आजच्या शीर्षकाचं नाव वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडला असणार. मोठी माणसं कदाचित दचकलीही असतील. पण माझ्या वाचक दोस्तांनो, हा प्रश्न मला अनेक छोटे मित्र विचारतात. अगदी नुकताच, एका आठ वर्षांच्या चिमणीने हा प्रश्न विचारला आणि तिला उत्तर देतानाच मी स्वत:देखील विचार करायला लागलो.

‘‘हे बघ काका, आमच्या शाळेत किनई आम्ही नॅशनल प्लेज म्हणतो रोज! शाळा सुरू होताना अ‍ॅन्थम पण म्हणतो. म्हणजे आम्ही देशावर प्रेम करतो किनाई रे?’’ शाळेच्या धकाधकीत आत्ता रुळायला लागलेल्या या छोटय़ा मैत्रिणीला हा प्रश्न का बरं पडावा, असा विचार मी करत होतो तेवढय़ात तीच बोलती झाली, ‘‘परवा त्या न्यूजमधले ते काका होते नं ते सारखं ओरडून ओरडून ‘यू डोण्ट लव्ह युअर नेशन’ असं म्हणत होते.’’ तिच्या धम्माल निरीक्षण शक्तीने मी थक्क होतो तोच तिने बालसुलभ प्रश्न विचारला, ‘‘त्या काकाच्या ऑफिसमध्ये प्लेज आणि अ‍ॅन्थम गात नाहीत का रे?’’ माझ्या मोठय़ा झालेल्या बुद्धीला आणि मनाला तिची देशप्रेमाची सरळ सोपी व्याख्या फारच आवडली. तुमच्या अशा सरळ सोप्या व्याख्यांमध्ये जगाची अस्सल वास्तविकता सामावत नसली तरी माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुमच्या या व्याख्या मला फार मोलाच्या वाटतात. त्यात दांभिकपणा, अहंकार नसतो. फक्त सहजसोपी आणि थेट निरीक्षणं असतात.

आता मला प्रश्न पडला की या चिमुकलीला देशप्रेमाच्या खऱ्याखुऱ्या संकल्पनेची ओळख कशी बरं करून द्यावी? तिला देशाबद्दल, त्यातल्या लोकांबद्दल प्रेम वाटत असतानाच इतरांबद्दल द्वेश आणि आकस वाटता नये हे कसं बरं साधता येईल, या प्रश्नांचा मी क्षणभर विचार करायला लागलो.

मला स्वत:ला बालपणापासूनच देशप्रेम वगैरे गोष्टी, ज्या शाळेमध्ये शिकवल्या जातात, त्या भारीच कृत्रिम वाटतात. प्रतिज्ञा म्हणा म्हणजे देशप्रेम. राष्ट्रगीत म्हणण्यात सहभागी व्हा म्हणजे देशप्रेम. देशाविषयी अभिमान बाळगा म्हणजे देशप्रेम.. या सगळ्यात एक उपचार उरतो फक्त. मला नेहमी प्रश्न पडायचा, की या देशातल्या सगळ्याच व्यक्तींना आपली प्रतिज्ञा पाठ असेल का? आणि ती नसली, तर त्यांनी देशावर प्रेम करू नये का? मी माझ्या छोटय़ा मैत्रिणीसोबतच देशप्रेमाची छाननी करायचं ठरवलं. ‘‘मला सांग, तू तुझ्या आईला आणि बाबाला रोज आय लव्ह यू म्हणतेस का?’’ तिने डोकं हलवूनच नकार सांगितला. ‘‘पण तू शाळेत जाताना बाबाला आणि आईला मिस् करतेस किनई?’’

‘‘खूपच मिस् करते. मी दोन तास शाळेत असते नं!’’ चिमणीने खाऊच्या सुट्टीआधी आणि नंतरच्या दोन भागांचे दोन तास करून प्रश्न सोप्पा करू न टाकला. मग मी तिला एक गुगली टाकली, ‘‘अगं, पण घरी आल्यावर तर तू मला शाळेतल्या तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या गोष्टी सांगतेस. मग घरी आल्यावर त्यांची आठवण येते का तुला?’’ थोडय़ा विचारानंतर तिने होकारार्थी मान हलवली. मग मी तिला हळूच सांगितलं की, जशी तिला शाळेतल्या दोस्तांपेक्षा आई-बाबांची जास्त आठवण येते, त्यांच्याविषयी थोडं वेगळं प्रेम वाटतं, तसंच देशप्रेमाचं असतं. आपण जिथे जन्मतो, वाढतो त्या भूभागाबद्दल, माणसांबद्दल आपल्याला अधिक ओढ वाटते.

तिला हे पटल्यासारखं वाटलं. मग मी पुढे तिला म्हणालो की, ‘‘तू आई-बाबांना प्रेम करतेस म्हणजे काय करतेस?’’ तिने पुन्हा एकदा सहज सोप्पं उत्तर दिलं. ‘‘मी त्यांना किस्सी देते. त्यांचं ऐकते. कधी कधी माझ्या डिशमधला खाऊपण देते.’’ तिच्या आईच्या अलीकडच्याच आजारात आईला रोज औषधांची आठवण करून द्यायची जबाबदारी या चिमणीने आपणहून घेतली होती. त्याची आठवण होऊन मी विचारलं, ‘‘तुझ्या आईला किंवा बाबाला बरं नसलं तर तू त्यांची मदतही करतेस की नाही?’’ थोडं कावरंबावरं होतच तिने होकारार्थी मान हलवली.

