फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. देवबाप्पाने नुकतीच हिरव्यागार पृथ्वीची अन् निळ्याशार अथांग सागराची निर्मिती केली होती. दोघंही आपापल्या परीने श्रेष्ठ अन् सुंदर होते, पण धीरगंभीर स्वभावाचा समुद्र देवाला एवढा प्रिय होता की त्याच्या कृपेने श्रीलक्ष्मी व शंख या दोघांनी सागराच्या पोटी जन्म घेतला. आदिशक्तीचं रूप असलेली श्रीलक्ष्मी अत्यंत तेजस्वी होती. तिचा जन्म होताच सागराचं राज्य हिऱ्या-मोत्यांनी संपन्न झालं आणि त्याला ‘रत्नाकर’ असं नाव मिळालं.

एक दिवस महातपस्वी भृगुऋ षींचं पृथ्वीवर आगमन झालं आणि त्यांनी लक्ष्मीचा विवाह श्रीविष्णूंशी होणार असल्याचं भाकीत केलं. ही दिव्य भविष्यवाणी समजताच सगळीकडे आनंदीआनंद पसरला. सारी प्रजा श्रीलक्ष्मीला पाहण्यासाठी, तिच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी गर्दी करू लागली. या गोंधळात लक्ष्मीचा धाकटा भाऊ शंख एकटा पडतोय ही गोष्ट मात्र कोणाच्याही लक्षात आली नाही. बिच्चारा शंख! ना त्याच्याकडे सौंदर्य होतं, ना बुद्धिमत्ता, त्यामुळे कोणीच त्याची दखल घेईना. जो तो त्याला टोचून बोलायचा.

‘‘असा कसा हा शंखोबा, मुलखाचा वेडोबा. मोठी बहीण एवढी सुंदर व बुद्धिमान आणि हा मात्र अगदीच वेंधळा- बावळट अन् गबाळा!’’ सततच्या टोमण्याने लहानगा शंख अतिशय दु:खी झाला. एवढुसं तोंड करून कोपऱ्यात बसायचा अन् जरा कोणी बोललं की मुळुमुळु रडायचा. आपल्या लहानग्याची ही अवस्था सागराला पाहवेना. त्याने त्याला जवळ घेऊन समजावलं.

‘‘शंखोबा, बाळा, असं रडायचं नाही. मी आहे ना. तू माझ्याशी बोल. मी तुझे सारे हट्ट पुरवेन. माझं गुणी बाळ ते.’’ असं म्हणून सागरराजा त्याला सतत आपल्याबरोबर ठेवू लागला. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवू लागला. त्या कौतुकाने शंखोबा सुधारला. सर्वाशी हसून-खेळून राहू लागला. साहजिकच सागरराजा निश्चिंत झाला.

सागरराजाने श्रीलक्ष्मीच्या विवाहाची जंगी तयारी सुरू केली. देव, यक्ष, गंधर्वाना आमंत्रणं पाठवण्यात आली. विवाहासमयी वधू-वर अन् आमंत्रितांवर रत्नफुलांची उधळण करण्यात आली आणि श्रीलक्ष्मी विष्णूसंगे दूर क्षीरसागरी निघून गेली. तिच्या मागोमाग सारे नातलग अन् आमंत्रितही गेले आणि राजमहाल सुना पडला. बहिणीच्या आठवणीने धाकटा शंखोबा पुन्हा उदास, एकटा राहू लागला. कुणाशी बोलेना की हसेना. सागरराजाची आपल्या या साध्याभोळ्या लेकरावर एवढी माया होती, की त्याने आपली सारी महत्त्वाची कामं बाजूला सारली आणि तो सतत शंखोबाबरोबर राहू लागला. या कौतुकाचा परिणाम असा झाला की शंखोबाला सागराशिवाय जराही करमेना. एखाद्या शेपटासारखा तो त्याच्या मागेमागे फिरायचा, हट्ट करायचा आणि ते हट्ट हक्काने पुरवूनही घ्यायचा. साहजिकच दरबारातली कामं खोळंबू लागली. मंत्रिगण नाराज झाले. दरबारात कुजबुज सुरू झाली आणि मग मात्र सागराला जाग आली. मन कठोर करून त्याने आपल्या लाडक्याला दूर श्रीलक्ष्मीकडे पाठवून दिले. बऱ्याच दिवसांनी बहीण भेटली, त्यामुळे शंख आनंदला. काही दिवस छान मजेत गेले आणि हाय रे दैवा, पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

