‘‘आजी, आम्ही काल सईकडे गेलो होतो नं आमच्या नाटकाची प्रॅक्टिस करायला, तेव्हा तिची आई वैतागलेली होती. सारखी रागावत होती. एकदाही तिला हसताना मी पाहिलं नाही. तिला बहुतेक आम्ही गेलेलं आवडत नसावं. आम्ही आता जाणारच नाही तिच्याकडे..’’ रती कुरकुरत होती. lok07विराजने गाल फुगवून लगेच तिला दुजोरा दिला.
‘‘एवढं चिडायचं नाही, सोडून द्यायचं. बरं, पण आज कोणाकडे प्रॅक्टिस करणार आहात?’’ आजीने गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.
‘‘आज आम्ही मुक्ताकडे जाणार आहोत. तिची आई खूप इंटरेस्ट घेते. आमची प्रॅक्टिस बघायला येते. मध्ये मध्ये सूचना करते. सगळ्यांची गोड बोलून चौकशी करते.’’ रती मूडमध्ये आलेली बघून आजीने गोड बोलण्याचा धागा पकडला.
‘‘बघ, पाहिलंस ना, गोड बोलण्याचा परिणाम! गोड बोलणारी माणसं सगळ्यांना आवडतात. गोड न बोलणारी नकोशी वाटतात,’’ – आजी.
‘‘म्हणजे कट्टी करायची ना गं?’’ विराजला नेमकं सांगता येत नव्हतं, पण अर्थ बरोबर कळला होता.
‘‘बरोबर. गोड बोललं नाही की माणसं अशी तुटतात. याउलट गोड बोलणाऱ्यांकडे माणसं आकृष्ट होतात. ताईकडून मेंदी काढून घ्यायची असली की कसा मस्का मारावा लागतो, माहिती आहे ना रती! दमात घेतलंस तर ताई मेंदी काढेल का?’’
‘‘नाही,’’ रतीने वस्तुस्थिती पटकन् मान्य केली.
‘‘दुसऱ्याकडून कोणतंही काम करून घ्यायचं असेल तर आवाजाची पट्टी खालची असायला हवी. आज्ञा करून चालणार नाही. नाहीतर एक घाव, दोन तुकडे होतील. काम तर होणारच नाही, पण आपापसात कटुता, तेढ मात्र निर्माण होईल.’’
‘‘आजी, आमच्या मराठीच्या बाई म्हणतात, ‘शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा.’ म्हणजे काय गं?’’ इतक्या वेळ लोळत असलेल्या वैभवला एकदम मराठीचा तास आठवला.
‘‘तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण किंवा बंदुकीतून सुटलेली गोळी. ती दुखापत करणारच. म्हणून आधी विचार करून बोलायचं. बोलल्यावर विचार करायचा नाही. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावला जाणार नाही ना, याची काळजी घ्यायची. गोड शब्दात सांगितलं की समोरची व्यक्ती रागावलेली असेल तरी तिचा पारा उतरेल. गंमत म्हणजे गोड, मधुर शब्दात कोणतीही गोष्ट सांगितली की ऐकणाराही कान देऊन ऐकतो.’’ इति आजी.
‘‘आणि एखाद्याने करू नये अशी गोष्ट केली असली तर..?’’ खरंच कान देऊन ऐकल्यामुळे वैभवच्या डोक्यातले विचारचक्र धावू लागले.
‘‘कानउघाडणी नक्कीच करायची. वास्तवाची तीव्र जाणीवही करून द्यायची. पण नीट शब्दात, शुगरकोटेड पिलसारखी.’’ वैभवची मान हलली.
‘‘आजी, याचा अर्थ खरं काय ते सांगायलाच हवं. फक्त जरा मृदू शब्दांत. ऐकणाऱ्याला ऐकावंसं वाटेल, पटेल असं सांगायचं, बरोबर ना?’’ रतीनं ‘हम भी कुछ कम नहीं’ या थाटात आपलं म्हणणं मांडलं.
