ना तरी लेचापेचा होऊन जातोस. आणि कसली आंबट चव तुझी. आलाय मोठा मला नावं ठेवणारा. माझ्या नखाची, सॉरी देठाची तरी सर आहे का तुला? माझी भाजी लोक  मिटक्या मारत खातात म्हटलं!’’

त्यावर टोमॅटो तोंड वेडावत म्हणालाच, ‘‘ए, जा रे जा, टोमॅटो सूपंच जास्त आवडतं. त्या भरल्या वांग्यापेक्षा किंवा तुझ्या त्या भरतापेक्षा.’’ या दोघांचं भांडण चालू असताना हसण्याचा आवाज आला. टोमॅटो आणि वांग्याने वळून बघितलं तर सिमला मिरची त्यांना हसत होती. ती म्हणाली, ‘‘दोघं भांडताय खरे, पण तुम्हाला माहित्ये का, माझ्याशिवाय कुणाचं पान हलत नाही. चायनीज् पुलाव, पिझ्झा, सगळ्या चविष्ट पदार्थामध्ये मीच हवी असते. माझी शान काही औरच आहे म्हटलं!’’

‘‘आ हा हा हा.’’ तिला चिडवत श्रावण घेवडा बोलू लागला, ‘‘काय पण आकार, काय पण रूप, ढब्बू, गोलमटोल कुठली. तू असतेस खरी सगळ्या पदार्थामध्ये. पण ते पदार्थ खाताना, तांदळातला खडा काढावा त्याप्रमाणे कित्येक जण तुला बाहेर काढून ठेवतात. तू कित्येकांना आवडत नाहीस. मी बघ किती सुंदर, बारीक.’’ श्रावण घेवडय़ाचा रुबाब बघून मटार थोडंच गप्प बसणार होता. ‘‘सगळ्यांत जास्त रुबाबदार मीच आहे. माझ्या टपोऱ्या हिरव्या हिरव्या दाण्यांचा सगळ्यांना मोह पडतो. पुलावला तर माझ्या हजेरीशिवाय सौंदर्य येतच नाही म्हटलं. इतकंच काय, मला सोलायला बसल्यावरही सर्वाना मटारचे दाणे तोंडात टाकायचा मोह होतो.’’

‘‘आता मात्र तुमचं भांडण ऐकून हसून हसून माझ्याच डोळ्यात पाणी येतंय,’’ कांदा न राहावून बोलू लागला. ‘‘तुमच्यापैकी कोणतीही भाजी माझ्याशिवाय पूर्ण होत नाही. माझ्याशिवाय स्वयंपाकच पूर्ण होत नाही.’’

‘‘चूक, साफ चूक, स्वयंपाक माझ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ’’ बटाटा गर्वाने बोलू लागला- ‘‘तू तर काय, सर्वाना रडवायलाच बसलेला असतोस जणू.’’

‘‘माझ्याशिवाय स्वयंपाकाला चवच येत नाही.’’ कोथिंबीर कुजबुजू लागली. चिडून लाल-जांभळे झालेले बीट म्हणाले, ‘‘अरे, कुणाचा कशासाठी आणि किती उपयोग होतो हे महत्त्वाचं नाही, तर कुणामध्ये काय चांगलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आता माझंच बघा ना, आयर्नची कमी असेल तर..’ बीट रुटचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सगळ्या भाज्या ‘‘माझ्यात फायबर,’’, ‘‘माझ्यात काबरेहायड्रेट्स’’, ‘‘माझ्यात आयर्न’’, ‘‘माझ्यात मिनरल्स’’, ‘‘मी त्वचेसाठी छान’’, ‘‘मी केसांसाठी’’, ‘‘मी.. मी..’’ असं स्वत:चं महत्त्व सांगत अजूनच जोरजोराने भांडू लागल्या. अगदी आलं-लसूणसुद्धा ठसक्यात भांडत होते. कोण श्रेष्ठ, ते काही ठरत नव्हतं. मग सगळ्यांना गप्प बसवत फुलकोबी जोराने ओरडला, ‘‘थांबा, आता समोर बघा, एक छोटी मुलगी आणि तिची आई भाजी घ्यायला आल्या आहेत, बघुया त्या कोणती भाजी घेतात. त्या जी कोणती भाजी घेतील ती श्रेष्ठ! झालं, सगळ्या भाज्या ‘मीच श्रेष्ठ ठरू दे’ अशी मनातल्या मनात प्रार्थना करत श्वास रोखून पाहू लागल्या.

‘‘आई, आज आपलं काय ठरलंय, लक्षात आहे ना तुझ्या?’’ अनिषाने भाजी घ्यायला उभ्या असलेल्या आईला आठवण करून दिली.

‘‘हो गं बाळा, आहे माझ्या लक्षात.’’ आईने हसत म्हटलं आणि काय आश्चर्य, तिने सगळ्या भाज्या थोडय़ा थोडय़ा विकत घेतल्या. सगळ्या भाज्या एकाच पिशवीत दाटीवाटीने मिसळल्या होत्या. आता काय बोलावं आणि काय भांडावं कुणाला काहीच समजत नव्हतं. अनिषा आणि तिची आई घरी पोहचल्या. सगळ्या भाज्या एकदम चिडीचूप होत्या. पिशवीत त्यांना अनिषाचं बोलणं ऐकू आलं.

‘‘आजी, आम्ही पावभाजीची तयारी आणली. आज संध्याकाळी पावभाजी करणारे आई. टेस्टी टेस्टी, यमी यमी, माय फेवरेट पावभाजी!’’अनिषा आनंदाने ओरडत होती. सगळ्या भाज्यांना कळून चुकलं की आपण उगाच भांडत होतो. एखाद्या एकटय़ाच भाजीपेक्षा सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली पावभाजीच जास्त आवडते सगळ्यांना. आपण एकत्र राहिलो की किती छान पदार्थ तयार होतो. ‘एकीचं बळ’वाल्या गोष्टी भरपूर ऐकल्यात, पण प्रत्यक्ष अनुभवच आला सगळ्या भाज्यांना.

राजश्री राजवाडे-काळे shriyakale@rediffmail.com