मग मी तिला तिच्या आवडीच्या राणाप्रताप मालिकेची आठवण करून दिली. त्यात राणाप्रताप कसा आपल्या आई-बाबांचा मान राखायचा, आपल्या प्रजेची काळजी घ्यायचा आणि प्रसंगी त्यांच्याकरिता कसा लढायलाही तयार व्हायचा, हे सारं सांगितलं. त्यावर तिने उलट प्रश्न केला, ‘‘मग आम्ही शाळेत रोज कुणाबरोबर युद्ध करायचं?’’ तिच्या निरागस प्रश्नाने मला हसू आलं. देशप्रेमाविषयीच्या माझ्याच व्याख्येतली एक भली मोठी चूक मला ध्यानात आली. ‘‘हे बघ चिमणे, देशप्रेमाची सर्वोच्च पराकोटी म्हणजे त्यासाठी लढायला, मरायला तयार होणं हे खरंच, मात्र त्याव्यतिरिक्तही खूप मार्ग आहेत. मला सांग, शाळेत टीचर तुम्हाला छान शिकवतात किनई? त्यांनी खूप मेहनत घेऊन तुम्हाला लेसन शिकवला, धडे दिले तर तुम्ही गुड सिटीझन होणार, बरोबर? मग या छान टीचर देखील देशप्रेमी झाल्या किनई?’’ ती थोडी बुचकळ्यात पडली. प्रतिज्ञा नाही, राष्ट्रगीत नाही, झालंच तर युद्धंही नाही तर देशप्रेम कसं, हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपल्या कवितांमधून देशप्रेम जागवणारे वसंत बापटांसारखे कवी, संशोधनातून देशसेवा करणारे राष्ट्रपती कलामांसारखे वैज्ञानिक, पाणी चळवळीद्वारे देशातल्या साधनसंपत्तीच्या रक्षणार्थ झटणारे राजेंद्र सिंहांसारखे सामाजिक कार्यकर्ते, नव्या विचारांची रुजवात करणारे नाटककार, चित्रपट निर्माते, समाजसेवक, राजकारणी अशी एक ना अनेक देशप्रेमी व्यक्तींची उदाहरणं मी दिली. माझ्या घरून जाताना मी तिला माझ्या संग्रहातलं एक गोष्टींचं पुस्तक तिला दिलं- बलिदानाच्या कथा. पृथ्वीराज चव्हाण, राणी लक्ष्मीबाई आणि महाराणाप्रताप यांच्या गोष्टी जशा या पुस्तकात आहेत, तशाच अजीमुल्ला खॉं यांच्यासारख्या मुत्सदेगिरी करून देशाला स्वातंत्र्य मिळवू पाहणाऱ्यांच्या गोष्टी देखील आहेत. कानपूरच्या नर्तकी आणि १८५७च्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांकडून माहिती काढून घेण्याकरिता स्वत:च्या प्राणांची बाजी लावणाऱ्या अजीजन बाईंची गोष्ट देखील आहे. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाची गोष्ट जशी आहे तशीच सहोदराबाईंसारख्या सामान्य, फार परिचित नसलेल्या सत्याग्रहीची गोष्टही आहे. शिक्षणाचा ध्यास घेऊन सहोदराबाईंनी स्वत:ला शिक्षित केलंच मात्र, प्रदेश कमिटय़ा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून जात त्यांनी समाजसुधारणेचं कामही केलं आणि सत्याग्रही म्हणून स्वतंत्र भारताला एक करण्याकरिता, गोवामुक्ती संग्रामातही त्या प्राणांची बाजी लावून लढल्या.

विविध प्रकारे सर्वोच्च बलिदान देत, आपापल्या परीने देशसेवेचं व्रत घेतलेल्या आणि त्याकरिता आयुष्य वेचलेल्या महानायक आणि महानायिकांच्या या गोष्टी वाचून छोटय़ा चिमणीला खपूच स्फूर्ती आली होती. त्याच धडाक्यात तिने ठरवून टाकलं की ती अभ्यास करून खूप मोठ्ठी होणार आणि कण्ट्रीसाठी काहीतरी खूप गुड करणार. या संकल्पाची सुरुवात म्हणून ही चिमणी सध्या सोसायटीतल्या तिच्याच वयाच्या चिमुरडय़ांसोबत खेळायच्या भागात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची रोज सायंकाळी वेचणी करते आणि तो आवारातल्या कचराकुंडीत टाकते. या चिमुरडय़ांना पाहून थोडी मोठी मुलंही त्यांना सामील झाली आहेत.

खूप वर्षांपूर्वी, आई-बाबांच्या मांडीवर बसून, त्यांच्या मदतीने अक्षर अक्षर लावत वाचलेल्या या गोष्टीच्या पुस्तकाने अजून एका छोटय़ा मेंदूमध्ये देशप्रेमाबद्दल खराखुरा आणि निष्पक्ष विचार करण्याचं बीज रुजवलं आहे. पहिलं फळ तरी सुपीक आलं आहे..

हे पुस्तक कुणासाठी? देशप्रेमाबद्दल विचार करणाऱ्या पालक आणि त्यांच्या गोष्टीवेल्हाळ छोटय़ांकरिता.

पुस्तक : बलिदानाच्या कथा

लेखक : अक्षयकुमार जैन

अनुवाद  : वंदना विटणकर

प्रकाशक : प्रकाशन विभाग, माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार

श्रीपाद –  ideas@ascharya.co.in