‘‘अगं रती, अशी थबकून काय बघते आहेस माझ्याकडे, पहिल्यांदाच माझ्या अंगावर पाऊल टाकल्यासारखी.’’

‘‘अरे रस्त्या, खरंच असं तुला मी प्रथमच बघते आहे. गणपतीला वाहतो त्या दुर्वाची कशी तीन दिशांना तीन हिरवी पाती असतात, तसे तुझे तीन दिशांना वळलेले काळे कुळकुळीत, स्वच्छ, नीतळ रूप मला कधी दिसलेच नाही.’’

‘‘बरोबर आहे तुझं म्हणणं. पण एरवी इतक्या लवकर सकाळी तू घराबाहेर पडतेसच कुठे? तुझी शाळा सकाळची असते तेव्हा तुझ्या डोळ्यांवरची झोप पूर्णपणे उडालेली नसते. आणि शाळेची घंटा होणार नाही ना, याकडे तुझे लक्ष असते. त्यावेळी मी जरा मोकळा असतो, पण तू आपल्याच नादात असतेस. नंतर वाहनांची गर्दी चालू होते. त्यातून माझ्या डाव्या-उजव्या बाजूला वाहनांचे दाटीवाटीने केलेलं पार्किंग. मग माझं खरं रूप तुला दिसणार तरी कसं? रस्ता म्हणजे वाहनांच्या रांगा, घोळका असंच समीकरण झालंय.’’

‘‘हे मात्र खरं. आज झाडं बघायला जायचं ठरलं म्हणून मी इतक्या लवकर रस्त्यावर पाऊल टाकलं. काळाभोर, जड रेघेसारखा शांत, निर्मनुष्य, निर्वाहन, झाडांच्या कमानींखालून तीन दिशांना जाणारा तू मला एकदम सुंदर वाटलास. चित्रातल्या रस्त्यांसारखा भास झाला. एक उत्सुकता म्हणून विचारते की तू पहिल्यापासून असाच ‘काळा’ आहेस का रे? तुझा जन्म केव्हा आणि कसा झाला?’’

‘‘खरं सांगू, तुम्ही सगळी माणसंच माझ्या जन्माला कारणीभूत आहात. एखाद्या निर्मनुष्य विभागात माणसं राहायला येतात. पोटासाठी धडपड करत असताना कोणीतरी ‘पहिला’, अंदाज घेत घराबाहेर पडतो. त्याच्याच पाऊलखुणांवरून मागचे जाऊ लागतात आणि ‘पाऊलवाट’ तयार होते. हे माझं मूळ रूप.  मातीमयच असतो. पावसाळ्यात चिखलाने बरबटून जातो. लोकांना त्रास होतो. ते विचारपूर्वक बदल घडवून आणतात. जाड-बारीक खडी घालतात. त्यावर गरम डांबर ओततात. रोलर फिरवतात आणि माझ्या रूपात बदल घडवून आणतात. तुम्ही आणि मी दोघेही खूश. माणसांची, मालाची ने-आण, जा-ये सुखात व्हावी म्हणून तर वाहनांच्या आणि चपला बूटांच्या थपडा खात असतो. तुमची सर्वागीण प्रगती व्हावी म्हणून तर हा आटापिटा.

‘‘पण मग तुझ्या अंगावर असे खड्डे का रे पडतात पावसाळ्यात. त्या खड्डय़ांवरून बाबांना गाडी किती सांभाळून चालवावी लागते, तरी ती अशी उडते म्हणून सांगू. माझी आजी तर जोरात ‘आई गं’ म्हणून ओरडतेच.’’

‘‘काय करणार, नको इतकी वाहनं माझ्या अंगावरून जातात. माझी ही ताकद संपते. कधी रस्ता तयार करताना भेसळ करतात. चांगला माल, योग्य प्रमाण हे कोष्टक नीट पाळतातच, असं नाही. शिवाय खड्डा दुरुस्त करणारे ठिगळ लावल्यासारखी बारीक खडी त्यात भरतात. नीट सपाट करत नाहीत. मग कोणतेही वाहन जाताना मलाही त्रास सोसावाच लागतो, काय करणार! कोणतंही काम सचोटीने, आवडीने, मनापासून करावं लागतं.’’

