सुट्टी संपून शाळा सुरू झाल्या होत्या. नवीन पुस्तकं, नवा वर्ग आणि नवीन अभ्यासक्रम याच्या आनंदात पहिले दोन आठवडे कसे गेले ते कळलेच नाहीत. सुजय या वर्षी विशेष खूश होता. कारण जोशीबाई त्यांच्या वर्गशिक्षिका होत्या. सुजयला जोशीबाई फार आवडायच्या. त्या मराठी विषय खूप छान शिकवत असत. आज उपयोजित लेखनाचा तास होता. या वर्षीपासून बदललेली परीक्षा पद्धती ही पाठांतरावर भर देणारी नसून, विद्यार्थ्यांच्या आकलनाला चालना देणारी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारी अशी होती.

आजच्या तासाला बाईंनी वर्णनात्मक निबंध म्हणून ‘चांदण्यारात्रीचा सुंदर अनुभव’ असा विषय दिला. निबंध कसा लिहायचा, सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, आपला अनुभव नेमक्या, पण परिणामकारक पद्धतीने कसा मांडायचा यावर भरपूर चर्चा झाली. बाई स्वत: लेखिका होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर अशा विषयांवर चर्चा करताना मुलांना नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळायचं. बुद्धीला चालना मिळायची.

आपणही काहीतरी असंच लिहायचं; जेणेकरून बाईंची शाबासकी मिळेल. सुजयने अगदी ठरवून टाकलं आणि घरी आल्या आल्या तो लिहायला बसला. काय बरं लिहावं, याचा तो बराच वेळ विचार करत होता. आणि एका क्षणी त्याला एकदम सुचून गेलं.

आपला तो अनुभव सुजय झरझर कागदावर उतरवू लागला..

.. मे महिन्याच्या सुट्टीत यावर्षी आम्ही कुठेच बाहेर जाणार नव्हतो. सुनीलदादा दहावीला गेला होता. त्याचे सुट्टीतले वर्ग सुरू झाले होते. मला खरं तर चार दिवसांतच सुट्टीचा कंटाळा आला होता. आणि अजून पाऊण महिन्याची सुट्टी शिल्लक होती. मी पार कंटाळून गेलो होतो. संध्याकाळी मावळी मंडळातून खेळून येताना विलास भेटला. मी सुट्टीत कुठेच गेलो नाहीए याचं त्याला फार आश्चर्य वाटलं. तो उद्या त्याच्या मामाकडे मुळशीला जाणार होता. त्याने चलण्याचा खूपच आग्रह केल्यावर मला हो म्हणावंच लागलं. लगोलग त्याने आईची परवानगी मिळवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालोच. विलासचे मामा शेतकरी होते. शेतात जुन्या बांधणीचं त्यांचं घर केवढंतरी मोठं होतं. त्याचे मामा तांदूळ, गहू या मुख्य पिकांसोबतच कडधान्य आणि हंगामी पीक म्हणून कलिंगडांचीही लागवड करत.

आम्ही गावी पोहचेतो दुपार झाली होती. बस स्टॅन्डवरून पायी पायी जाताना मजा वाटत होती. दुपार असून उन्हाचा चटका जाणवत नव्हता. उंच झाडांनी वेढलेला, डोंगरपायथ्याशी असलेला हा भाग एखाद्या हिल स्टेशनसारखा वाटत होता. चालता चालता थोडय़ा अंतरावर एक मोरी लागली. मोरी म्हणजे नदीवर बांधलेला छोटासा दगडी पूल. तो पार केल्यावर दोन वळणातच मामांचं घर आलं. भलंथोरलं अंगण असलेलं, दारी घमघमता मांडव घातलेलं ते टुमदार घर मला एकदम आवडून गेलं.

मामा-मामी दोघंही फार प्रेमळ होती. परकेपणा अगदी क्षणात दूर झाला. जेवल्यावर दुपारी नदीवर हुंदडून आलो. वाघजाई देवीच्या देवळामागची करवंदांची जाळी पिंजून काढली. मनसोक्त करवंदं खाल्ली आणि डोंगरावरच्या ओढय़ाकाठी एका मोठय़ा कातळावर चढून सूर्यबुडेतोवर आकाश निरखलं. आज कसं अगदी मोकळं मोकळं, स्वच्छंद वाटत होतं. वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. गावातल्या इतर मुलांसोबत भरपूर गप्पा झाल्या होत्या. पुण्याजवळ असूनही हे गाव, इथलं वातावरण किती वेगळं होतं!

