गणितआई सकाळी लवकर उठली. तिची दहा बाळे रांगेने गोधडी पांघरून छान झोपली होती. गणितआईने सर्वाना उठवले. म्हणाली, ‘‘नऊ वाजले, चला उठा. सारं जग कामाला लागलं. तुमच्यावाचून कुणाचंच चालायचं नाही!’’

‘‘म्हणजे?’’ एकाने डोळे चोळत विचारलं.

‘‘ते समजेल तुम्हाला हळूहळू.’’ शून्यबाळ कालपासून रुसून बसलं होतं. गणितआईनं विचारलं, ‘‘तुला काय झालं रुसायला?’’

शून्यबाळ म्हणालं, ‘‘आई, आपल्या समोरच्या बंगल्यात ती मृदुलाताई आहे ना, ती रोज आमचं गाणं म्हणते. ती त्यात नेहमी मला- परीक्षेतला भोपळा जसा- असं चिडवते.’’

शून्याने हे सांगताच मृदुलाताई गाणं ऐकायला शून्यबाळासकट एकताई, दोनभाऊ अशी नऊ अंकांपर्यंत दहा जणं दारात उभी राहिली. मृदुलाताई तल्लीन होऊन गात होती.

एक कसा, एक कसा

आजोबांचा सोटा जसा।

दोन कसा, दोन कसा?

फणा काढलेला नागोबा जसा।

तीन कसा, तीन कसा?

तुमचा आमचा कान जसा।

चार कसा, चार कसा?

उडणारा पक्षी जसा।

पाच कसा, पाच कसा?

एका पायावर बगळा जसा

सहा कसा, सहा कसा?

तुमचे आमचे तोंड जसे।

सात कसा, सात कसा?

आकाशात चंद्र जसा

आठ कसा, आठ कसा?

सरळ नाकाचा शेंडा जसा।

नऊ कसा, नऊ कसा

आमटीचा डाव जसा

शून्य कसा, शून्य कसा?

परीक्षेतला भोपळा जसा।

हे गाणं ऐकून शून्यबाळ रडू लागले.

‘‘आई बघ ना, साऱ्या आकडय़ांचे छान वर्णन. मला काहीच किंमत नाही. मी मात्र परीक्षेतला भोपळा.’’

गणितआईने शून्यबाळाला जवळ घेतले. म्हणाली, ‘‘बाळा, सर्व आकडय़ांत तूच महान आहेस. मी आज तुला बाजारात घेऊन जाते आणि तुझे मोठेपण तुला दाखवून देते.’’

दुसऱ्या दिवशी गणितआई सर्व अंकांना घेऊन बाजारात गेली. एका पाटीत एक म्हातारी आजी बोरे घेऊन बसली होती. गणितआईने पाचची नोट काढली.

‘‘आजीबाई, पाच रुपयांची बोरे द्या.’’

पाचदादा पुढे आला आणि  म्हणाला, ‘‘आई, अगं यावर माझा फोटो म्हणजे ‘सेल्फी’ दिसतोय.’’

‘‘बाई, आता पाच रुपयांची बोरं न्हाय गावायची. दहा रुपये द्या.’’

गणितआईने एकताईला आणि शून्यबाळाला पुढे केले. पिशवीत बोरे घेऊन सारी घरी निघाली.

‘‘शून्यबाळा, तुझ्या गम्मत लक्षात आली का?’’

‘‘मला एकताईच्या पुढे ठेवल्यावर मी नऊदादापेक्षा मोठ्ठा झालो!’’ – एकबाळ म्हणाले.

‘‘तुम्हा साऱ्यांना जगात किती मान आहे ते सांगते. तुमचे फोटो कागदावर छापले जातात. समजा, पाचदादाला कागदावर छापले की ती पाचची नोट होते. त्याला पाच रुपये म्हणतात.’’

‘‘पण माणसांना हे पैसे खरेच आहेत हे कसं समजतं?’’ चाराने मधेच विचारलं.

