आता निकडीची गरजच होती चहाची. अनेकांना घरी चहा प्यायची बंदी असली तरी आता सगळेच्या सगळे चहा पिणार होते. कारण सकाळपासून जाम थकायला झालं होतं. कुणाचे नाचून नाचून पाय अगदी गळ्यात आले होते, कुणाचा गाऊन गळा कोरडा पडला होता, कुईशाची आई ओतत असलेला वाफाळता चहा बघताच सगळ्यांनाच अगदी हुश्श झालं.णी नाटकात योग्य बेअिरग घेता घेता गळपटून गेलं होतं. हे अस्सं सगळं वेगळंच चाललं होतं आणि तेही शाळेच्या हॉलमध्ये. कारण होतं सरस्वती पूजनाचं. ही शाळा अशीच होती, थोडीशी जगावेगळी. बाकी काही असलं तरी सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात कोणतीही तडजोड नाही अशी पक्की अट होती इथली. वार्षकि स्नेहसंमेलन एकवेळ झालं नाही तरी चालेल, पण सरस्वती पूजन व्हायलाच हवं हा अट्टहास होता सगळयांचा; म्हणजे या शाळेतल्या सगळयांचा! सरस्वतीची भक्ती म्हणजे अनेकविध कलांचा जीव ओतून सराव आणि सादरीकरण याबाबत इथले शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सगळेच ठाम होते. कुण्णाचं म्हणजे कुण्णाचंच दुमत नव्हतं. त्यामुळेच गेली अनेक र्वष हे असं आणि अस्संच सातत्याने घडत होतं. शाळेचे माजी विद्यार्थी आता पालकांच्या भूमिकेत शिरले होते एवढंच! पण या सरस्वतीवंदनासाठी ते अजूनही तेवढेच उत्साही आणि आतुर होते. म्हणूनच ते मुलांची कोणतीही कुरकुर न करता काळजी घ्यायचे. त्याचाच एक भाग म्हणून ईशाची आई आज सर्वासाठी चहा घेऊन आली होती आणि तिने चहा कपांमध्ये ओतताच मधमाशांनी फुलांकडे धाव घ्यावी तसे सगळे चहाच्या कपांकडे धावले होते. चहाचा घोट घशाखाली जाताच सर्वाचा थकवा हां हां म्हणता पळून गेला. चहातील वेलचीच्या वासानंच थकली भागलेली शरीरं एकदम पिसागत हलकी होऊन गेली.

चहाचा घोट घेता घेता सुहास मात्र गालातल्या गालात हसत होता. त्याला समीर सरांची मनापासून आठवण आली. समीर सर हे त्याचे गेल्या वर्षीचे इतिहासचे शिक्षक. यावर्षी ते शिक्षक म्हणून कार्यरत नव्हते, तर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदावर नियुक्त झाले होते. ते नेहमी वर्गात एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, ‘‘सध्या माहितीचं युग जरी असलं तरी माहितीपेक्षा ज्ञान महत्त्वाचं. मुलांनो, चहा कसा करायचा हे तर आपल्या सगळयांना माहीत असतं. पण आईने केलेला चहा आपल्या चहापेक्षा सरस लागतो, कारण ती असते चिमूटभर साखरेची आणि चहाच्या उकळीची महती. आपण कसं चहात अगदी सगळं प्रमाणात घालतो, तो प्रमाणात उकळतो. पण आई चहा करताना चिमूटभर साखर कमी किंवा जास्त घालते आणि असा काही उकळते, की तो आपल्या चहाहून रुचकरच होतो. हीच गंमत आहे माहिती आणि ज्ञानाची. आईकडे चहा कसा करावा याचं ज्ञान असतं आणि आपल्याकडे फक्त माहिती. तेव्हा मुलांनो, अभ्यास करताना ज्ञान कसं मिळेल हे पाहा. नुसतं माहितीच्या मायाजालात अडकू नका. म्हणजे तुमचं आयुष्य आईनं केलेला चहा पिताना जसं आनंदी वाटतं ना, तसंच आनंदात जगू शकाल.’’

