बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने पर्यावरण सांभाळणारा गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, यावर आधारीत आजचे कोडे आहे. हा उत्सव उत्साहाने आणि कल्पकतेने साजरा करताना पर्यावरणाशी आपले नाते दृढ कसे होईल, हे कोडय़ाच्या माध्यमातून सुचवण्याचा प्रयत्न आहे. ‘अ’ गटात गणेशोत्सवाशी संबंधित आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ‘ब’ गटात त्यांचा पर्यावरणाशी कसा संबंध आहे ते सांगितले आहे. तर ‘क’ गटात आपण त्याबाबत काय करू शकतो, हे सुचवलेले आहे. तुम्हाला या तिन्ही गटांतील गोष्टींच्या जोडय़ा लावायच्या आहेत. चला, करू या सुरुवात.. देऊ या पर्यावरणाला हात.
(SAVE EARTH)
अ गट
१.    स्वस्त आणि मस्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) गणेशाची सुबक मूर्ती.
२.    थर्मोकोलची सजावट, प्लॅस्टिकची फुले, पाने, इ.
३.     गणेशमूर्तीना असलेले चमकदार रंग.
४.     अवाढव्य गणेशमूर्ती.
५.     मंडपातील विद्युत रोषणाई.
६.    उत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साऊंड सिस्टीम्स.
७.     विसर्जनाच्या भव्य मिरवणुका.
८.     कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि मागितली जाणारी वर्गणी.
ब गट
i. आधीच टंचाई असलेल्या आपल्या देशात विजेसारख्या राष्ट्रीय संपत्तीची उधळपट्टी.
ii. एका ठराविक मर्यादेवरील आवाजाची पातळी ओलांडल्यामुळे आरोग्यावर विघातक परिणाम, अर्भके, वृद्ध व आजारी व्यक्तींना असह्य़ त्रास.
iii. गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी वाहतुकीस तसेच विद्युत तारा, कमी उंचीचे पूल यासारख्या सुविधांना त्रासदायक ठरतात.
iv. महागाईने आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांवर अधिक भार.
v. या मूर्ती विसर्जन केल्यावर नदी/तलावांच्या पाण्याला कठीणपणा देतात. तसेच किनारपट्टीची किंवा नदीच्या पात्राची दूरगामी हानी करतात.
vi. यांचे विघटन लवकर होत नसल्यामुळे विसर्जनानंतर पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरतात.
vii. योग्य कालावधीत न संपल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडते.
viii. रासायनिक रंग विषारी असू शकतात. विसर्जनानंतर पाण्यातील सजीवांना मारक ठरतात.
क गट
1.    आरास करण्यासाठी शक्यतो पाने, फुले, धान्य, बिया इत्यादी नैसर्गिक गोष्टी  वापराव्यात. निर्माल्य टाकण्यास कुंडाचा वापर करावा.
2. ध्वनियंत्रणा वापरताना वेळ-काळ-परिसराचे भान ठेवून दिलेल्या मर्यादेत वापर करावा.
3. मूर्ती शक्यतो शाडूसारख्या नैसर्गिक मातीच्या असाव्यात; ज्या विसर्जनानंतर लवकर विरघळतील. पीओपी मूर्तीचे विसर्जन कलशात करावे.
4. प्रतिष्ठेसाठी मूर्तीचा आकार वाढवण्यापेक्षा तो पैसा विधायक कामांसाठी वापरावा.
5. नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या मूर्तीचा आग्रह धरावा.
6. वर्गणी ऐच्छिक असावी. जमलेल्या निधीची उधळपट्टी टाळावी.
7.  विजेचा आवश्यक तेवढाच वापर करावा. सजावटीसाठी इतर कलात्मक युक्त्या वापराव्यात.
8.  विसर्जनाची मिरवणूक ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या पद्धतीने होईल याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
बिंदू जोडून गणपतीचे चित्र पूर्ण करा व रंगवा