‘गॅलरीतून पाऊस बघताना किती छान वाटतंय ना आजी!’ – रती.
‘हो ना, आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. किती वाट पाहायला लागली पावसाची. बरं झालं आता आलाय तो. सगळे प्रश्न सुटतील आता.’
सुट्टीचा दिवस आणि पावसाची संततधार- त्यामुळे रतीचं सगळं मित्रमंडळ घरीच जमलं होतं.
‘कुठला प्रश्न आजी?’ वेदांतच्या चेहऱ्यावर प्रश्न उभा राहिला.
‘अरे, पाण्याचा प्रश्न. टाकीतलं पाणी संपेल म्हणून आई लवकर अंघोळ कर म्हणत तुझ्या मागे लागायची. कंटाळा यायचा. कधीतरी खरंच पाणी संपायचं. मग काय आधी पोटोबा, मग अंघोळ. कधीतरी तर बुट्टीच. हो ना!’
‘किती पाणी लागतं नाही आपल्याला! प्यायला, स्वयंपाक करायला, अंघोळीला, कपडे धुवायला, बागेतल्या झाडांना घालायला, पशू- पक्षी-प्राण्यांना, शेतकऱ्यांना शेतीसाठी..’ अथर्वने बरोबर विषयाला हात घातला.
‘आईला पाणीपुरी करायलाही पाणी लागतं.’ वेदांतला काल खाल्लेली पाणीपुरी आठवत होती. सगळ्यांचेच चेहरे कल्पनेने खुलले. वेदांतने तर पाणीपुरी खाल्ल्याची नक्कल करत गाल फुगवले.
‘आणखीन केव्हा आणि कुठे पाण्याची आठवण येते सांगा बघू?’ आजीने तिच्यातलं ‘पाणी’ दाखवत सगळ्यांना विचारात ढकललं.
‘आजी, देवाला नैवेद्य दाखवताना आणि जेवण्यापूर्वी ताटाचा नैवेद्य दाखवताना पाणी लागतं.’ अथर्वने हळूच सांगितलं.
‘आमचे आजोबा पूजा आणि संध्या करतात ना, त्यावेळी अशी हातांची वाटी करतात आणि पाणी पितात. काय म्हणतात गं आजी त्याला?’ इतका वेळ शांत बसलेल्या विराजने प्रात्यक्षिक दाखवलं.
‘आचमन म्हणतात त्याला. आणि नैवेद्य दाखवताना पाण्याचे चौकोनी मंडल करतात आधी.’ अभ्यास करत असलेल्या वैभवदादाने माहिती पुरवली.
‘शंकराच्या देवळात पिंडीवर पाण्याचा अभिषेक करतात ना गं! आणि गौरी-गणपती आणताना दारात पायावर पाणी, दूध घालतेस ना तू.’ रतीला आठवलं.
‘पाण्यापासून वीजनिर्मिती होते ना!’ आपल्याला बरोबर लक्षात आलं याचा आनंद अथर्वच्या चेहऱ्यावर झळकला.
‘माझा छोटा भाऊ आहे ना, त्याला सारखी उचकी लागते किंवा ठसका लागतो, तेव्हा मी पटकन् पाणी देतो.’ विराज दादाच्या भूमिकेतून बोलला.
‘गणपतीत आमच्या शेजारची रोहिणीकाकू आहे ना, ती पाण्यावर कोळशाची पूड घालून त्यावर गुलाबपाकळ्यांची मस्त रांगोळी काढते.’ रतीला एकदम आठवले.
‘आमच्याकडे मोराच्या आकाराची गुलाबदाणी आहे. गणपतीला त्यात गुलाबपाणी घालून आम्ही ते सगळ्यांच्या अंगावर उडवतो.’ इतका वेळ विचारात गढलेल्या गौरांगीने सहभाग नोंदवला.
‘बालभवनची वेळ झाली तरी वेदांत झोपेतून उठला नाही तर मी पटकन् त्याच्या तोंडावर पाणी शिंपडतो.’ अथर्वने तक्रारीचा सूर लावला तरी वेदांत जराही रागावला नाही.
