‘‘आ जी, अगं तू बाहेर चालली होतीस ना, मग परत का आलीस?’’ गॅलरीत पाऊस बघत उभ्या असलेल्या रतीनं हटकलं.
‘‘अगं, कोरडं होतं म्हणून जाणार होते, पण केवढी मोठी सर आली. सगळीकडे चिकचिक झालंय, मला नाही आवडत असं. म्हणून बाहेर जाण्याचा बेत रद्द केला.’’ आजीचं कारण ऐकून रतीनं ‘अशी काय ही?’ अशा अर्थानं मान हलवली.
आजीनं दार उघडलेलंच होतं. शिवाय पावसात भिजलं तर आई ओरडेल या भीतीनं सगळा रतीचा मित्रपरिवार उघडय़ा दारातून आत घुसला.
‘‘मला तर खूप आवडतं बाहेर जाताना पाऊस आला की.’’ यावर्षी आईनं रेनकोटऐवजी छत्री आणल्यामुळे रती खुशीत होती.
‘‘अगं, म्हाताऱ्या माणसांना नाही आवडत; पण तुम्ही सांगा बघू पाऊस का आवडतो ते?’’ आजीनं एक सूत्र पकडलं.
‘‘आमच्या शाळेत तर एवढं पाणी साचतं की त्या पाण्यातून आम्ही धावत जातो. काय मस्त पाणी उडतं दोन्ही बाजूंना.’’ अमितदादानं गॅलरीत प्रात्यक्षिक दाखवलं.
‘‘आजी, आमचा आराध्य आहे ना तो तर पाऊस असो की नसो, बाहेर जायचं म्हटलं की रेनकोट घालून बसतो.’’ गौरांगीनं आपल्या भावाची गंमत सांगितली. आपलं कौतुक ऐकत आराध्यची स्वारी रेनकोट घालून आपल्याच नादात गौरांगीच्या मागे मागे फिरत होती. त्यात ओंकारनं हळूच त्याची टोपी उडवली. मग काय, गुद्दागुद्दीसह डोळ्यांतून पाऊस पडू लागला.
‘‘ए आराध्य, ही बघ गंमत.’’ ओंकार गॅलरीच्या रॉडवरून पडणाऱ्या पागोळ्यांखाली ओंजळ धरत बोलला. ‘‘मी बघ कसं पाणी पितोय.’’ क्षणात दोघांची गट्टी झाली आणि पाणी पिण्याची जुगलबंदी सुरू झाली.
‘‘आजी, पावसाचं पाणी आवडीनं पिताहेत बघ हे चातक पक्षी.’’ अमितदादानं आपल्याला खूप माहिती आहे, अशा थाटात सांगितलं. त्या दोघांना चातक पक्षाशी काही देणं-घेणं नव्हतं. काही एकमेकांच्या गळ्यावरून गुदगुल्या करीत टी-शर्टच्या आत जाणारे आणि काही कोपरापर्यंत धावत जाणारे पाण्याचे ओघळ निरखण्यात ते दंग होते.
‘‘येईल गांडूळ हातात पावसाबरोबर तेव्हा कळेल.’’ गौरांगीनं दोघांचा खेळ थांबविण्याचा उत्तम मार्ग शोधला.
‘‘शीऽऽ काहीतरी काय बोलतेस तू.’’ करीत दोघांनी हात झटकले आणि बाजूला झाले.
‘‘काल बेडूक पाहिला ना आपण, तशा उडय़ा मारा बघू.’’ आजीनं हळूच कामात गुंतवलं. ‘होऽ होऽ’ करीत सगळे छोटे ‘डराव डराव’ करीत उडय़ा मारू लागले.
‘‘आजी, त्यांचं ‘डराव डराव’ ऐकून माझ्या पोटात कावकाव होऊ लागलं आहे. कणसं खावीशी वाटताहेत. कणसंवाला आला तर आपण कणसं घेऊ या का गं? भाजलेल्या कणसांना मीठ-लिंबू लावून काय सुपर्ब लागतं. मला खूप आवडतात. कणसं खाण्यासाठी मी पावसाची वाट बघत असते.’’ रतीचे डोळे कणसाच्या गाडीचा वेध घेत होते.
