‘अंगणात उजळो दिवे, तेजोमयी प्रकाशात, लख लख प्रकाशाच्या माळा’ वगैरे.. अशा शब्दांची गर्दी करणारे संदेश तुमच्या आई-बाबांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर जसजसे यायला लागतील, तसतशी दिवाळीची चाहूल तुम्हाला लागेल. काही वर्षांपूर्वीच्या मुलांना मात्र (व्हॉट्स अ‍ॅप नव्हता तेव्हा) बाजारात विक्रीला असलेल्या कंदील, दिवे यांच्यामुळे दिवाळी आल्याची वर्दी मिळे. पण त्यावेळी आणि आजच्याही मुलांचे लक्ष असते ते म्हणजे फटाक्यांवर!

फटाक्यांची किंमत आणि सध्या पर्यावरणाबाबत जागरूक असणारी मुले मात्र आवडत असूनही कमी फटाके उडवतात. हे छानच! पण माणसाने हे फटाके आणि दिव्यांचा वापर करून आनंद मिळविण्याचा मार्ग फार जुना आहे. फटाक्यांच्या (दारूगोळ्याचा) शोध अमक्या शतकात तमक्या राजाच्या काळात चीनमध्ये लागला. हे फोटो आगीचा कलात्मक व सांस्कृतिक वापर दाखवतील.

आज आपण दिवाळी निमित्त ‘प्रकाशाची  कला’ (light art) आणि फटाक्यांची कला याविषयी पाहणार आहोत.

आदिमानवाने गुहेच्या आत चित्र काढायला आगीची मदत घेतली. तर त्यांनतर आपला हा ‘प्रकाश’ प्रत्येक चित्रात डोकावू लागला. पूर्वी आणि आत्ताही चित्रात प्रकाशाला पाहून रंग लावायचे असतात. म्हणजे चित्रातील सावलीतील भागाला कमी रंगछटा बनवायच्या, पण प्रकाशातील भागाला जास्त रंगछटा बनवायच्या. कठीण वाटतंय? थांबा समजावतो.

रेम्ब्रँट या चित्रकाराने आत्तापर्यंत काढलेल्या चित्रात नेहमी, एका बाजूने (एका स्पॉट लाइटसारखा) प्रकाश टाकला/ रंगवला. गुगल सर्चमध्ये जाऊन याची मोठय़ा आकाराची चित्रे

(high resolution) पाहिल्यास विविध रंगछटा दिसतील. या प्रकाशझोताच्या नाटय़मय वापरामुळे रेम्ब्रँट फार श्रीमंत झाला व त्याच चित्रात प्रकाशझोतात चुकीची माणसं आल्याने गरीबही झाला. असो. पण रेम्ब्रँट लाइट या नावाचा प्रकाशच सिनेमा क्षेत्रात नावाजला गेला.

दुसरा चित्रकार टर्नर ज्याने चित्रात केवळ प्रकाश, आग, धुकं, वाफ, वादळ असे विषय होते. त्यानेही चित्रात काही कळेल की न कळेल हा विचार न करता ‘जसं दिसतं तसं’ चित्र काढलं. जसं दिसतं तसं म्हणजे, ढगाचं चित्र काढायला सांगितल्यावर आपण सर्व जो आकार काढतो, त्याला पांढरा किंवा आकाशी रंग देतो, तसे न करता, प्रत्यक्ष बाहेर जाऊन ढग पाहून- त्याचे रंग पाहून चित्र काढतो. याची चित्रं देखील गुगल सर्च करून पाहावीत. तसंच चित्रकार व्हर्मीर याची चित्र पाहून प्रकाशाला रंगविणे म्हणजे काय ते कळेल.

आपल्याकडे सर्वात गाजलेलं आणि कदाचित तुम्हीही पाहिलेलं चित्र म्हणजे चित्रकार हळदणकरांनी चितारलेला प्रकाश! (पूर्वार्ध)

श्रीनिवास आगवणे