‘‘तेजस, आटप बरं लवकर, शाळेला उशीर होईल नाही तर!’’ असं  म्हणून नमितानं त्याला शाळेत पाठवलं. तो गेल्यावर तिनं आपली घरातली आणि बाहेरची कामं आटोपली, तोपर्यंत तेजस परत आलाही. आल्या आल्या जेवण करून तो  टी.व्ही. लावून बसला. नमिता आतलं आवरून बाहेर आली. तेजस कार्टूनवर डोळे खिळवून बसला होता.

‘‘चल बेटा तेजस, झोपायचं ना आता.’’

‘‘एवढं कार्टून संपलं की मग..’’ तेजसनं टी.व्ही.वरील नजर न हटवता उत्तर दिलं.

कार्टून संपल्यावर तेजस नमिताजवळ आला. नमितानं त्याला जवळ घेतलं आणि ती त्याला थोपटू लागली.

‘‘आजही त्या ड्रामा क्लासच्या सरांनी बोलावलंय का गं आई?’’ तेजसनं अचानक विचारलं.

‘‘अरे नाही.’’

‘‘बरं.. पण आत्ता मला टायगर व्हायचंय.. मी टायगर आहे.. घुर्रऽऽऽ’’

त्यानं लगेच वाघासारखी डरकाळी फोडली.

‘‘अगं बाई.. आमचं हे पिल्लू आता टायगर झालं तर!’’

‘‘ए, मी पिल्लू नाहीए तुझं. टायगर आहे. खराखुरा टायगर.. तू घाबरायला पाहिजे मला..  घुर्रऽऽऽ ’’

****

काही दिवसांपूर्वीच नमिता त्याला बालनाटय़ं पाहायला घेऊन गेली होती. नाटक संपल्यावर दिग्दर्शकांनी नाटकात काम करणार का, अशी जाहीर विचारणा केली आणि तेजसने त्यांना ‘‘हो ऽऽऽ’’ असा मोठ्ठय़ानं प्रतिसाद दिला होता.

आणि एक दिवस..

दोघंही जण त्यांच्याकडे गेले. तेजससारखीच लहानमोठी पंधरा-वीस मुलं तिथं आलेली होती.

एवढय़ात ‘धडाम्’ अशा आवाजानं नमिताची विचारशृंखला तुटली. आतल्या खोलीत सामान अस्ताव्यस्त फेकल्याचा आवाज आला. ती तिकडे धावली.

‘‘अरे, अरे, काय करतोस तू. सामान का फेकलंस सगळं?’’

‘‘घुर्रऽऽऽ मी टायगर आहे. टायगर..’’ पुन्हा मोठ्ठय़ानं डरकाळी फोडत तेजस गुरगुरला.

‘‘हं.. आता पुरे झालं तुझं टायगर होणं. चल झोप पाहू आता.’’

‘‘नाही. टायगर झोपत नसतो दिवसा.’’

वाघासारखी झेप घेऊन धावत बेडरूममध्ये जाऊन तेजसनं गाद्या, उशा, पांघरूण फेकायला सुरुवात केली.

सध्या त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, त्याच्या डोक्यावरचं हे टायगरचं भूत उतरलं की होईल शांत आपोआप, असा विचार करून नमिता एका खुर्चीवर शांतपणे बसून राहिली. जेमतेम दोन मिनिटे उलटली असतील-नसतील, अचानक  तेजसनं तिच्यावरच झेप घेतली आणि तोंडानं डरकाळी फोडत तिला बोचकारायला सुरुवात केली. बेसावध नमिता ‘अरे, अरे, मला का बोचकारतोस?’ असं म्हणून त्याला हातानं दूर सारणार एवढय़ात त्यानं तिच्या हाताला करकचून चावा घेतला.

‘‘आई गऽऽऽ’’ नमिता जोरात कळवळली.

‘‘हा हा हा. आहे की नाही मी खराखुरा टायगर?’’ असं म्हणत तेजसनं आपला मोर्चा बैठकीकडे वळवला. आता तेथील खुच्र्या त्याच्या तावडीत सापडल्या. नमिता रडवेली झाली. तेजसचं हे रूप तिनं कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या मनात नाना शंकाकुशंका येऊ  लागल्या. ‘टी.व्ही. पाहून पाहून तर हा असा बेबंद झाला असेल का? की आजी-आजोबा गावाला गेल्यामुळे आज त्याला घर एकदम सुनंसुनं वाटत असेल म्हणून तर..’ तिला काहीच कळेना. अखेर तिनं तिच्या सासुबाईंना फोन लावला.

‘‘आई..’’ बोलता बोलता तिला भरून आलं.

‘‘अगं, काय झालं. तुझा आवाज असा का येतोय. तेजसला काही झालंय का?’’

आणि नमिता त्यांना सगळं रामायण सांगणार एवढय़ात..

‘‘तू आजीला का सांगतेस..’’ असं म्हणून त्यानं फोन कट केला आणि अनपेक्षितपणे स्वत:लाच चावून, ओरबाडून घेतलं. आता मात्र नमितानं हमसून हमसून रडायला सुरुवात केली. सुरुवातीला तेजसला तो नेहमीसारखाच घाबरल्याचा अभिनय वाटला.

‘‘हा हा हा. कसं घाबरवलं.. मजा आली नं?’’