‘‘कशावर कणसं भाजतात ते तुम्ही पाहिलंय का? गॅस असतो का स्टोव्ह असतो त्याच्या गाडीवर?’’ आजीनं प्रश्नपत्रिका पुढे केली.
‘‘कोळशाची शेगडी असते ना गं, मी कोकणात गेलो होतो तेव्हा कोळसा पाहिला आहे. हात सगळे काळेकुट्ट होतात.’’ अमितनं आठवण नोंदवली.
‘‘आजी, ‘आवडसी तू’ असं मी नेहमी पावसाला म्हणते. कारण आम्हाला खूपदा गरमागरम भजी खायला मिळतात. बाबा सांगतात, मग आईला त्यांचं ऐकावंच लागतं. आमची मात्र मज्जा होते. भजी तळताना छोटय़ा छोटय़ा बुंदीसारखी भजी पडतात ना, आराध्यला ती प्रचंड आवडतात. आई मिरचीचंपण भजं करते.’ भज्यांच्या आठवणीनं गौरांगीचे डोळे चमकले.
‘‘ही कशी खाते सांगू का! मिरची काढून टाकते आणि भज्याचं फक्त सालपट खाते. तरी ‘हाय हाय’ करीत पाणी पीत रहाते,’’ अमितनं गौरांगीला चिडवण्याची संधी सोडली नाही.
‘‘तू तरी खाशील का मिरची?’’ गौरांगीच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
‘‘यंदा पावसाळी सहलीचा बेत आहे की नाही?’’ आजीनं विषय बदलला.
‘‘होऽऽ तर. पाऊस यायच्या आधीपासून कुठं जायचं याचं आई-बाबा प्लॅनिंग करीत असतात. धबधब्याखाली भिजताना जाम मजा येते. आम्ही पाण्यात मांडी घालून बसतो. त्या दिवशी कितीही पाण्यात खेळलं तरी कोऽऽणी रागवत नाही. म्हणून तर मी पावसाला सारखी ‘येऽयेऽ’ म्हणत असते.’’ रती उत्साहानं माहिती पुरविते.
‘‘आजी, एक गंमत सांगू का, पाऊस पडला नं की आई पालेभाज्या आणत नाही. त्यात गांडूळ असेल अशी तिला भीती वाटते. ती कडू कडू मेथी, शेपू आणि मुळा एरवी पाण्याच्या घोटाबरोबर थोडा तरी खावाच लागतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पालेभाज्यांना राम राम.’’ गौरांगीचा आनंद गगनात मावत नव्हता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता.
‘‘आजी, आराध्य, ओंकार बघ ओल्या बोटांनी फरशीवर चित्र काढताहेत. एकीकडे नाकही गळतंय. डाव्या उजव्या हातांनी ते पुसलंही जातंय.’’ रतीनं म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं.
‘‘पावसात भिजल्याचा परिणाम आहे हा.’’ इति आजी.
‘‘सुर्र सुर्र करतो,
मागे जातो, पुढे येतो
मजा कितीतरी थोर,
आराध्य, ओंकार शेंबूड मोठा गोड.’’ अमितने ताल धरला. दोघंही लाजून आजीच्या पदराचा सदुपयोग करण्यासाठी हळूच आजीला चिकटले.
ओंकारचा प्रश्न पुढे आलाच. ‘‘आजी, या ढगात इतकं पाणी कोण भरतं गं? ते खालीच का थांबत नाही? आणि वरून खाली येतं तरी कसं?’’
‘‘ए अमितदादा, आम्हाला खूप होडय़ा करून दे ना, आम्हाला खालच्या साचलेल्या पाण्यात सोडायच्या आहेत.’’ आराध्यनं दादाला पकडलं. इतक्यात ढगांचा गडगडाट झाला आणि प्रश्न विरून गेले. पाठोपाठ वीजही चमकली. आराध्य, ओंकारनं गच्च डोळे बंद करून आजीला मिठी मारली. ‘‘ही म्हातारी गडगडली की मला भीती वाटते. तिला फक्त येताना बरोबर आणू नकोस असं सांग ना पावसाला. तू एकटा आलेलाच मला आवडतोस.’’
‘‘अहा रे भित्रे भागूबाई’’ म्हणत इतरांनी चांगलाच गलका केला.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
Kalyan, Road Works, Waldhuni Flyover, Traffic Jams, Commuters, public,
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण