आज रविवार. दुपारची जेवणं आटोपली. आईनं घर आवरायला घेतलं. पार्वतीआजी बैठकीत सोफ्यावर येऊन बसल्या. बाजूला टी-पॉयवर चमकणारे विविध रंगांचे कागद, फेव्हिकॉल, कात्री, दोरा, पुठ्ठा, इत्यादी असं सजावटीचं साहित्य पडलेलं. सजावटीचं साहित्य पाहताच पार्वतीआजींना काय आठवलं कुणास ठाऊक, त्यांनी आपल्या सर्व नातवंडांना जवळ बोलावलं. क्षणाचाही विलंब न करता आशू, नीरज, वेदा तिघेही आजीजवळ येऊन बसले. आजीने का बोलावलं याकडेच तिघांचंही लक्ष लागलेलं.

‘‘हं आजी, काय म्हणतेस? अगं बाप्पा येणार आहे. त्याच्या स्वागताची, सजावटीची तयारी करायची आहे आम्हाला.’’ नीरजने त्याची टकळी सुरू केली. आजीने तिघांकडे बारीक नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, ‘‘मीपण गणपती बाप्पाबद्दलच बोलावं म्हणते तुमच्याशी.’’

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

‘‘म्हणजे?’’ आशूने मान हलवत हळूच पाठीवरची केसांची वेणी पुढे केली.

‘‘म्हणजे असं की, गणपती बाप्पा घरात येणार, पण श्रीगणेशाची, गणपती बाप्पाची प्रतीकं कोणती आहेत ती माहीत आहेत का तुम्हाला?’’

‘‘नाही..’’ वेदाने सर्वाच्या वतीने उत्तर दिलं. ‘‘..पण आजी, नुसती प्रतीकं नको, त्या प्रतीकांविषयी काही माहितीही सांग ना आम्हाला?’’ म्हणत पुष्टी जोडली.

‘‘अगं बेटा, बरं, मी बाप्पाची प्रतीकं आणि त्याविषयी मला जे माहीत आहे ती माहितीपण सांगते, बस्स.’’

मग तिघंही आजीच्या पुढय़ात मांडी घालून बसले.

‘‘हे बघा, गणपती बाप्पाची प्रतीकं कोणती? तर एक म्हणजे बाप्पाचं तोंड म्हणजे सोंड. दुसरं त्याचे मोठाले कान, तिसरं त्याचं मस्तक, चौथं त्याचं एकदंत रूप.’’ नातवंडांपैकी कुणी पुढचं बोलेल म्हणून आजी मधेच थांबल्या.

कुणीही बोलत नाही हे पाहून त्या पुढे बोलू लागल्या. ‘‘पाचवं त्याचं मोठं पोट म्हणजे महोदर, सहावं त्याच्या हातातील मोदक, सातवं परशू, आठवं म्हणजे पाश. बरोबर.. मग आता प्रथम कशाविषयी बोलायचं?’’

‘‘गणपती बाप्पाचं मस्तक आणि तोंड.’’ आशूने पहिला नंबर लावला.

‘‘हे बघा, हत्ती सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिवान प्राणी समजला जातो. एवढंच नाही तर त्याची स्मृती, स्मरणशक्ती तल्लख असते. तुम्ही अभ्यास ध्यानात राहावा म्हणून गणपतीला नमस्कार करता ना? तुम्हाला हे माहीत आहे का, की जो माणूस आत्मा, परमात्मा जाणतो. सृष्टीचे आदि, मध्य, अंत याचं ज्ञान जाणतो, त्याला संस्कृतमध्ये विशालबुद्धीचा संबोधलं जातं. बरे, हत्तीचं चालणं कसं? तर ऐटीत. आजूबाजूच्या इतर त्रास देणाऱ्यांकडे तो ढुंकूनही पाहत नाही.’’

‘‘हं.. कुत्ता भोंकता है, हत्ती चलता है, असं का?’’ नीरज मधेच बोलला. वेदाने त्याच्याकडे पाहत डोक्याला हात लावला.

‘‘अगदी बरोबर. ज्ञानी आणि योगी माणसं अशीच असतात. ती कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. आपलं लक्ष जराही ढळू देत नाहीत.’’

‘‘आजी, गणपती बाप्पाच्या वक्रतुंड सोंडेचं काय गं?’’ वेदाने हात खांद्यापासून वर उचलत सोंडेसारखा हलवला.

‘‘बघा, हत्तीची सोंड ताकदवान असते तशी ती मवाळही असते. हत्ती ज्या सोंडेने वृक्ष उन्मळून टाकतो त्याच सोंडेने तो देवाला फुलंही अर्पण करतो. हत्तीच्या सोंडेमध्ये जी ताकद, शक्ती असते तीच ताकद, शक्ती सत्यज्ञान धारण करणाऱ्यामध्ये असते.’’