पण जेव्हा तिनं नितीनला- त्याच्या बाबांना फोन लावून ताबडतोब घरी येण्यास सांगितलं आणि तिचं रडणं हे नाटक नसून ती खरोखरच रडते आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा ट्रान्स्फर सीन व्हावा तसा तो एकदम कावराबावरा होऊन शांत झाला.

‘‘आई, का रडतेस तू. तुला बरं वाटत नाही का? बाबांना लवकर का बोलावलंस घरी? तुला पाणी देऊ का?’’

त्यानं तिचे डोळे पुसत विचारलेल्या या निरागस प्रश्नांनी नमिताला आणखीनच भरून आलं. आपण आतापर्यंत काय उत्पात माजवलाय हे जणू त्याच्या गावीच नव्हतं. थोडय़ाच वेळात नितीन घरी आला. तिनं तेजसला त्याच्या हवाली केलं आणि ती तडक बेडरूममध्ये जाऊन झोपून राहिली.

नितीननं एकवार घरात चौफेर बघितलं, घराला एखाद्या युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं; पण त्यानं एका चकार शब्दानंही तेजसला त्याबद्दल विचारलं नाही.

तेजसशी गप्पा मारताना त्याच्या अशा वागण्याचं एखादं कारण सापडेल अशी त्याची अटकळ होती; पण तेजस अगदी नॉर्मल वागत होता. नितीनलाही घाई नव्हती. थोडा वेळ त्याच्याशी खेळून नंतर रात्री स्वत:बरोबर त्यालाही जेवायला घालून नितीननं त्याला झोपवलं.

सकाळ झाली. नमिता उठली. ती आता बरीच सावरली होती. नितीन पेपर वाचत बसला होता. थोडय़ा वेळानं तेजसही उठून आला आणि नितीनशेजारी बसला.

‘‘झाली का बेटा झोप?’’

‘‘होऽऽऽ’’ असं म्हणत तो किचनमध्ये गेला आणि नमिताच्या मांडीवर जाऊन बसला. बसताना नमिताच्या हाताला त्याचा धक्का लागला.

‘‘अस्सं.. हाय..’’ नमिता विव्हळली.

‘‘काय झालं आई? तुझ्या हाताला काय झालंय.’’ तेजस तू चावलास ना काल आणि तोंडावर बोचकारलंसुद्धा..’’

‘‘कधीऽऽऽ’’

‘‘हो.. ते.. काल.. पण तेव्हा मी तेजस नव्हतोच मुळी. मी टायगर झालो होतो ना. खराखुरा टायगर..’’

‘‘अरे हो.. टायगर झाला होतास तू. अगदी खराखरा टायगर.. डिट्टो जंगलातला.. तरी पण असं खरोखरचं चावायचं आणि बोचकारायचं असतं का राजा.. अं?’’ नमितानं त्याला प्रेमानं समजावलं.

‘‘अगं.. मी एकदा खराखुरा ‘चायना प्रिन्स’ झालो होतो की नाही..’’ त्यानं शाळेतल्या स्नेह-संमेलनाची आठवण करून दिली.

‘‘हो.  आणि तू कधी मांजर, कधी फुलपाखरू, पक्षी.. टायगरसुद्धा होतोस पुष्कळदा.. सारखी कशाची ना कशाची अ‍ॅक्टिंग करत असतोस म्हणूनच तर तुला ड्रामा क्लासला घातलंय ना!’’

‘‘आणि ते नाटक शिकून आल्यावर घरी तस्संच करून दाखवलं की तेव्हा.. तेव्हा तर तुम्ही सगळे ‘वा’ म्हणूनटाळ्या वाजवत असता. आजी तर जवळ घेऊन किती कौतुक करते माझं. सरपण मला शाब्बासकी देतात क्लासमध्ये.. आज मात्र तू..’’ तिचं वाक्य मध्येच तोडत तेजस तक्रारीच्या सुरात म्हणाला.

अजूनही आपलं काल काही चुकलंय याची त्या बालमनाला मुळी जाणीवच नव्हती.

‘‘अरे बाबा.. ती अ‍ॅक्टिंग असते फक्त.’’ नमिताला आणि बाहेर बसलेल्या नितीनलाही त्याच्या कालच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचं रहस्य लक्षात येत नव्हतं.

‘‘हो नं.. मग मीही काल अ‍ॅक्टिंगच करत होतो. टायगर खरोखरच चावत असतो तोंडानं, आणि बोचकारतही असतो नखानं. हो की नाही?’’

‘‘अरे पण.. असं..? खरं खरं..’’

‘‘हो.. हो.. अस्संच.. परवाच आमच्या नाटकाच्या सरांनी सांगितलंय की अ‍ॅक्टिंग करताना हुबेहूब करायची. सगळं खरं खरं वाटलं पाहिजे. भूमिकेशी तद्रूप होऊन जायचं. अगदी एकरूप व्हायचं.. कळलं? म्हणून मी.. काल..’’

हे ऐकून बाहेर बसलेल्या नितीननं कपाळावर हात मारला. नमिता क्षणभर अवाक्  झाली आणि दुसऱ्याच क्षणी कालचा सगळा मनस्ताप विसरून दुखऱ्या हातानं तिनं आपल्या पाच वर्षांच्या अभिनयसम्राटाला आवेगानं छातीशी कवटाळलं.

भारती महाजन-रायबागकर bharati.raibagkar@gmail.com