‘‘असा तोंड पाडून काय बसला आहेस? आई काही बोलली की बाबांनी सहलीला जायला परवानगी नाकारली?’’ बंडय़ाने अथर्वला विचारलं.
‘‘अरे, एक प्रॉब्लेम झालाय.’’ अथर्व म्हणाला.
‘‘काय रे, काय झालं?’’ बंडय़ाने जरा काळजीतच विचारलं.
‘‘काही नाही रे, आजीला बरं वाटत नाहीए. डॉक्टर काकांनी तिला कायम उकळलेले पाणी प्यायला सांगितले आहे आणि त्यात नेमका आमचा गॅस संपला आहे. आणखी आठ दिवस तरी येणार नाही.’’
‘‘ठीक आहे, त्यात काय एवढं? हिटरने तापव ना!’’ पिंकी म्हणाली.
‘‘काय ग पिंके, तुमचा टीव्ही चालू आहे का?’’ बंडय़ानं आता पिंकीकडे मोर्चा वळवला.
‘‘नाही रे, खरं म्हणजे मला आज सकाळी मिकी माऊस पाहायचं होतं, पण टीव्ही लागतच नाहीए आमचा.’’- पिंकी.
‘‘अगं, आज पॉवर कट आहे. टीव्हीच काय काहीच लागणार नाही.’’ अथर्व.
‘‘हो खरंच मोठा प्रॉब्लेम आहे रे. आता काय करायचं रे?’’- पिंकी.
‘‘आता आपण काय करायचं?’’ बंडया मोठय़ा माणसासारखा विचार करत म्हणाला.
‘‘अरे, शेजारचे काका आहेत ना, त्यांना बरीच माहिती आहे. आपण त्यांनाच विचारू.’’ पिंकीने नुसतं काकांचं नाव काढताच सगळे जण त्यांच्याकडे गेले.
‘‘काय रे बच्चे कंपनी आज सकाळी सकाळीच काकांची कशी आठवण झाली?’’ काकांनी मुलांचं स्वागत केलं.
बंडय़ाने मग प्रॉब्लेम सांगितला. काका गंभीर चेहरा करून म्हणाले, ‘‘आता रे काय करायच? मोठा अवघड प्रश्न तुम्ही आणला आहात.’’
‘‘काका काहीही करा, पण तुम्ही या अथर्वला वाचवा.’’ नारायण पेशव्यांच्या अविर्भावात पिंकी म्हणाली.
‘‘बरं, पाहू या काय करता येईल! तुम्ही मला एक सांगा, तुमच्यापकी कुणाला बहिर्गोल भिंग माहीत आहे?’’ काकांनी विचारलं.
बंडय़ा म्हणाला, ‘‘माझ्याकडे एक आजोबांच्या चष्म्याचे बहिर्गोल भिंग आहे. आणि बरं का काका, आम्हाला शाळेत एक प्रयोग करून दाखवला होता.’’
‘‘बरं मग मला हे सांग, बाहेर सूर्यप्रकाश आहे का?’’ खिडकीतून पाहत म्हणाले. तो तर स्वच्छ दिसतोयच. आपण सूर्यप्रकाशात भिंग ठेवले तर किरण एकवटतात. समजा आपण तिथे कापूस ठेवला तर काय होईल? आता मला हे सांगा, तुमच्यापकी कोणी नेहरू सायन्स सेंटरला
भेट दिली आहे का?’’
‘‘मागच्याच वर्षी आमच्या शाळेची सहल तिकडे गेली होती.’’अथर्व.
‘‘तिथे तू आरशांचे दालन पाहिलं होतंस का? तेथे वेगवेगळ्या प्रकारचे आरसे होते ना?’’ काकांनी विचारले.
‘‘हो ना, त्याला लाफिंग मिरर असंच नाव होतं. एका आरशासमोर मी उभा राहिलो तर काटकुळा आणि लंबू दिसत होतो.’’ – अथर्व.
‘‘तू आणि काटकुळ्यासारखा दिसत होतास?’’ त्याच्याकडे पाहत व फिदी फिदी हसत पिंकीने विचारलं.
‘‘हो! आणि बरं का काका, एक आरसा होता त्यासमोर उभा राहिलो तर गोल मटोल भीमासारखा दिसत होतो.’’ अथर्वने आणखी माहिती पुरवली.
