निहारिकाचा दादा जपानी भाषा शिकत होता. त्यात प्रावीण्य मिळवतानाच त्याला जपानला जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. सहा महिन्यांपूर्वी तो जपानला गेला तेव्हा दादाला जपानला जायला मिळतंय म्हणून निहारिकाला आनंद तर झालाच होता, पण त्याच्याशिवाय करमणार नाही म्हणून जरा वाईटही वाटत होतं. आज मात्र ती जाम खूश होती. कारण १५ दिवसांची सुट्टी घेऊन तिचा दादा आज घरी येणार होता.
दादा आल्यावर अर्थातच जपानमधली माणसं, त्यांची संस्कृती, तिथले पदार्थ, सण-समारंभ अशा भरपूर गप्पा झाल्या. दादाने घरातल्या प्रत्येकासाठी काही तरी छोटी-मोठी भेट आणली होती. आजीसाठी सुबकशी घंटा, आजोबा आणि बाबाला छानसं पेन, आईसाठी पर्स आणि जपानी पंखा.. अशा एकेक गोष्टी तो बॅगेतून काढत असताना निहारिकाची उत्सुकता वाढत होती. आपल्यासाठी काय बरं आणलं असेल या विचारात ती असतानाच दादाने तिला डोळे बंद करून हात पुढे करायला सांगितले. हळूच डोळे किलकिले करून ती बघत नाहीये ना, याची खात्री करून घेतल्यावर त्याने एक वस्तू तिच्या हातात ठेवली. निहारिकाने डोळे उघडून बघितलं तर एका छोटय़ा काठीला दोन्ही बाजूंना दोन कप लावलेलं काही तरी खेळणं तिच्या हातात होतं!
‘हे काय आहे?’ असं तिने विचारण्याआधीच दादाने एक छोटी दोरी आणि मधोमध भोक असलेला एक रंगीबेरंगी बॉल तिच्या पुढे धरला आणि म्हणाला, ‘‘हे पारंपरिक जपानी खेळणं आहे. याला म्हणतात ‘केंडामा’ (Kendama)’’ नवीन काही तरी आहे म्हटल्यावर आजी-आजोबा, आई-बाबा सगळेच उत्सुकतेने बघायला लागले. सगळ्यांच्या नजरेतले प्रश्न जाणून दादा म्हणाला, ‘‘मला वाटलंच होतं, की तुम्ही सगळे मला खूप प्रश्न विचारणार. त्यामुळे हा खेळ घेतानाच त्याच्या इतिहास-भूगोलाचा अभ्यास करून आलोय!’’ दादाच्या या म्हणण्यावर सगळेच हसले.

कुठलीही नवीन गोष्ट पूर्ण अभ्यास करून, व्यवस्थित माहिती मिळवूनच इतरांसमोर बोलायची हा निहारिकाच्या घरचा नियम होता. त्या नियमाला अनुसरून दादानेही सगळी माहिती जमवली होतीच. तो म्हणाला, ‘‘केंडामा हा खेळ मूळचा कुठला आहे ते नक्की सांगता येणार नाही. पण जपानमध्ये तो साधारण १७७७ मध्ये आला. त्या वेळी या खेळाला ‘Sun and moon बॉल असंही म्हटलं जायचं. पारंपरिक ‘Ball and cup’ गेम्स मधूनच केंडामाची निर्मिती झाली असं म्हणतात. आता हा खेळ तसा जगभर प्रसिद्ध असला तरी जपानी लोकांचं या खेळावर विशेष प्रेम आहे. केंडामा खेळण्याच्या स्पर्धाही होतात आणि गंमत म्हणजे या स्पर्धामध्ये जे उत्तम स्कोअर करतात त्यांच्याकडे सातत्य, सहनशक्ती आणि ठामपणा हे गुण असतात असं मानलं जातं! अचूकता, शिकण्याची कुवत या गोष्टींची चाचणी घेण्यासाठीही केंडामाचा वापर केला जातो.’’
दादाने सांगितलेली माहिती ऐकून घरातल्या सगळ्यांनाच बरं वाटलं. ‘‘पण हा खेळ खेळायचा कसा?’’ इतका वेळ ‘होल्ड’वर ठेवलेला प्रश्न शेवटी निहारिकाने विचारलाच! ‘सांगतो’ असं म्हणत दादाने ती छोटी दोरी बॉलच्या भोकातून ओवून गाठ मारली, दोरीचं दुसरं टोक त्या कप्सवाल्या काठीला बांधून टाकलं आणि म्हणाला, ‘‘हा बॉल असा हवेत उडवायचा आणि दोन्हीपैकी कुठल्याही कपमध्ये झेलायचा किंवा या काठीचं टोक बरोबर त्या बॉलमध्ये अडकवायचं.’’
‘‘सोप्पं तर आहे!’’ असं म्हणत निहारिकाने केंडामा हातात घेतलं, पण अनेक वेळा प्रयत्न करूनही तिला काही तो बॉल त्या कपात झेलायला जमेना.
‘‘आता कळलं केंडामा खेळताना अचूकता, सातत्य वगैरे गुणांचा कसा कस लागतो ते?’’ असं म्हणत दादाने तिच्या हातातून केंडामा घेतलं आणि दोन-तीन प्रयत्नांत बॉल बरोबर कपमध्ये झेलला. निहारिकाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तिच्या दादासारखं तुम्हालाही जमेल का केंडामा खेळायला? सुट्टी सुरू होतेच आहे, बघा प्रयत्न करून!
anjalicoolkarni@gmail.com