‘आणि सगळ्यांच्या डोळ्यांतून कधी ना कधी पाणी येतं की नाही?’ असं आजीने विचारताच सगळ्यांनी जोरात होकार भरला.
‘कांदा चिरताना तर डोळ्यांतून किती पाणी येतं ना गं गौरांगी!’ रती अनुभवाचे बोल बोलली.
‘आमच्या अनिताबाई दिवसभर लोकांची धुणीभांडी करतात. तो निढळाचा घाम म्हणजे कष्टाचं पाणीच नाही का?’ वैभवदादाला अधूनमधून डोकवावंसं वाटत होतं.
‘आणि अळवावरच्या पाण्याची गंमत! ते तर पानाला चिकटतच नाही. पाण्याचे छोटे छोटे पारदर्शक चेंडू सुळकन् घसरून जात असतात.’
‘स्वाती नक्षत्रावर पावसाचं पाणी शिंपल्यात पडलं तर मोती होतो असं कुठंतरी वाचलं होतं. आणि तू भाकरी करत असताना मी लुडबूड करायला लागले की तू मला भाकरीवर पाणी फिरवायला सांगतेस. मग माझं ‘हाय-हुई’ चालू होतं. आधी हाताला चटके, मग मिळते भाकर- हे अगदी पटतं हं.’ रती आनंदून बोलली.
‘या पाण्याची एक गंमत आहे. सर्वसाधारणपणे तापमान कमी करत गेलं की आकारमान कमी होतं. पण पाण्याच्या बाबतीत तापमान चार अंश सेल्सियसच्या खाली गेलं की त्याच्या आकारमानात वाढ होते आणि बर्फाच्या रूपात ते पाण्यावर तरंगतं. साहजिकच पाण्याखालचे जलचर सुरक्षित राहतात. आहे की नाही निसर्गाची अद्भुत सुरक्षा यंत्रणा!’ आजीने मुलांना महत्त्वाची गोष्ट सांगितली.
‘आजी आमची सहल वज्रेश्वरी, गणेशपुरीला गेली होती. तेव्हा तिथे गरम पाण्याची कुंडे पाहिली. आमच्या बाईंनी चमचाभर तांदळाची रुमालात पुरचुंडी बांधून त्या गरम पाण्यात सोडली होती. आम्ही लगेच निघालो म्हणून, नाहीतर खरंच भात झालेला पाहिला असता.’ रतीला किती वर्णन करू असं झालं.
‘खाऱ्या समुद्रामुळे पाऊस पडून आपल्याला गोड पाणी मिळतं. ते नद्यांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणून या नद्यांना आपण पूजनीय मानतो. दरवर्षी गंगादशहराच्या निमित्ताने गंगेची स्तुती करतो. नर्मदा परिक्रमा केली जाते. अंघोळ करताना ‘गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी जलेस्मिन् संनिद्यं करू’ असं सप्तसिंधूचे स्मरण करतो. चंद्रावरही पाणी सापडल्याचे पुरावे मिळाले आहेत ना! या पाण्याला रंग, रूप, आकार नाही. आपलं सगळं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून पाणी फुकट घालवायचं नाही.’ आजीने संवादाचं मुख्य सूत्र सांगितलं.
‘भांडंभर पाणी घ्यायचं आणि एक घोट पिऊन उरलेलं फेकून द्यायचं- असं कधीही करायचं नाही. बरोबर ना आजी?’ अथर्वने गुरूची विद्या गुरूला ऐकवली.
‘आता पाणीकपात रद्द झाली की मी रोज शॉवरखाली मस्त अंघोळ करणार.’ विराजने जाहीर केलं.
‘शॉवरमुळे पाणी खूप फुकट जातं. पुढच्या वर्षीपर्यंत पुरायला हवं ना! त्यापेक्षा असं करावं- देवाने आकाशातून ‘महाशॉवर’ सोडलाय. जा- त्याच्याखाली पाच मिनिटे मनसोक्त भिजून या. पण फक्त पाचच मिनिटं हं!’
आजीनेच परवानगी दिल्यामुळे सगळे सैराट धावले.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
Gold Silver Price
Gold-Silver Price on 28 February 2024: सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही, पाहा काय आहे १० ग्रॅम सोन्याचा भाव