सुहासला हे सगळं आठवून आणि पटून तो आता गालातल्या गालात हसत होता, तर इतर काही जण मात्र उद्या पूजनासाठी आणलेली सरस्वतीची मूर्ती पहाण्यात गर्क होते. ते निरीक्षणात एवढे रममाण झाले होते, की कोणाला कुणाशी काही बोलायची इच्छाच नव्हती. केतकीला सरस्वतीच्या हातातले वेद आणि जपमाला पाहताना जोगळे मॅडमची तीव्रतेने आठवण आली. जोगळे मॅडमनी त्यांना एकदा सांगितलं होतं, ‘‘सरस्वतीच्या हातातील वेद हे ज्ञानाचं प्रतीक, तर  तिच्या हातात असलेली जपमाला सरावाचं महत्त्व सांगते. नुसतं ज्ञान सांभाळून ठेवून किंवा त्याचं भांडार करून उपयोग नाही, तर सततच्या सरावानं आणि रियाजानं ते उजळत राहिलात तर तुमचं जीवन उजळून निघेल.’’ केतकीने मॅडमचे हेच शब्द गांभीर्याने घेतले आणि आपला डान्सचा सराव आणखी जोमाने सुरू ठेवला होता. त्याच बळावर आज ती पार दिल्लीपर्यंत डान्समध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करून आली होती. नकळतच सरस्वतीसमोर हात जोडताना केतकीने मनात निश्चय केला की, जोगळे मॅडमना आपण आजच थँक्स म्हटलं पाहिजे. आपल्याकडून ते कसं काय राहून गेलं याची तिला खंत वाटली.

पाच-सहा जण चहाचे कप हातात घेऊन एका कोपऱ्यात मस्त गप्पांमध्ये रंगले होते. आर्य भरपूर जोक्स सांगून सगळ्यांना मनसोक्त हसवत होता. काही जणांच्या डोळ्यांमधून तर हसता हसता  पाणी येत होतं. आर्यकडे आणि इतरांकडे पाहताना विराजला गेलं वर्ष आठवलं. गेल्या वर्षी हाच आर्य या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला अजिबात म्हणजे अजिबात कबूल नव्हता. कांबळी सरांनी त्याची किती विनवणी केली, हरतऱ्हेनं समजावलं होतं. शेवटी फक्त एक दिवस येऊन बघेन आणि आवडलं नाही तर परत कधी म्हणजे कधीच येणार नाही, या अटीवर तो आला आणि पुढे येतच राहिला. त्यावेळी कांबळी सर म्हणाले होते, ‘‘अरे, सर्व प्रकारच्या कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे, नाहीतर या कार्यक्रमाला एकसुरीपणा येईल आणि एकसुरी जीवनासारखं तेही नीरस होईल. देवी सरस्वतीच्या हातातली वीणा पाहिलीस का? वीणेच्या तारा योग्य रीतीने जुळल्या तर जसं सुंदर संगीत उमटतं, तसंच जीवनातही सगळी लय नीटपणे साधली तर तेही सुरेल बनतं.’’ आर्य आणि त्याच्या हास्यकल्लोळात मग्न असलेल्या मित्र-मत्रिणींकडे पाहताना विराजला ते सारं आठवून देवी सरस्वतीच्या हातातल्या वीणेचं महत्त्व त्याच्या मनात अधोरेखित झालं. त्याने पुन्हा एकदा देवीचं ते रूपडं नजरेत साठवलं.

राजेश भरल्या डोळ्यांनीच सरस्वतीच्या त्या पांढऱ्या शुभ्र साडीतल्या आणि शुभ्र कमलपुष्पावर आरूढ झालेल्या मूर्तीकडे अनिमिषपणे पहात होता. झोपडपट्टीत राहणारा, पण चांगला खेळाडू असलेला राजेश जेव्हा गेल्या वर्षी काही मित्रांबरोबर बहकला होता त्यावेळी एकदा वारके सरांनी त्याला हाताला धरून फरफटतच ऑफिससमोरच्या देवीच्या मूर्तीपुढे उभं केलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, ‘‘पाहा, नीट डोळे उघडून पाहा या मूर्तीकडे. हिची पांढरी शुभ्र साडी हे स्वच्छ चारित्र्याचं प्रतीक आहे, तर हे जे कमलपुष्प तिचं आसन आहे ना, त्याचा अर्थ काय आहे माहीत आहे का? ते जसं चिखलात असूनही शुद्ध असतं ना, तसंच आपण ज्या समाजात राहतो त्यात दुर्गुण असतील तर त्यात आपण बुडून न जाता त्यापासून अलिप्त राहावं असं सांगतं ते. समजतंय का? येतंय का काही ध्यानात?’’ सरांनी केलेली कानउघाडणी अचूक लागू पडली होती आणि राजेश त्या भरकटवणाऱ्या मित्रांपासून दूर तर झाला होताच, पण तो आज राज्यपातळीवरचा नावाजलेला खेळाडू होता.

इतर सर्वजण परत आपापल्या सरावाकडे पुन्हा वळलेले पाहून हे सर्वजण क्षणार्धात त्यांच्यामध्ये सामील झाले. कारण सगळेजण कामना व्यक्त करत होते, ‘‘तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षूदे अमुच्या शिरी!’’

 -मेघना जोशी
joshimeghana231@yahoo.in