‘‘काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे टिकाऊ असतात म्हणे!’’

‘‘हो नं. मोठे, जास्त लांबी-रुंदीचे रस्ते असे तयार करतात. कोणत्याही रूपात मी तुमच्या उपयोगी पडतो याचंच मला समाधान वाटतं.’’

‘‘तू आमचा इतका विचार करतोस आणि लोक जिथे-तिथे तुझ्या अंगावर थुंकतात. पान खाऊन लाल रंगाच्या पिचकाऱ्या उडवतात. कचराकुंडीत केर न टाकता तुझ्या अंगावर टाकतात, याचा तुला राग येत असेल ना!’’

 

‘‘हो ऽ तर, खूपच वाईट वाटतं. पण करणार काय? पण पावसाला दया येते आणि तो मला पाण्याने धुऊन  टाकतो. तेवढय़ापुरतं तरी स्वच्छ. कधी कधी तो अतिरेक करतो. मग माझी दुरवस्था ठरलेली.’’

‘‘ए, रात्रीतरी तुला थोडा वेळ विश्रांती मिळते का रे?’’

‘‘ हो, साधारण बारा ते तीन मी चांगला सैलावतो. मस्त चांदणं पिऊन घेतो. उजाडताच सफाई कामगार हजर होतात. साफसफाई करतात आणि माझा दिवस चालू होतो.’’

‘‘आणि आत्ता मला भेटलास तेव्हाही कसा फ्रेश वाटत होतास.’’

‘‘होय, या धडपडीच्या आयुष्यात काही क्षण विरंगुळ्याचे सापडतात. ते मला सदैव उत्साहात ठेवतात. माझ्या दोन्ही बाजूला काहीजण आवर्जून झाडं लावतात. त्यांच्या सावलीत मी स्वत:ला विसरून जातो. सप्तपर्णी, प्राजक्त, बकुळ, बूच, टॅबेबुइया, सोनमोहोर अशी काही झाडं सुवासिक फुलांची पुष्पवृष्टी करतात. रंगीत सडे घालतात. ती फुलांची पखरण जणू मला संजीवनी देते. आईच्या कडेवरून हट्टाने खाली उतरून चिमुकल्या रंगीत बूटांचा आवाज करत डुगडुगणारी चिमणी पावलं जेव्हा माझ्या अंगावर पडतात, तेव्हा मी सुखावून जातो. मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या पावलांचं मला कौतुक वाटतं. मला महामार्गावर नाकासमोर जायला आवडतं. तसंच डोंगरात वळणं वळणं घेत उंच जायलाही मी खूश असतो. हिमालयातल्या माझ्या जन्मदात्यांची आठवण ठेवून मी कायम सतर्क राहतो. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं, असं माझं स्वप्न आहे.’’

‘‘मला तुझ्या कडेला पांढऱ्या-पिवळ्या रंगाचे अंतर दाखवणारे दगड असतात ना ते खूप आवडतात. प्रवासात माझं लक्ष सारखं तिकडे असतं. शून्य आकडा आला की आपण पोहोचलो याचा आनंद होतो.’’

‘‘होतो ना आनंद? पोहोचवितो की नाही हवं तिथे. मी नसतो तर उंच डोंगरावरच्या किंवा डोंगरापलीकडच्या गावाकडे जाता आलं असतं का? पण ही माठी माणसं उपहासाने ‘रस्त्याला लावले’, ‘ रस्त्यावर आलो,’ अशा शब्दांत माझा उद्धार करतात तेव्हा वेदना होतात.’’

‘‘हे मात्र खरं हं. अरे पण तू काही क्षणापूर्वी माझ्याशी गप्पा मारत होतास आणि आता दिसेनासा झालास. अरे रस्त्या, अरेऽऽऽ रस्त्या..’

‘‘ए रती, रस्त्याला काय हाका मारत सुटली आहेस, बरी आहेस ना!’’ गौरांगीने धावत येऊन तिची वाट बघत रस्त्यावर उभ्या असलेल्या रतीच्या पाठीत धपाटा घातला.

‘‘म्हणजे आपण स्वप्नात या रस्त्याशी बोलत होतो तर..’’ असं मनाशी म्हणत दोघी क्लासला जायला निघाल्या.