अपूर्वाचं नाटक लिहून पूर्ण झालं. खूप छान वाटत होतं तिला. आता नाटकाची तालीम सुरू करायची होती. इतक्यात गार्गी आलीच आणि तिचा पहिला प्रश्न- ‘‘अपूर्वा, माझ्यासाठी मुख्य भूमिका आहे ना नाटकात?’’ गार्गीपाठोपाठ तेजस, अमोद, भक्ती, रुची, अनन्या सगळे हजर. सगळ्यांचा एकच प्रश्न – ‘‘मला नाटकात मुख्य भूमिका आहे ना?’’ आता आली का पंचाईत! अपूर्वाला तर रडावंसंच वाटत होतं. नाटक लिहून मिळालेलं समाधान कुठल्या कुठे पळून गेलं आणि नाटक होणार तरी कसं? हा मोठ्ठा प्रश्न अपूर्वासमोर उभा राहिला.

‘गणंजय’ सोसायटीत दरवर्षी सगळे सण उत्साहात आणि नावीन्यपूर्ण कल्पनेने  साजरे व्हायचे. आता होळीचा सण जवळ आला होता. मुलांनी ठरवलं की, यावेळेस काहीतरी ‘हटके’ करू आणि शेवटी असं ठरलं की होळी साजरी करण्यामागची गोष्टच नाटय़रूपात सादर करायची. मुलांची ही कल्पना सोसायटीत सगळ्या मोठय़ांनाही आवडली. त्यानंतर नुकतच नाटय़ शिबिर केलेल्या अपूर्वाने नाटक लिहायचं ठरलं आणि आज नाटक लिहून पूर्ण झालं. तालमीकरता सगळे जमले, पण सगळ्यांनाच मुख्य भूमिका हवी होती. नाटकात प्रमूख भमिका तर चारच- हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हाद, होलिका आणि नृसिंह.. बाकी सगळे दरबारी. भांडाभांडीला सुरुवात झाली. कोण कोणती भूमिका करणार ठरवताना आवाज चढले आणि शेवटी आत अभ्यास करत बसलेल्या अपूर्वाच्या कॉलेजमधल्या दादाला बाहेर यावं लागलं. मुलं दादाभोवती जमली. ‘‘दादा, मला होलिका बनायचंय,’’ गार्गी ठामपणे म्हणाली.

‘‘म्हणे होलिका बनायचंय, प्रल्हाद तिच्या मांडीवर असणारे, तू चिमुरडी शोभणार तरी आहेस का?’’ रुची तिला चिडवत म्हणाली.

‘‘मी होलिका आणि माझा छोटा भाऊ प्रल्हाद’’ – इति भक्ती.

‘‘प्रल्हाद मला बनायचंय.’’ तेजस म्हणाला.

‘‘त्या छोटय़ा ओमला डोळ्यासमोर ठेवून लिहिलाय मी प्रल्हाद आणि सोहम हिरण्यकश्यपू शोभेल.’’ अपूर्वाने सांगायचा प्रयत्न केला.

‘‘आम्ही दरबारी म्हणून उभे राहणार नाही!’’ तेजस आणि अमोदने ठामपणे सांगून टाकलं.

शेवटी दादाने सगळ्यांना शांत केलं आणि तो बोलू लागला, ‘‘अपूर्वा, शिबिरात जाऊन तुला नाटक कसं लिहायचं कळलं म्हणे, पण यात काहीतरी वेगळेपणा हवा.’’

‘‘दादा ही गोष्ट कशी बदलणार मी?’’ अपूर्वा हिरमुसून म्हणाली.

‘‘अगं वेडे, गोष्ट नाही बदलायची, काळानुसार बदल करून सादर करायची.’’ दादा तिची समजूत काढत म्हणाला.

‘‘हिरण्यकश्यपूच्या हातात बंदूक? हाच ना काळानुसार बदल? धम्माल येईल.’’ तेजस उत्साहाने म्हणाला.

‘‘कॉमेडी नाही करायचीय आपल्याला, होळी का पेटवतात हे सांगण्याकरता सादरीकरण करणार ना तुम्ही? गोष्ट माहित्ये ना सगळ्यांना नक्की?’’ – दादा.

हळूहळू अनन्या, भक्ती आणि अमोदच्या ‘नाही’ अशा माना हलल्या. दादा सांगू लागला, ‘‘हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाला देवतांबद्दल खूप राग होता, तो स्वत:लाच श्रेष्ठ समजायचा. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा परमभक्त. तो सतत विष्णूचे नामस्मरण करायचा. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला बदलायचा खूप प्रयत्न केला. शेवटी चिडून त्याने प्रल्हादाचा वध करायचे ठरवले. त्याने स्वत:ची बहीण होलिका- जिला आगीत न जळण्याचं वरदान होतं, तिच्या मांडीवर प्रल्हादला बसवून चिता रचली, पण झालं उलटं. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हादाला काहीही झाले नाही. तेव्हापासून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी होळी पेटवतात.’ दादाची गोष्ट  सगळे मन लावून ऐकत होते. दादाने विचारलं, ‘‘आता हिरण्यकश्यपू नाही की होलिका नाही, मग का पेटवायची होळी?’’

दादाच्या या प्रश्नावर सगळे गप्पच. दादाने हिंट दिली- ‘‘आता कोणत्या वाईट प्रवृत्तींना जाळायची गरज आहे?’’

आता पटापट उत्तर यायला लागली. प्रदूषण, भ्रष्टाचार, प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्मार्टफोनचं व्यसन, वाढती गुन्हेगारी..

‘‘अरे बापरे, तुमच्याकडे तर भली मोठी यादीच आहे होळीत जाळून टाकायच्या गोष्टींची. आता आली गाडी रुळावर. आता हे पण करा ना सादर.’’ दादा म्हणाला.

अपूर्वा आनंदाने ओरडली, ‘‘ए भारी ए आयडिया, भक्त प्रल्हादाचं नाटक सादर केल्यावर हे पण सादर करायचं- आत्ताच्या जमान्यातलं आणि दोन्ही जोडून घ्यायचं. यात सगळ्यांना चांगली कामंही मिळतील नाटकात.’’ सगळ्यांचे चेहरे आनंदले. अपूर्वाला तर प्रदूषण, भ्रष्टाचार, प्लॅस्टिकच्या पिशव्या बनलेल्या आताच्या राक्षसांचे संवादही सुचू लागले. आता ‘गणंजय’ सोसायटीतली होळी जास्तच रंगणार होती, एका जोरदार नाटकाच्या सादरीकरणाने.

राजश्री राजवाडे-काळे shriyakale@rediffmail.com