अपर्णा शाळेच्या नोटीस बोर्डावर लावलेला एक लेख वाचत असताना शलाका तिथे धावत आली.

‘‘अप्पू, मला बहीण झाली आज पहाटे.’’

‘‘भारी! कशा आहेत दोघी?’’

‘‘एकदम छान! मी आत्ता हॉस्पिटलमधूनच येतेय.’’

‘‘शलाका, हा लेख वाच. जाधवबाईंनी आजच लावलाय बोर्डावर. छत्तीसगढमधल्या एका गावात म्हणे दसऱ्याला सगळ्या मुलीच रामलीला रंगवतात. रामापासून ते रावणापर्यंतचं प्रत्येक पात्र या आदिवासी आणि मागासवर्गीय समाजामधील सुमारे तीस-एक मुली रामलीला वठवतात. यापूर्वी गावातली मुलं ही रामलीला करायचे. पण त्यांनी थांबवल्यावर तिथल्या मुलींनी रामलीला करायचं ठरवलं. हल्ली आपण टी.व्ही.वर स्त्री पात्र करणारे पुरुष बघतो. पण इथे बरोबर उलटं आहे. मस्त नं?’’ शलाकानेही लेख सविस्तर वाचला. पण तिचा चेहराच पडला.

‘‘अशी सुधारणा वगैरे काही होत नसते गं, अप्पू!’’

‘‘तू एकदम नकारात्मक का बोलतेस?’’

‘‘पाहिलंय म्हणून बोलतेय. आईला तिसरीही मुलगी झाली म्हणून आजी बाळाला बघायला अजून आलीसुद्धा नाहीये.’’ दोघी सातवीत असल्यामुळे त्यांना परिस्थितीची चांगलीच समज होती.

‘‘तुझे बाबा काही म्हणत नाहीत?’’

‘‘ते खरं तर नाही मानत मुलगा-मुलगी भेद वगैरे! पण आजीपुढे कुणाचंच काही चालत नाही.’’

दोघींमध्ये हे संभाषण सुरू असताना जाधवबाई तिथे आल्या.

‘‘काय मुलींनो, कुठपर्यंत आलीये तालीम?’’

‘‘तालीम व्यवस्थित सुरू आहे.’’ अपर्णा म्हणाली.

‘‘तुमचा आग्रह म्हणून ‘मी दुर्गा’चा पहिला प्रयोग ठेवलाय दसऱ्याच्या कार्यक्रमाला. जबाबदारी मोठी आहे!’’

नवरात्रानिमित्त दरवर्षी दसऱ्याच्या संध्याकाळी शाळेच्या पटांगणात मुलांची रामलीला सादर झाल्यानंतर रावणाची प्रतिमा दहन करण्याचा प्रघात होता. मात्र यंदा शाळेतल्या मुलींनी मुख्याध्यापकबाईंकडे रामलीलेच्या बरोबरीने त्यांच्या शारदा कलामंचाने बसवलेला ‘मी दुर्गा’ हा नवा नृत्याविष्कार सादर करण्याची संधी देण्यासाठी गळ घातली होती. साधारण सात ते आठ मिनिटांच्या या नृत्याच्या कार्यक्रमातून दहा-एक मुली विविध क्षेत्रांमधील पाच सक्षम स्त्रियांचा गौरव करणार होत्या. कार्यक्रमाची कल्पना जाधवबाईंचीच होती.

‘‘कुठल्या पाच ‘दुर्गा’ निवडल्या आहेत?’’ बाईंनी विचारलं. त्या मुलींना विचार करायला नेहमीच प्रवृत्त करायच्या.

‘‘राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ..’’

‘‘सुरेख! पण चारच झाल्या. पाचवी?’’

‘‘एखादी सर्वसाधारण स्त्रीसुद्धा घेतली तर?’’ अपर्णाने सुचवलं. सातवीतल्या मुलीकडून बाईंना असा विचार अनपेक्षित होता.

‘‘म्हणजे कसं?’’

‘‘आमच्याकडे घरकामाला येणाऱ्या यमुनाबाईंची मुलगी तालुक्याच्या कॉलेजात इंजिनीअरिंग शिकतेय. घरातली आर्थिक परिस्थिती बेताची. शिक्षणासाठी पैसे अपुरे पडतात म्हणून ती शिकवण्या घेऊन, एका दुकानात पार्टटाइम काम करून पैसे जोडतेय. परिस्थितीला खंबीरपणे तोंड देतेय. तीपण एक ‘दुर्गा’च आहे नं बाई?’’

‘‘अर्थात!’’

‘‘मग तिच्यासारख्या स्त्रियांचासुद्धा गौरव व्हायला हवा!’’

‘‘सुचलीये का कुणी तुम्हाला?’’

‘‘विचार चाललाय.’’

‘‘पण वेळ आहे का तेवढा?’’

‘‘इतर चार पात्रं ‘फिक्स’ आहेत. फक्त हा नवा ‘पार्ट’ बसवायचाय. जमवू आम्ही.’’ अपर्णाने आश्वासन दिलं.

‘‘बाई, मी भाग नाही घेतला तर चालेल?’’ शलाकाने चाचरत विचारलं.

‘‘का गं? तू तर आमची प्रमुख ‘डान्सर’ आहेस! आईला तुझी मदत लागेल म्हणून म्हणतेस का?’’

‘‘तसं नाही. आमचं एकत्र कुटुंब. मला दोन चुलत भाऊ  आहेत. एकाने शिक्षण सोडलंय. एकाला शाळेतून आठवीतच काढून टाकलंय. दोघे काहीही करत नाहीत. तरी आमच्या आजीचा मायेचा सगळा प्रवाह त्यांच्याकडेच. फक्त मुलगे म्हणून. मी आणि माझी धाकटी बहीण शिकतोय तेही तिला खटकतं. म्हणते ‘मुलींनी शिकून काय करायचं?’ आता जोडीला तिसरी आलीये. म्हणजे झालंच. मी माझ्या आजीची विचारसरणी बदलू शकत नाही. जगाला काय शिकवणार?’’

‘‘म्हणून भाग नं घेणं हा काही पर्याय नाही. तुम्ही रंगवणाऱ्या दुर्गानादेखील खूप संघर्ष करावा लागला होता.’’

‘‘आजी नवरात्राचे नऊ  दिवस कडक उपवास करते, देवीला पुजते, पण मुलगी झाली म्हणून नाकही तीच मुरडते. कितीही इच्छा झाली तरी मला काहीच बोलता येत नाही. सावित्रीबाई फुले एखादीच असते.’’

‘‘पण त्या एका सावित्रीबाईमुळे आज तुम्हाला शिकायची संधी मिळाली आहे. आनंदीबाईंमुळे मुली डॉक्टर होताहेत. तुझ्या आजीच्या पोटाचं ऑपरेशन एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडून करून घेण्याचा तिचाच हट्ट होता नं?’’

‘‘बाई, म्हणतात नं की ‘शिवाजी जन्मावा, पण तो दुसऱ्याच्या घरात’.’’ अपर्णा उपहासाने म्हणाली.

‘‘मुलींनो, यावर मी इतकंच म्हणेन की आपल्या प्रत्येकीमध्ये एक ‘दुर्गा’ असतेच. फक्त तिचा शोध घ्यायला हवा..’’

**

त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर शलाका आईला भेटून घरी आली. घरात आजी आणि शलाकाचे दोघे चुलत भाऊ  राजू आणि संजू होते. कुणाशीही न बोलता शलाका दप्तर ठेवायला तिच्या खोलीत गेली. ती कुठल्याशा विचारांत गढली होती.

एवढय़ात तिला घराच्या गच्चीवरून ‘वाचवा, वाचवा’ म्हणून संजूचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. शलाका धावतच तिथे गेली. पाहते तर राजू अडकलेला पतंग काढताना एका उघडय़ा तारेला चिकटला होता आणि संजू मदतीसाठी ओरडत होता. शलाकाने इथे-तिथे पाहिलं. तिला कोपऱ्यात एक लाकडाची काठी पडलेली दिसली. एका हातामध्ये ती काठी घेऊन दुसऱ्या हाताने तिने चिकटलेल्या राजूला जोरात ढकललं. तो तारेपासून सुटला. शॉकमुळे त्याच्या हाताला थोडं भाजलं. पण तो ठीक होता. फक्त खूप घाबरला होता. गडबड ऐकून जमा झालेल्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या दवाखान्यात नेलं.

या सगळ्या प्रकारामध्ये आजी नुसती रडत होती. शलाकाने तिला पाणी देऊन आधी शांत केलं.

‘‘शलाके, आज तुझ्यामुळेच वाचला आपला राजू. संजूलाही काही सुचेना. पण तू ऐनवेळी प्रसंगावधान दाखवलंस म्हणून संकट टळलं. कुठे शिकलीस गं हे?’’ आजी चक्क कौतुकाने म्हणाली.

‘‘आम्हाला विजेचा झटका लागला की काय करायचं असतं, हे शिकवलंय शाळेत.’’

‘‘मी नेहमीच तुम्हा मुलींचा दु:स्वास करत आले. तुमच्या शिक्षणाला विरोध केला. पण तेच आज उपयोगी पडलं. तू माझे डोळे उघडलेस पोरी. तुम्ही तिघी खूप शिका. मोठय़ा व्हा! आणि हो, राजूची खुशाली कळल्यावर आई आणि बाळाला पाहायला आपण हॉस्पिटलात जाऊ या.’’ असं म्हणत आजीने शलाकाला जवळ घेतलं. शलाकाच्या डोळ्यांत टच्कन पाणी तरळलं.

**

शलाकाच्या या पराक्रमाची बातमी लगेचच संपूर्ण गावात पसरली. जो तो तिचं भरभरून कौतुक करत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शाळेच्या हॉलमध्ये शलाका तालमीसाठी आली तेव्हा ‘मी दुर्गा’ची अख्खी टीम आणि जाधवबाई तिथे आधीपासूनच उपस्थित होत्या.

‘‘बाई, आपली पाचवी दुर्गा ठरली!’’ अपर्णा उत्साहाने म्हणाली.

‘‘कोण गं?’’ बाईंच्या स्वरात एक मिश्कीलपणा होता.

‘‘शलाकाऽऽऽऽऽऽऽ’’ सगळ्या जणी एकत्र ओरडल्या. ‘‘अगदी बरोबर! असाधारण कामगिरी करणारी आपल्यामधलीच एक ‘दुर्गा’. ‘मी दुर्गा’मधून या धैर्यवान दुर्गेचा गौरव व्हायलाच हवा.’’ बाई शलाकाची पाठ थोपटत म्हणाल्या.

शलाकाच्या चेहऱ्यावर एक निराळंच तेज होतं. तिला तिच्यामधली दुर्गा सापडली होती..

प्राची मोकाशी

mokashiprachi@gmail.com