साधारण पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट..

‘‘सोहम, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत ‘नो फटाके’ मोहीम सुरू ठेवायचीय ना?’’ आशू स्टॅम्प बाकडय़ाला टेकवत म्हणाला.

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Gudhi padwa 2024 sade tin muhurta
Gudhi Padwa 2024: साडेतीन मुहूर्त कोणते? गुढीपाडव्याशिवाय ‘या’ अन्य अडीच दिवसांचं महत्त्व काय?
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा
Gudhi Padwa Amrut Siddhi Yog Chaitra Navratri To Ram Navami In 2024
अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान

‘‘अर्थात! गेल्या वर्षीची पत्रकं पुन्हा वाटूयात दोन्ही बिल्डिंगमध्ये! त्याचा फॉरमेट माझ्याकडे सेव्ह केलेला आहे कम्प्युटरवर.’’ सोहम हातामधल्या चेंडूने बॉलिंगची अ‍ॅक्शन करत आला.

‘‘ते काम माझ्याकडे लागलं.’’ प्रिया तिथे येत म्हणाली. तिला सामाजिक जागरूकता वगैरेची कामं करायला जाम आवडायचं. तिच्याबरोबर निधीपण होती. चिन्मय, वेदश्री, अथर्व आणि रिया एकमेकांच्यात रेस लावत आधीच तिथे पोहोचले होते.

क्रिकेट खेळून झाल्यावर सोसायटीमधली ही उद्योगी मंडळी सोसायटीच्या पटांगणातील बाकडय़ांवर सोहमने बोलवलेल्या ‘शॉर्ट मीटिंग’ साठी जमली होती. ती त्यांची जमण्याची ठरलेली जागा होती. सगळी एकाच शाळेत सातवीत शिकत होती.

‘‘यावर्षीही बनवायचा ना आपण किल्ला?’’ चिन्मयने सर्वाना विचारलं.

‘‘तो तर करूयातच. पण अजून काहीतरी वेगळं करूया!’’ सोहमच्या डोक्यात नवी कल्पना शिजतेय हे सर्वानीच ओळखलं. ‘पण काय?’ चं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होतं.

‘‘आपण आपला एक लहानसा दिवाळी अंक काढला तर?’’ -इति सोहम.

‘‘भन्नाट आयडिया! पण तुला ही सुचली तरी कशी?’’ प्रिया टाळी वाजवत म्हणाली.

‘‘यावर्षीच्या शाळेच्या अंकात माझी कविता छापून येणार आहे, असं आज बाई वर्गात म्हणाल्या. त्यावरून एकदम सुचलं. आपला हा अंक आपण सोसायटीमधल्या प्रत्येक घरात वाटायचा.’’

‘‘सोहम, तुझ्या कविता असतातच अफलातून. आपल्यालाही अंकासाठी लेख, कथा, कविता, चित्रं.. लागतीलच, ते कुठून आणायचे?’’ आशूची शंका.

‘‘आपण स्वत: तयार करायचे! तीस-एक पानांचा अंक जरी झाला तरी पुष्कळ आहे.’’ सोहम आत्मविश्वासाने म्हणाला.

‘‘सोहमकडे नेहमीच कवितांची ‘बँक’ तयार असते. त्यातल्या काही कविता छापू. आशू, तू गेल्या वर्षी कास पठारावरच्या फुलांचे सुंदर फोटो काढले होतेस, ते छापू.’’ अथर्व ने सुचवलं.

‘‘ज्याला जे जमेल ते त्याने द्यायचं. कसली सक्ती नाही.’’ -सोहम.

‘‘मी ओरीगामीमधली एखादी ‘आर्ट’ तयार करण्याची कृती देईन.’’ निधी ओरीगामी खूप छान करायची.

‘‘मी बॅडमिंटनबद्दल किंवा एखाद्या बॅडमिंटनपटूबद्दल लिहीन.’’ वेदश्री स्टेट-लेव्हेलची बॅडमिंटन खेळाडू होती.

