वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाळण्याची अनेक बालमित्रांची इच्छा असते. या प्राणी-पक्ष्यांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना खाऊपिऊ घालावे, असे अनेक बालमित्र-मैत्रिणींना वाटते. अशाच एका प्राण्याला पाळण्याची इच्छा होते मानसी या छोटय़ा मैत्रिणीला. कुत्रे, मांजर, लव्हबर्ड असे पक्षी नाही, तर तिला बेडूक पाळावा असेच वाटू लागते आणि ती तसा आईकडे हट्टही करते. तिच्या या हट्टाचे काय होते, आई तिला बेडूक पाळायला परवानगी देते का? हे जर जाणून घ्यायचे असेल तर अंजली अत्रे यांचे ‘बेडूकराव डराँव डराँव’ हे पुस्तक वाचायला हवं. ‘रसिक आंतरभारती प्रकाशना’तर्फे चित्रकथा मालिकेत पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्या मालिकेतील ‘बेडूकराव डराँव डराँव’ हे पहिले पुस्तक. या पुस्तकाबरोबरच ‘मिनूची गोष्ट’, ‘दीपालीताईची आयडिया’, ‘बंडोपंत फूल तोडे’, ‘भेळ घ्या भेळ’ ही पुस्तकेदेखील प्रकाशित करण्यात आली आहेत. बालचमूंना ती आवडतील अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे. मराठी नुकत्याच शिकू लागलेल्या बालमित्रांपासून मोठय़ा मित्रांपर्यंत सगळय़ांना वाचायला आवडतील.
ही पाचही पुस्तके म्हणजे केवळ चित्रकथांची पुस्तके नसून, या पुस्तकांमधून कळत- नकळत खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे गोष्टींची पुस्तके वाचत असताना जाता जाता विज्ञान, पर्यावरण, स्वच्छता, नवे खेळ अशा वेगवेगळय़ा गोष्टी कळत जातात.
‘बेडूकराव डराँव डराँव’ या पुस्तकात बेडूक पाण्यात का खेळतो, त्याचे खाद्य काय? त्याचा जन्म कसा होतो अशी खूप सारी माहिती यात मिळते. आजी आणि नात यांच्या गोष्टीतून निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या नात्याविषयी वाचायला मिळतं  ‘मिनूची गोष्ट’मध्ये.
शाळेत जाता-येता रिक्षात दंगा करणाऱ्या मुलांना कसं शांत करायचं याची ‘आयडिया’ लढवत असताना, कंटाळा येणाऱ्या मित्रांसाठी वेगवेगळे खेळ दिले आहेत ‘दीपालीताईची आयडिया’ या पुस्तकात. फुलं तोडणारा बंडू आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या काकूंची गोष्ट आहे ‘बंडोपंत फूल तोडे’ या पुस्तकात. या पुस्तकातील ‘बंडू’ या छोटय़ा मित्राला फुलं तोडायला आणि नंतर त्याच्या पाकळय़ा काढायला खूप आवडत असत. त्याला जर असे कोणी करू दिले नाहीतर तो भोकाड पसरत असे. त्याची ही सवय मंजूताई कशी दूर करते, हे या पुस्तकात बालमित्र वाचू शकतात.
भेळेसाठी हट्ट करणारी छोटी ‘बंबू’ आणि तिची आई यांची कथा म्हणजे ‘भेळ घ्या भेळ’. आपल्या सोयीसाठी किंवा बंबूच्या हट्टामुळे ती अनेकदा भेळ खाते आणि एके दिवशी आजारी पडते. या आजारपणानंतर डॉक्टरांच्या सांगण्यामुळे ती काही महिने भेळ खाणे बंद करते आणि पुन्हा एक दिवस भेळ खाते. त्यानंतर पुन:पुन्हा ती भेळ खाण्यासाठी हट्ट करू लागते. पण एके दिवशी आपला हट्ट चुकीचा असल्याचे तिच्या लक्षात येते. ‘बंबू’ आपली चूक कशी सुधारते याचीच ही गोष्ट.
रमेश मुधोळकर यांच्या संपादन आणि सजावटीने हे बालकथांजलीचे ५ भाग सजले असून, हे प्रत्येक पुस्तक चोवीस पानी आहे. या प्रत्येक पुस्तकाची किंमत पन्नास रुपये असून, वेगवेगळय़ा पात्रांच्या माध्यमातून वेगवेगळय़ा गोष्टी या पुस्तकांमध्ये सामावल्या आहेत.