फार वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या काळी प्राणीसुद्धा माणसासारखे बोलू शकत होते. त्या काळी एका गावाबाहेरील जंगलात एका झोपडीत एक शेतकरी राहात असे. एका मोठय़ा पाणरेडय़ाच्या मदतीने थोडीफार भातशेती तो करत असे.

एक दिवस असाच तो आपल्या रेडय़ाला चरावयासाठी सोडून झाडाच्या सावलीत आराम करत होता. तेवढय़ात त्याला पक्ष्यांचा मोठय़ा आवाजात आरडाओरडा, माकडांचा विचित्र आवाज ऐकू आला. त्याने सावधगिरीने चहूकडे पाहताच त्याला दूरवरून एक छान, सुंदर सोनसळी पिवळ्या रंगाचा तगडा वाघ येताना दिसला. वाघानेही रेडय़ाला पाहिले अन् त्याच्या तोंडाला पाणी सुटले. भुकेने त्याच्या पोटातून गुरगुर आवाजही येऊ लागला. आता रेडय़ाला खावे अशा विचारात असतानाच त्याने पलीकडे बसलेल्या रेडय़ाच्या मालकास, म्हणजे शेतकऱ्याला पाहिले. त्याला पाहून वाघाने जरा पवित्रा बदलून गोड आवाजात रेडय़ाला विचारले,

‘‘मित्रा रेडय़ा, तुला मी येथे बरेचदा चरताना पाहतो. मला एक समजत नाही, हा एवढासा माणूस एका काठीच्या तालावर तुला नाचवतो. एवढा बलवान तू, त्याच्यासाठी शेत नांगरतोस, त्याची कामे करतोस, का? कशासाठी ऐकतोस?’’

हे प्रश्न ऐकून तो रेडा म्हणाला, ‘‘हो रे, मलाही कधी कधी कोडंच पडतं, मी का बरं त्याचं ऐकतो? थांब, आपण त्या शेतकऱ्याशीच याबाबत बोलू’’ असं बोलून ते दोघे शेतकऱ्याकडे निघाले.

इकडे शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत होता की, ‘वाघाने रेडय़ाला खाल्ले तर शेतीची कामे कोण करेल? नि मलाच खाल्ले तर? छे! काहीतरी युक्ती करावीच लागेल,’ असा तो मनाशी विचार करेपर्यंत वाघोबाने येऊन शेतकऱ्यास विचारले, ‘‘एवढय़ा दांडग्या रेडय़ाकडून तू तुझी कामे कशी काय करून घेतोस?’’

शेतकरी म्हणाला, ‘‘त्याचं काय आहे, माझ्याकडे एक शक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे ‘मानवी अक्कल’ (मानवी शहाणपण). तिच्या जोरावर मी प्राण्यांकडून कामे करून घेऊ शकतो.’’

वाघोबा म्हणाला, ‘‘अरे वा! छान! मला पण दाखव ना हे तुमचं शहाणपण की अक्कल का काय ते!’’

‘‘हो दाखवतो की. पण मी ती आता आणली नाही. माझ्या घरी एका छान सोनेरी पेटीत जपून ठेवली आहे. ती जाऊन आणावी लागेल.’’ शेतकरी म्हणाला.

‘‘ठीक आहे. तू ती घेऊन ये, तोपर्यंत मी या रेडय़ावर लक्ष ठेवतो. काळजी करू नकोस.’’ शेतकरी गेल्यावर रेडय़ावर ताव मारता येईल या कल्पकतेने खूश होऊन वाघ बोलला.

‘‘अरे हो, पण मला तर आत्ताच तुझ्या पोटातून भुकेने गुरगुर आवाज ऐकू येताहेत. तू कशावरून रेडय़ाला खाणार नाहीस? बरं तुझं बोलणं खरं मानलं तरी मी माझ्या समाधानासाठी तुला या झाडाला बांधतो नि ती जादुई अकलेची पेटी घेऊन येतो.’’ शेतकरी वाघाला म्हणाला.

वाघ ती पेटी बघण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळेच शेतकऱ्याचा विश्वास जिंकण्यासाठी वाघ स्वत:ला बांधून घ्यायलाही तयार झाला. शिवाय त्याने मनात विचार केला की, ‘एकदा का शहाणपण आपल्याला मिळालं की शेतकऱ्यावर झडप घालून आपण त्याला खाऊ. नंतर पेटीतील शहाणपणामुळे रेडाच काय, इतर प्राण्यांवरही मला सत्ता गाजवता येईल. मग हवे तेव्हा हव्या त्या प्राण्याला खाता येईल.’

वाघ बांधून घ्यायला तयार झाल्यावर शेतकऱ्याने त्याच्याजवळील अतिशय जाड अशा दोरखंडाने वाघाच्या अंगाभोवती गोल गोल दोर पाठीवर गुंडाळले. वाघाला एका झाडाला घट्ट बांधले. शेतकरी जरा दूर गेला अन् येताना हातात काहीतरी घेऊन आला.

‘‘बघू बघू काय ते?’’ वाघाने उत्सुकतेने विचारले तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘‘अरे, थांब मूर्खा. अक्कल काही मी पेटीत ठेवत नाही ती तर आहे माझ्या डोक्यात. थांब दाखवतोच तुला,’’ असं म्हणून त्याने हातात पाठीमागे लपवलेली, जळती मशाल काढली नि वाघोबाला बांधलेले दोरखंड पेटवून दिले.

‘‘ओयऽ ओयऽ!’’ करत अंगाभोवतीचा दोर पेटल्याने वाघ ओरडत सुटला. सगळा दोरखंड जळून जमिनीवर पडला. वाघ मोकळा झाला, परंतु आगीमुळे कासावीस होऊन त्याने पळत जाऊन एका तलावात उडी मारली. त्या आगीतून वाघ सुटला खरा, पण तलावातून वर येऊन स्वत:चे प्रतिबिंब पाहिले, तर त्याचा रंग नुसता सोनसळी पिवळा न राहता जिथे जिथे दोर बांधले होते तिथे तिथे त्या पट्टय़ा जळून तेथे काळे पट्टे तयार झाले होते. त्या दिवसापासून वाघाचे आधी नुसते सोनेरी असलेले अंग काळ्या पट्टय़ांनीही भरून गेले.

शेतकऱ्याने आपल्या शहाणपणाच्या जोरावर स्वत:चा आणि स्वत:च्या रेडय़ाचा जीव वाचवला. हे पाहून अति आनंदाने हसता हसता रेडय़ाचे पुढचे दात एका मोठय़ा दगडावर आपटून पडले, तेव्हापासून रेडय़ांना वरच्या दातांऐवजी कडक हिरडय़ा असतात नि वाघांच्या अंगावर काळे पट्टे!