‘‘अथर्व, आपण मिळून एखाद्या वाद्याविषयी माहिती देऊ .’’ चिन्मय म्हणाला. चिन्मय शाळेत सिंथेसायझर शिकायचा आणि अथर्व तबल्याच्या क्लासला जायचा. वेदश्री आणि प्रियाने मिळून अंकाच्या संकलनाची जबाबदारी उचलली. सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता वेगवेगळ्या कल्पना आकार घेऊ  लागल्या होत्या.

‘‘आणि लिहिण्याचं माध्यम?’’-इति आशू.

‘‘इंग्लिश, मराठी, हिंदी काहीही चालेल.’’ सोहम म्हणाला.

‘‘जर एखाद्याचा लेख बरा नाही वाटला तर?’’ वेदश्रीची शंका. ती संकलनाच्या ‘मूड’मध्ये शिरली होती.

‘‘तरी घ्यायचा तो! शेवटी प्रोत्साहन महत्त्वाचं. अंक आपल्या आपल्यातलाच आहे ना? थोडेफार बदल करावे लागले तर बघूया तेव्हा!’’ सोहम अधिकारवाणीने म्हणाला.

‘‘पण छापायचं कसं? प्रत्येकाच्या घरी एक एक कॉपी द्यायची म्हणजे चाळीस-एक प्रति तरी लागतीलच. आणि खर्च?’’-आशूची पुन्हा शंका.

‘‘याच्या शंका काही संपत नाहीत बुवा!’’ प्रिया वैतागली.

‘‘सोसायटीबाहेरच्या डी.टी.पी. वाल्याकडून छापून घेऊ . सोसायटीची सगळी सक्र्युलर्स तिथेच छापतात. तो आपल्याला डिस्काउंटही देईल.’’ रियाने माहिती पुरवली. तिचे बाबा सोसायटीचे सेक्रेटरी होते.

‘‘मेन कॉपीची आपण कम्प्युटरवर प्रिंट घेऊ . बाकीच्या प्रति झेरॉक्स करू. कलर किंवा लागतील तशा. बाईंडिंगही करून घेऊ . खर्च नंतर आपल्यात वाटूप घेऊ! आपली पिगीबॅंक आपल्या मदतीला आहेच की!’’ सोहमचं ‘सोल्युशन’ तयार होतं. आपली आयडिया सगळ्यांनी मनावर घेतली याचा सोहमला विशेष आनंद होता.

पुढे आठएक दिवस सहामाहीच्या परीक्षा होईपर्यंत हा विषय तसा मागेच पडला. पण शेवटचा पेपर झाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी सगळे आवर्जून भेटले. दिवाळीच्या आधी त्यांच्याकडे फक्त एकच आठवडा शिल्लक होता. त्यामुळे त्या आठवडय़ात संपूर्ण दिवाळी अंक तयार करण्याचं आव्हान मंडळींपुढे होतं. लेखन-साहित्य जमा करायला चार-पाच दिवस आणि छपाई-वितरणासाठी एक-दोन दिवस असा ढोबळ आराखडा मुलांनी आखला. दिवाळी सुरू व्हायच्या आधी अंक तयार व्हायला, म्हणजे सुट्टय़ांमध्ये तो सगळ्यांना वाचता येईल असा त्यांचा ‘प्लॅन’ होता.

वेदश्रीने तिच्या दादाच्या मदतीने बॅडमिंटन आणि तिच्या आवडत्या तीन-चार खेळाडूंबद्दल माहिती देणारा सुरेख लेख लिहिला. प्रिया अलीकडेच रायगडाच्या ट्रेकिंगला जाऊन आली होती. तिने त्याचं वर्णन आणि अनुभव लिहिले. त्याचबरोबर मोबाइल कॅमेऱ्यातून टिपलेले काही फोटोही जोडले. सोहमने तिला त्यात काही भाषेच्या ‘करेक्शन’ सुचवल्या ज्या तिने अगदी खिलाडूवृत्तीने समाविष्ट केल्या. रियानेही मग स्फुरण घेऊन वसुबारस ते भाऊबीज या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाबद्दल सखोल माहिती दिली. सगळ्यांनाच ती खूप आवडली. अवांतर लिहिण्याचा हा तिचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे तीसुद्धा मनातून एकदम खूश झाली. आशूने साताऱ्याजवळील कास पठारावर उमलणाऱ्या विविध रंगांच्या आणि जातींच्या फुलांचे फोटो प्रिंट केले. त्याने त्यांच्याबद्दलची शास्त्रीय माहिती ‘इंटरनेट’वरून मिळवली आणि स्वत:च्या शब्दांतून मांडली. सोहमने त्याच्या कवितांच्या बँकमधून दिवाळीसाठी लिहिलेल्या खास अशा दोन-तीन कविता निवडल्या. निधीने ओरीगामीचे दोन-तीन प्रकारचे छोटे आकाशकंदील घरी बनवले आणि ते बनवण्याची प्रत्येक ‘स्टेप’ फोटो काढून ‘प्रिंट’ केली. चिन्मयने सिंथसायझर तर अथर्वने तबल्याच्या इतिहासाबद्दल भरपूर माहिती दिली. इंटरनेटवरून मिळालेल्या जोक्स आणि कोडय़ांचीही या सगळ्यांत भर पडली. म्हणता म्हणता पन्नास पानांचा दिवाळी अंक कम्प्युटरवर तयार झाला.

आता प्रश्न राहिला होता तो कव्हर-पेज, अंकाची किंमत आणि अंकाच्या नावाचा. सर्वानुमते अंकाला ‘फुलबाजी’ हे रियाने सुचवलेलं नाव देण्याचं ठरलं. कव्हर-पेजसाठी प्रियाने एक झक्कास शक्कल लढवली. तिने सगळ्यांना पेपरांमधून येणाऱ्या आकाशकंदील, रोषणाई, रांगोळ्या, मिठाई अशा रंगीबेरंगी चित्रांची कात्रणं आणायला सांगितली. त्यातून तिने एक सुंदर कोलाज तयार केलं. आशू तर ‘फोटोशॉप’ सोफ्टवेअरचा मास्टर होता. फोटोशॉपच्या सहाय्याने त्याने त्याच कात्रणांचा उपयोग अंकाचं प्रत्येक पान सजवण्यासाठी केला. अंकाच्या नावाचं ‘लेटरिंग’ तर त्याने एकदमच लाजवाब बनवलं होतं. भरपूर खल झाल्यानंतर अंकाची किंमत शंभर रुपये ठरली.

अंक प्रिंट होऊन आला तेव्हा मुलांच्या आनंदाला अगदी उधाण आलं होतं. पटापट झेरॉक्स निघाल्या. मुलांनी घरोघरी जाऊन अंक विकला. सगळ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि आनंदाने त्यांच्या अंकाचा मोबदलाही दिला.

दिवाळी आता अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती..

मंडळी पुन्हा त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जमली.

‘‘किती जमले गं?’’ चिन्मयचा प्रश्न.

‘‘चार हजार.’’ रिया शेवटची नोट मोजत म्हणाली.

‘‘काय करायचं एवढय़ा पैशांचं?’’ अथर्व भुवया उंचावत म्हणाला.

‘‘मी एक सुचवू? पुस्तकं विकत घेऊ  दिवाळीनिमित्त. आपलं स्वत:चं वाचनालय सुरू करू.’’- इति प्रिया.

‘‘एकदम भारी.’’ निधीने लगेचच कल्पना उचलून धरली.

‘‘वॉव्ह! म्हणजे आपल्या खऱ्या कमाईचे वाचनालय!’’ वेदश्रीही उत्साहाने म्हणाली.

‘‘आपण दरवर्षी असा दिवाळी अंक काढून आपल्या खऱ्या कमाईने त्यांत नवीन पुस्तकांची भर घालत राहू.’’ आशू म्हणाला.

‘‘पर्फेक्ट! तर मित्रांनो, आपली यंदाची दिवाळी ही अक्षर दिवाळी..’’ सोहम प्रियाच्या आयडीयाला ‘थम्स-अप’ करत म्हणाला. सगळ्यांनी ‘हिप हिप हुर्रे’ करत त्याला दुजोरा दिला.

– प्राची मोकाशी

mokashiprachi@gmail.com