‘‘तुम्हाला माहीत आहे का, अंतवक्र्र आरसा बहिर्गोल भिंगासारखे काम करतो. तो सूर्यप्रकाशात ठेवला तर सूर्यकिरण एका ठिकाणी केंद्रित होतात आणि उष्णता एकवटते.’’ इति काका.
‘‘पण त्याचा इथे काय संबंध?’’ बंडय़ाने काकांना प्रश्न विचारला.
‘‘आपण तेच तत्त्व वापरून पाणी गरम करू या.’’ काका पुढे म्हणाले.
आपण आंतर्वक्र आरशाऐवजी, पॅराबोलाच्या आकाराचा म्हणजेच छत्रीच्या आकाराचा परावर्तक बनवायचा. आपल्या कोणाकडे चांदीसारखा पदार्थ आहे?’’ काकांच्या या प्रश्नावर पिंकी म्हणाली, ‘‘आमच्याकडे पोळ्या, अन्न पदार्थ गरम ठेवण्यासाठी चांदीची फॉइल आहे.’’
‘‘ती घेऊन येशील का? आपण आरसा किंवा अ‍ॅल्युमिनियमऐवजी त्याचे तुकडे वापरू. पॅराबोलाच्या आतील भागास आरशाऐवजी अ‍ॅल्युमिनियमच्या फॉइलचे छोटे २ तुकडे लावायचे. सूर्यप्रकाशात तो आरसा ठेवायचा आणि त्याचा केंद्रिबदू ज्याच्यात पाणी गरम करायचे आहे तेथे, त्या भांडय़ापाशी आणायचा. तुम्हाला आर्किमिडीज माहीत आहे का?’’
‘‘हो, त्याने राजाच्या मुकुटात असलेल्या सोन्यातील भेसळ शोधून काढली आणि युरेका युरेका असे ओरडत रस्त्यातून गेला तोच ना?’’ बंडय़ाने उत्तर दिलं.
‘‘होय तोच. त्याने शत्रू सन्याची (रोमन ) जहाजे निव्वळ साधे आरसे वापरून जाळली होती, म्हणजे त्यात किती उष्णता असते हे तुमच्या लक्षात येईल.’’ काकांनी अधिक माहिती दिली.
‘‘आपण पॅराबोलाच्या आकाराचा परावर्तक वापरू या. छोटे छोटे अ‍ॅल्युमिनियमचे तुकडे वापरून त्याला पॅराबोलाचा आकार द्यायचा आणि त्याच्या केंद्रस्थानी आपण छोटे पातेले ठेवू. वास्तविक काचेचे भांडे जास्त चांगले का, हे कोण सांगू शकेल.’’
‘‘कारण धातूपेक्षा काचेतून उष्णतेचे वहन कमी होते, ती फारशी बाहेर जाणार नाही.’’ बंडयाने अचूक उत्तर दिले.
‘‘अगदी बरोबर,’’ काका उत्तरले.
सर्वानी मिळून सौर कुकर तयार केला आणि दहा मिनिटांत पाणी गरम व्हायला लागले. मग काकांनी सौर पेटीचा कुकर कसा बनवतात ते सांगितले. एक पेटी घ्यायची. त्याच्या वरील बाजूस आरसा असा ठेवायचा की सूर्यकिरण त्यावर पडतील. पेटीच्या झाकणाऐवजी
वरील बाजूस काच लावायची, म्हणजे उष्णता आत शोषली जाईल. परंतु काचेमुळे ती
बाहेर जाणार नाही. या पेटीत तांदूळ, डाळ किंवा उसळ ठेवायची. चार मणासांचे अन्न यात शिजू शकते. तसेच रवा, शेंगदाणे, इत्यादी भाजता येतात. पण पोळ्या करता येत नाहीत. गॅसचा किंवा इंधनाचा खर्च वाचतो.
आज काल सोलर पॅनल वापरून दिवसा वीज निर्मिती केली जाते व बॅटरीच्या सहाय्याने रात्री त्याचा उपयोग घरातील दिवे लावण्यासाठी केला जातो. विशेषकरून जिथे वीज पोहोचली
नाही अशा ठिकाणी याचा वापर खूपच उपयोगी होतो. शेवटी काय, साध्या गोष्टी वापरून काकांच्या मदतीने मुलांनी आजीसाठी पाणी गरम करून नड भागवली.
डॉ. मधुसूदन डिंगणकर- mmdin46@rediffmail.com