वरद आज एकटाच घरी होता. आई-बाबा एका कार्यक्रमाला गेले होते. आजीच्या भिशी ग्रुपची मीटिंग होती. आणि ताईचं जादा लेक्चर होतं त्यामुळे सगळेच घराबाहेर होते. आज त्याने एकटेपणाचा एक फायदा करून घ्यायचं ठरवलं होतं. शेजारच्या खराडे आजींकडून जास्वंदीची फुलं आणून शाळेत शिकवलेल्या फुलाच्या lok18विविध भागांची एकदा उजळणी करायची ठरवली. त्याप्रमाणे तो फुलं घेऊन बसला होता. वरदच्या एक लक्षात आलं होतं, की अभ्यास करताना वाचन, पाठांतर, लेखन, मनन त्याचप्रमाणे जर असं प्रत्यक्ष पाहून, कृती करून अभ्यास केला तर तो एकदम पक्का होऊन जातो. त्यामुळे आज हे फुलाचे भाग पाहिले की त्यावर कोणताही प्रश्न येऊ दे, तो त्याला सोडवता येणार होता, हे नक्की!
आजीने दिलेली फुलं चांगलीच मोठी होती. त्यामुळे पुमंग, जायांग, बीजांडकोश वगरे सर्व भाग त्याला व्यवस्थित अभ्यासता आले. ते अभ्यासताना वरदच्या मनात एक वेगळाच विचार चमकला. हे जास्वंदीचं फूल कसं पुस्तकात वर्णन केलेले फुलाचे सगळे भाग तंतोतंत दाखवतं. म्हणजे ते आमच्या वर्गातल्या प्रणवसारखं आहे. तो अभ्यासात पकीच्या पकी गुण मिळवतो म्हणजे तो आदर्शच आहे. अनेक पालकही प्रणवकडे ‘आदर्श  मुलगा’ म्हणूनच पाहतात. हर्षची आई वारंवार प्रणवचंच उदाहरण देते आणि ‘आमच्या हर्षमध्ये काही अर्थ नाही,’ असंच म्हणते. हर्षची म्हणे तिला लाज वाटते, तो प्रणवसारखे उत्तम गुण मिळवत नाही म्हणून. ‘तरी बरं, आमच्या घरी असं काही नाहीये ते..’ वरदचं दुसरं मन म्हणालं. वरदच्या मनात याविषयीच जोरदार विचारांचं मंथन सुरू झालं. त्याला वाटू लागलं, वाटू लागलंच कशाला; पक्कंच झालं, की प्रणवसारखा विद्यार्थी म्हणजे ग्रेट. आम्हा इतरांचा काहीही उपयोग नाही. अशा विचारांच्या तंद्रीत तो पुरता हरवून गेला. ‘मी प्रणवसारखा होऊ शकेन का?’ हा प्रश्नही एकीकडे त्याला भेडसावत होता. या सगळ्या विचारांमध्ये तो एकदम हरवून गेला होता आणि एक मंद झुळूक त्याच्यापर्यंत पोहोचली. त्या झुळकीबरोबर बिल्डिंगबाहेर फुललेल्या चाफ्याचा मस्त सुवास घरात आला. स्वत:च्या नकळत वरदने तो मनसोक्तपणे हुंगला आणि त्याला एकदम उल्हसित वाटलं. ‘‘अरे, किती प्रसन्न वाटतंय या वासाने! हे म्हणजे आमच्या वर्गातल्यासारखंच झालं. प्रणव अभ्यासात हुशार आहे, पण तो कोणत्याही गटात आला तर तिथे एक प्रकारचा तणाव जाणवतो. कारण प्रणवचं वागणं एकदम जबाबदार वगरे.. त्यामुळे सगळ्यांना दडपणच येतं. पण राजू जर तिथे असेल तर काही चिंताच नाही. राजूही काही कमी हुशार नाहीए. पण तो सगळ्यांना एवढं सामावून घेतो आणि हसतखेळत काम पूर्ण करतो, की ते कधी पूर्ण झालं कोणालाच समजत नाही.’’ वरदच्या मनातल्या विचारांना पुन्हा गती आली.
..जास्वंदीचं पूर्णत्व किंवा सोनचाफ्याचा सुवास ही टोकाची वैशिष्टय़े झाली. पण सदाफुली, ऑफिस टाइम, कण्हेर यांच्याकडे ती वैशिष्टय़े नाहीत म्हणून ती कमी आहेत असं थोडंच आहे? अगदी देवळामागचा पांढरा चाफा किंवा देवचाफाच घेतला तर त्याच्याकडे कोणतंही टोकाचं वैशिष्टय़ नाही, तरी तो बहरतो, फुलांची पखरण करतो आणि मुलांना अंगठी करून घालण्याचं समाधानही देतो. ऐनवेळी आता देवाला काय वाहू, हा प्रश्नही सोडवतो. कमी तिथे आम्ही असं त्याचं वागणं असलं तरी तो कमी आहे का? ‘‘नाही, नाहीच!’’ वरद मनात ठामपणे म्हणाला. त्याचाच भाईबंद असलेला लाल चाफा पाडव्याला गुढीबरोबर मिरवतोच की! मग वरदच्या मनात अनेक फुलांनी फेर धरला. सुवासिक मोगरा, नाजूक जाई-जुई, टिकाऊ जरबेरा, आकर्षक टय़ुलिप्स, रंगीबेरंगी गुलबक्षी, मनमोहक गुलाब, लक्षवेधी झेंडू, दिलखेचक निशिगंध..  ‘इनमें से कौन अच्छा और कौन बुरा?’ वरदने स्वत:लाच विचारलं.
‘‘अरे भई, सभी तो अच्छेही अच्छे है,’’असं मनात म्हणून खुदकन हसलाच तो. गुलाब सुंदर असला तरी दसऱ्याला झेंडूचीच तोरणं लावतात आणि झेंडू लक्ष वेधून घेत असला तरी केसात जाई-जुई, मोगरा, शेवंतीच माळतात. गुलबक्षी रंगीबेरंगी असली तरी ती काही कोणाच्या स्वागताला वापरत नाहीत. तिथे गुलाबाचाच उपयोग करतात. तसंच आमच्या वर्गात आहे. वरदच्या मनाने तुलना सुरू केली. म्हणजे प्रणव जरी अभ्यासात हुशार असला तरी निशा कित्ती स्पर्धामध्ये बाजी मारते! अनीश कोणत्याही कार्यक्रमाचं उत्तम नियोजन करतो. सुरभी कित्ती सुंदर सजावट करते. अर्णव हरतऱ्हेची उत्तमोत्तम पेंटिंग्ज् करतो. हे सगळे ठळक वैशिष्टय़े असणारे. पण घरात वयस्कर आजीची सेवा करून शाळेत येणारा शंतनू, सकाळी पेपरची लाइन टाकणारा रजत, स्वत:बरोबर झोपडपट्टीतल्या पाच-सात मुलांना शाळेत आणणारी रिचा, आणि ज्याच्या डोक्यात सतत काही ना काही किडा वळवळत असतो असा वरद! यापकी कोणी कमी नाही आणि कोणीही जास्त नाही. ‘हम तो सब फूल है भय्या- एकही बगीचे के।’ नवीन खूप काही गवसल्याच्या आनंदात वरद शीळ घालत उठला आणि हे सांगण्यासाठी घरातल्या इतरांची आतुरतेने वाट पाहू लागला.