अंधारायला लागलं तशी सगळेच लगबगीनं निघालो. पावसाने दुपारीच रंग करायला सुरुवात केली होती. त्यामुळे फार वाजले नसूनही जरा जास्तच काळोख वाटत होता. सात वाजेपर्यंत आम्ही घराजवळच्या वळणावर पोहोचलो. सगळीकडे आता गच्च अंधारून आलं होतं. पण चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्याच्या सोबतीने चालताना पायाखालची वाट स्पष्ट दिसत होती. अचानक समोरच्या झाडावरून एक चमकती ठिणगी उडाल्यासारखी भासली. चमकून तिचा मागोवा घेईस्तोवर त्या लुकलुकत्या प्रकाशकणांची संख्या वाढली. ते काजवे होते. आम्ही भारल्यासारखे तिथे उभे राहिलो. आमच्याबरोबर असलेल्या गण्याने चपळाईने पटकन एक-दोन पकडले. त्याच्या बंद मुठी लखलखल्या. मला विलक्षण गंमत वाटली.

‘‘लई आल्याती आज,  नाही रे बबन्या!’’ गण्या म्हणाला.

‘‘तर, आठ दिसापूर्वी पार डोंगराच्या अंगाला जावं लागायचं यास्नी धराया. अन् आता पार इथे घराजवळ गर्दी करून राहिल्येत.’’ बबन्याने त्याला दुजोरा दिला.

‘‘काय येडा की काय तू गण्या! पाऊस जवळ आला म्हंजे काजू ओढय़ाकडे पाण्याच्या अंगाला सरकतात हे ठावं नाही रे तुला?’’ बगडय़ाने गण्याला हटकलं. मला आणि विलासला त्यांच्या काजू म्हणण्याची गंमत वाटत होती.

‘‘उंबरावर, हिरडय़ा-बेहडय़ा आणि जांभळीवर मोप काजू  गावतात.’’ बबन्या म्हणाला.

‘‘त्या रुंज्यापल्याडच्या देवराईत खूप जुनी झाडं हाएत. तिथे बी गावतात.’’- जयंता म्हणाला.

घरापासच्या त्या वाटेवर आम्ही कितीतरी वेळ असे बोलत काजवे निरखत होतो. थंड प्रकाश फेकणारा तो निरुपद्रवी कीटक म्हणजे सृष्टीचं जणू वैभव होता.

बबन्या, बगडय़ा आणि गण्याला नेहमीचंच असणारं ते दृश्य आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता.

भोवती जसजसं काळोखाचं साम्राज्य वाढायला लागलं तसतसं वातावरण अधिकच भारल्यासारखं झालं. झाडांचे आकार गूढ वाटू लागले. वाऱ्याची सळसळ, चंद्राचा प्रकाश, फांद्यांच्या हेलकावणाऱ्या आकृत्या आणि त्यावर बसून त्यांना लखकन उजळून टाकणारी ती इवली अग्नीफुलं म्हणजे स्वप्नातल्या वाटेवरचा प्रवास वाटत होता. झाडाच्या फांद्यांबरोबरच हळूहळू वाटेवर, बाजूच्या जाळ्यांमध्ये लुकलुक वाढली. आता कोणीच कुणाशी बोलत नव्हतं.

कितीतरी वेळ तो प्रकाशोत्सव पाहत आम्ही तिथेच फिरत होतो. पोटातल्या भुकेची जाणीव होताच मात्र घराकडे पाय वळले. मांडवाच्या खांबापासच्या भगभगीत दिव्याजवळ जाईतो भोवती काजव्यांची लुकलुक सोबत करत होती.

जेवणं झाली आणि अंगणात अंथरूणं टाकली. रात्रभर सभोवती काजवे प्रकाशत होते. पावसाच्या आधी काही दिवसच पाहायला मिळणाऱ्या या प्रकाशोत्सवाचा आनंद मी मनमुराद लुटत होतो. एवढय़ात एक इवला काजवा माझ्या हातावर अलगद येऊन बसला. दिव्याच्या प्रकाशात त्याचं सोनेरी अंग लखलखत होतं. त्याचा तो मऊ  स्पर्श खूप सुखावून गेला. मग रात्री कितीतरी वेळ मी आणि विलास त्या वनदेवतेच्या सुवर्णालंकारांना मनसोक्त निरखत राहिलो..’

सुजयने निबंध पूर्ण केला तेव्हा खूप चांगलं काहीतरी लिहिल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला होता.

मैत्रेयी केळकर mythreye.kjkelkar@gmail.com