पित्याची आठवण काढून शंखोबा रडायचा. रुसून बसायचा. लक्ष्मी आणि विष्णू दोघंही त्याची समजूत काढायचे, पण त्याची कळी काही खुलत नसे. अखेर झालं असं की, सततच्या दु:खाने अन् रडण्याने त्याचा कंठ रुद्ध झाला. त्याच्या गळ्यातून येणारा ओमकार नाद बंद झाला. शंखोबाकडे असलेला एकमेव अनमोल ठेवा म्हणजे हा शुभंकर ओमकार नाद! हा पवित्र अन् गंभीर ध्वनी ऐकला की अवघं वातावरण प्रसन्न, पवित्र होऊन जायचं; पण शंखोबाच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या कंठातला हा महातेजस्वी स्वर निस्तेज होऊ लागला. अखेर नाइलाजाने श्रीलक्ष्मीने त्याची रवानगी पुन्हा सागराकडे केली.

शंखोबा परतला आणि जणू चमत्कारच झाला. खूप दिवसांनी पित्याला बघून लहानगा शंख एवढा खूश झाला की आनंदाने नाचू-गाऊ लागला. रुसल्या ओठांवर हसू उमललं. कोमेजलेलं मन कमळागत उमललं आणि कंठातली मधुर तान रेशमलडीगत उलगडू लागली. एक चिरपरिचित गंभीर नाद अवघ्या वातावरणात घुमू लागला. आपल्या गळ्यातून निघालेला तो ध्वनी ऐकून शंखोबा एवढा चकित झाला, की कोणी काहीही न सांगता त्याला आपली चूक उमगली.

‘‘बाबा, आता मी कधीही हट्ट करणार नाही की रडणार नाही. अगदी शहाण्यासारखं वागेन.’’ शंखोबाने असं सांगताच सागराने त्याला मोठय़ा मायेने पोटाशी धरलं.

‘‘शहाणं माझं बाळ ते! शंखोबा, आता मी तुला एक गंमत सांगू? यापुढे तुला कधीही माझी आठवण आली की फक्त माझं स्मरण कर. मी लगेच तुझ्यापाशी येईन. माझ्या फेसाळत्या लाटांची अन् धीरगंभीर आवाजाची गाज तुला ऐकू येईल. आता आनंदाने पृथ्वीवर जा आणि देवाने तुझ्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण कर. शुभं भवतु.’’

पृथ्वीवर चालणारे यज्ञ आणि धार्मिक समारंभ शंखनादाशिवाय खोळंबले होते, त्यामुळे त्याला बघून साऱ्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी शंखाची विधिवत पूजा केली अन् त्याला देव्हाऱ्यात मानाचं स्थान दिलं. आपल्या शंखोबाला दिलेलं वचन मात्र सागरराजा कधीही विसरला नाही. आजही एखाद्या शांत जागी शंख कानाला लावला की सागराची धीरगंभीर गाज स्पष्ट ऐकू येते. सागराची ती धीरगंभीर गाज मनाला शांत करते, धीर देते.

मुलांनो, निळाशार समुद्र मनाला आनंद देतो. समुद्राच्या वाफेमुळेच पावसाचे ढग तयार होतात. त्यामुळे समुद्र आणि त्याचा किनारा स्वच्छ व सुंदर ठेवणं आपलं काम आहे.

होय ना?