आई म्हणाली, ‘‘त्या नोटेवर तुमचा फोटो असतो. तसा या आपल्या भारत देशाच्या महान व्यक्तीचे चित्र आहे. ही पहा नोट. याच्यावर गांधीजींचे चित्र आहे आणि राष्ट्रपतींची सही आहे. उद्या आपण बँकेत जाऊ. तिथे तुम्हाला तुमची आणखी भावंडं भेटतील.’’

दुसऱ्या दिवशी सारी अंकबाळे बँकेत गेली. बँकेत कॅशियरच्या मागे सारी उभी राहिली. कॅशिअरकडे बाहेरच्या एका माणसाने पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल दिले.

गणितआईने सांगितले, ‘‘या नोटांकडे पहा.’’ शून्यबाळाला आता आपले महत्त्व कळले. ते म्हणाले, ‘‘आई, पाचदादाच्या पुढे मला दोनदा बसवले आहे. म्हणजे मी एकाचा दोन कसा झालो?’’

गणितआई हसली. ‘‘ती माणसांची बुद्धी. ती आपला छान उपयोग करतात. माझ्या शून्य ते नऊ आकडय़ांच्या बाळांवरच जग चालते.’’

साऱ्यांना सारखे तीनच आकडे दिसत होते. कारण पाचशेच्या आणि हजाराच्या नोटा सरकत होत्या. शून्य, एक आणि पाच या अंकांची चलती होती. बाकी साऱ्यांना कोणी विचारतच नव्हते. शून्याची ऐट आणि भाव चांगलाच वधारल्याने तो चांगलाच खूश झाला होता.

दोन आणि तीन अंकभाऊ हिरमुसले होते. चारअण्णा, सहा, सात, आठ आणि नऊ अंक रुसून कोपऱ्यात बसले होते. शेवटी गणितआई त्यांच्याजवळ आली.

‘‘बाळांनो, तुम्हालाही जगात खूप महत्त्व आहे. एक शून्य आणि पाच अंक नोटावर बसतात म्हणून ते सर्वाना दिसतात. पण व्यवहारात तुमचा कसा वापर होतो तुम्ही प्रत्यक्षच ऐका.’’ पण यावर त्यांचे काही समाधान झाले नाही.

दुसऱ्या दिवशी घरी आजोबा वर्तमानपत्र घेऊन बसले होते. ते आजीला मोठय़ाने वाचून दाखवत होते. सर्व अंक बातमी ऐकत होते. आजोबा वाचत होते, ‘‘आपल्या मुख्यमंत्र्यांनी कष्टकरी मुलांच्या शिक्षणासाठी ३४६६००००००० तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये मान्य केले आहेत.’ तीन, चार, सहा अंक खूष झाले. शून्याला किंमत येते ती मागे आकडे असल्याने. शून्य अंक बेहद्द खूश होता. सातदादा, आठ आणि नऊदादा आपला नंबर केव्हा लागतो याची वाट पाहत होते.

आजोबांनी पुढची बातमी वाचली- ‘‘शाळेतील कलावंत मुलांची निवड करून त्यांना बालवयापासून कलेचा विकास व्हावा अशी सोय शासनाने केली आहे. गावामध्ये मारुती मंदिरापुढे असलेले सहा, सात, आठ व नऊ नंबरचे चार प्लॉट कलामंदिरासाठी राखून ठेवले आहेत. येथे लवकरच कला मंदिर होईल.’’

अंकाची किंमत केवळ पैशामध्ये नसते. त्याचा अन्य व्यवहारातही उपयोग असतो हे साऱ्यांना समजले. गणितआई व तिची बाळे खूश झाली.

समोर मृदुलाताईचे गाणे चालू होते..

‘शून्य कसा, शून्य कसा?

परीक्षेतला भोपळा जसा!’

यावर शून्यबाळ हसले. त्याला आपली खरी किंमत कळली होती. ‘‘भोपळा विकत घ्यायलापण मीच लागतो मृदुलाबाई.’’

पण मृदुलाला कुठे काय ऐकायला येत होते?