‘‘काहीजण फारच गोड बोलतात. अगदी तोंड फाटेस्तोवर स्तुती करतात. ते लगेच लक्षात येतं. एकदा ‘ते’ आजोबा पहिल्यांदाच आले होते आपल्याकडे, ओळखही नव्हती. तरी केवढं कौतुक करत होते माझं. अशा नाटकी बोलण्याचा मला राग येतो.’’ वैभवला वाटणारा तिटकारा चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होता.
‘‘काही माणसं तोंडावर गोड बोलतात आणि पाठ फिरताच नावे ठेवतात. मालिकांमध्ये बघतो नं अशी माणसं आपण.’’ रतीला टीव्हीवरील मालिका दिसू लागल्या.
‘‘काही तर गोड बोलतील, आपल्याकडे एकदा जेवायला या असं म्हणतील, पण प्रत्यक्षात कधीच बोलावणार नाहीत,’’ वैभवनं पुस्ती जोडली.
‘‘कधी कधी विराजसारखी छोटी मुलं ‘दात घास रे दात घास’ असं एकदा-दोनदा सांगूनही ऐकत नाहीत. अशावेळी ‘विराजच्या मित्राचे दात इतके पांढरेशुभ्र आहेत, मला तो फार आवडतो,’ असं तोंडभरून कौतुक ऐकलं की विराजचे दात पटकन घासून होतात. बरं का रती, हा वैभव लहान होता ना तेव्हा जेवताना पानात कारल्याची, शेपूची भाजी वाढताना मी नेहमी म्हणायचे, ‘आमचा वैभव इतका शहाणा आहे ना, की तो पानात कध्धी काही टाकत नाही. म्हणूनच तो हुशार झालाय.’ वैभव तोंड वाकडं करत पाण्याच्या घोटाबरोबर या भाज्या खाऊन टाकायचा. यात फायदा कोणाला झाला, माझा की वैभवचा, सांग बरं? कडू, आंबट, तुरट सगळे रस पोटात गेले. त्यामुळे त्याची तब्येत चांगली झाली. थोडं गोड बोलण्याचा हा परिणाम. रागावून सांगितलं असतं तर त्यानं ऐकलं नसतं.’’
‘‘हे बरंय हं आजी, रती आणि विराजला हा नियम नाही वाटतं?’’
‘‘अरे वेडय़ा, इंजिन चालू झालं की डबेही आपोआप मागोमाग जातात. बरं ते जाऊ दे. समर्थ रामदास म्हणतात, ‘श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती!’ श्रोत्यांना ते उच्च स्थानावर बसवतात, मान देतात. साहजिकच श्रोत्यांकडून दासबोध वाचला जातो. समर्थाना तेच अभिप्रेत होतं. इतकंच नाही तर माणसं जोडायची असतील तर नेत्यानं काय करावं, तर ‘मुलाच्या चालीने चालावे। मुलाच्या मनोगते बोलावे। जसे जनांस सिकवावे। हळुहळू।’ असा कानमंत्रही समर्थानी दिला आहे.’’
‘‘आजी, आज गोड बोलण्याची आठवण का झाली गं?’’ वैभव व रतीला मोठा प्रश्न पडला. न कळल्यामुळे विराज गोड हसला.
‘‘मकरसंक्रांत १५ जानेवारीला आहे हे विसरलात वाटतं? गोड बोलणं आवश्यक आहे. मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट दरवर्षी रिन्यु करायला नको का?’’
‘‘म्हणजे तिळगुळाचे लाडू आलेच. आता ‘आजी, भरपूर लाडू कर,’ असं नाही म्हणायचं तर ‘आजी, भरपूर लाडू करशील ना!’ असं म्हणायचं.’’ दोघंही एकदम बोलले.
‘‘होऽ तर! त्याबरोबर धम्मक लाडूही देणार आहे. किती हवेत सांगा बघू?’’
सुचित्रा साठे

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”