‘‘हो का? तेच तर. खरं बोलणं हे ताकदवान माणसाचं लक्षण आहे. आजी, बाप्पाचे कान सुपाएवढे मोठे त्याचं काय बरं?’’ – इति आशू.

‘‘अगं, मोठे कान हे एकाग्रतेचं प्रतीक. शाळेत शिक्षक तुम्हाला शिकवताना सांगतात ना, की कान उघडे ठेवून ऐका. म्हणजे कान मोठे करून ऐका. ज्ञानसाधनेत श्रवण, मनन, निदिध्यास हे तीन पुरुषार्थ सांगितलेले आहेत.’’ आजी थांबली. तिघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं.

‘‘आजी, बाप्पाचे डोळे बारीक, पण किती रेखीव असतात नाही का?’’ वेदा म्हणाली.

‘‘ते का? तर गणपती बाप्पाला छोटय़ा, लहान गोष्टी मोठय़ा दिसतात. जी माणसं हुशार असतात ती लहान गोष्टींतही मोठय़ा गोष्टी शोधत असतात. त्यातूनच तर शोध लागतात ना! बाप्पा तेच तर त्याच्या बारीक, रेखीव, सुंदर डोळ्यांतून आपल्याला शिकवतो.’’

‘‘आजी, बाप्पाचा एक दात सुळा आहे. त्याला आपण एकदंत म्हणतो.’’ नीरज म्हणाला.

‘‘बाप्पाचा तो सुळा- दात विघ्न आणणाऱ्यांना धाक दाखवण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी.’’ नीरजला मधेच थांबवत आजी उत्तरली.

‘‘असं होय! पण गणपतीचं पोट मोठं का असतं गं?’’ वेदाने आजीकडे पाहिलं.

‘‘मोठय़ा पोटात चांगल्या-वाईट साऱ्या गोष्टी सामावतात. काही गोष्टी पोटात ठेवल्या तर एकमेकांशी असणारे संबंध नीटनेटके, व्यवस्थित, सुरळीत राहतात. मोठे पोट अर्थात महोदर हे विचारी, बुद्धिवान असणाऱ्याच्या गुणाचे प्रतीक आहे.’’

‘‘हे ठीक. पण आजी, गणपतीच्या हातात परशू का असतो? परशू तर तोडायचं, कापायचं साधन ना?’’ आशूने डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर उजव्या हाताचं पहिलं बोट सुरीसारखं चालवलं.

‘‘त्याबाबत सांगायचं म्हणजे, जे वाईट आहे ते मुळासकट उखडून टाकण्यासाठी तसेच मोह, ममता, लालूच ही बंधनं तोडण्यासाठी परशू गणपती बाप्पाच्या हातात असतो. वाईट, आसूरी संस्कार मिटविण्याकरिता परशू ज्ञानरूपामध्ये ज्याच्याकडे असतो त्या आध्यात्मिक योद्धय़ाला खरा ज्ञानी मानतात.’’

‘‘आजी, बराच वेळ झाला आहे गं. बाप्पाची तयारी करायची आहे. थोडक्यात, पाश आणि मोदकबद्दल सांग ना?’’ नीरज म्हणाला.

‘‘बरं, मोदक कसा असतो? तर गोड. बऱ्याचशा गोष्टी निवडल्या, स्वच्छ केल्या, एकत्र केल्या, की मोदक तयार होतो. तो त्याचे प्रतीक. पाश दैहिक बंधनाचं प्रतीक आहे. ज्ञानरूपी कुऱ्हाडीने दैहिक बंधनं कापून स्वत:ला दिव्य बंधनामध्ये बांधणारे व तसे करा असं सांगणारं प्रतीक म्हणजेच पाश. समजलं सर्वाना?’’

‘‘हो तर. चला लागू या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला.’’ नीरज उठला.

‘‘आजी, आम्हाला अजून एक गोष्ट समजली बरं का?’’ – आशू.

‘‘कोणती?’’ आजीने तिघांकडे आश्चर्याने पाहिलं.

‘‘तुम्हाला गणपती बाप्पाविषयी इतकी माहिती आहे म्हणूनच तुझं नाव पार्वती आहे. नाही का?’’ आशू म्हणाली. वेदाने तिला डोळे मिचकावत टाळी दिली.

‘‘चला, वात्रट कुठले!’’ आजी हसत उठली.

‘‘गणपती बाप्पा’’ म्हणत आशू, नीरज,

वेदा तिघेही बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला लागले.