दरवर्षी रमण सुट्टीत कोकणात जायचा. पण यंदा उलटा बेत झाला होता. भरपूर आंब्याच्या पेटय़ा घेऊन आजोबाच पुण्याला येणार असं ठरलं. कारण रमणच्या घरीच त्यांच्या बंगल्यावर आजोबांची तुला करायची ठरली होती. आजोबांना दोन मुलगे- रमणचे बाबा म्हणजे उमेशकाका आणि दिपूचे आणि रसिकाचे वडील प्रकाशकाका. त्याशिवाय आजोबांच्या दोन मुली- निर्मलाआत्या आणि प्रमिलाआत्या. त्या पुण्यातच राहत होत्या. आजोबांचे एक भाऊ मुंबईहून येणार होते. खूपच मज्जा येणार होती. मोठं कुटुंब आणि सर्वाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. रमणची सर्व भावंडं मिळून १६ मुले होती. या कार्यक्रमानिमित्त सर्व जण येणार म्हणून रमण अगदी खुशीत होता.
आजोबाना ८० वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांचे सहस्रचंद्रदर्शन आणि तुला करायचे ठरले होते. नात्यातील माणसे तर येणार होतीच, पण त्याबरोबर आजोबांचे काही शाळेतील मित्रही येणार होते. त्यामुळे आजोबाही खूश होते. आंब्यांचीच तुला करायची असे मोठय़ा मंडळींच्या मनात होते. पण साऱ्या छोटय़ांनी हा बेत हाणून पाडला. ‘‘म्हणजे हे बरे! आजोबांनीच आंबे आणले आणि त्याच आंब्यांनी तुला करायची! आजोबा आंब्यासारखे गोड नाहीत. ते आम्हाला शिस्त लावतात. किती कडक वागतात. शिक्षासुद्धा करतात. आपण आजोबांची नारळांनी तुला करू.’’ राधिका सहजच म्हणाली. पण सर्व मुलांनी तिचीच री ओढली- ‘‘हो हो नारळांनीच करायची.’’
रमण म्हणाला, ‘‘राधिकाताई म्हणते तेच बरोबर. तसेच आहेच आजोबा. वरून कडक आतून गोड.’’
शेवटी प्रकाशकाका म्हणाले, ‘‘मंजूर. ठराव सर्वानुमते पास. पण समारंभाला अजून आठ दिवस आहेत म्हणून आपण सारे कुटुंबीय जमलोय. आता तुम्ही मुले पळा बाहेर खेळायला.’’
दहा-बारा मुलांचा चमू खिदळत बाहेर पसार झाला आणि मग मोठय़ा सर्व माणसांनी समारंभाची आखणी केली.
सोहळ्याचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी आजोबांचे तीन शाळा मित्र आले होते. हरिआजोबा, नारायणआजोबा आणि रघुनाथआजेबा. घरात १०० माणसे जमली होती. जेवायला आमरसपुरीचा मुख्य बेत असला तरी पंचपक्वान्ने होती. मोदक, बेसनलाडू, करंजी आणि आजोबांची आवडती पुरणपोळी.
धार्मिक विधी फारसे नव्हते. पण आजोबांच्या गावातील, पुण्यातील मित्रांनी वेदामधील सुंदर प्रार्थना म्हटल्या.
सकाळी ११ वाजता तुलेला सुरुवात झाली. मोठा तराजू फुलांनी सजवला होता. आजोबांना पाटावर बसवले. ८० दिव्यांनी त्याना ओवाळले. उमेशकाका आणि दिपूकाकांनी आजोबांच्या गळ्यात हार घातला आणि हात धरून तराजूच्या एका पारडय़ात बसवले आणि एकेक नारळ दुसऱ्या पारडय़ात ठेवला. प्रत्येकाने एकेक नारळ ठेवीत गेल्यावर काटा ८० किलोवर आल्यावर रमण पुढे आला, ‘‘सहा फूट उंची, उत्तम आरोग्य, सतेज कांती आणि हसतमुख चेहरा.’’ ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूच ओघळले. असे भाग्य फार क्वचित लाभते. शेवटी निर्मलाआत्या म्हणाली, ‘‘उमेशदादा, तू आणि प्रकाशने छान केलं सारं. आजकाल पार्टी होते. सोहळा नाही. आम्हाला खूप आनंद झालाय.’’
आजोबांचे वजन ८५ किलो आहे हे रमणला माहीत होते. मुलांनी तयार केलेल्या बॉक्सने तुला पूर्ण झाली. साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. आजोबा खाली उतरले. रमणने त्यांना हात दिला. आजोबांच्या तीन मित्रांना आजोबांच्या शेजारी परत पाटावर बसवले आणि आजोबांच्या मुली-सुनांनी औक्षण केले. उमेशकाका, प्रकाशकाका यांनी तीनही मित्रांना शाल-श्रीफळ दिले आणि मग जेवणाच्या पंक्ती बसल्या.
सर्वाची जेवणं झाली. रमण आणि बालचमू सारखा आजोबांभोवती घुटमळत होता. शेवटी आजोबा म्हणाले, ‘‘रमण आणि सारी मुले, या पाहू इकडे. आणा तुमची भेट. पाहू या काय आणलयं तरी!’’
राधिकेने चटकन कात्री आजोबांच्या हातात ठेवली. आजोबांनी भेटवस्तू उघडली आणि ते थक्क झाले. छोटी छोटी बालसाहित्याची सुंदर पुस्तके होती.
‘‘अरे, आता आजोबा काय ही पुस्तके वाचणार का?’’ प्रमिलाआत्या म्हणाली. त्यावर राधिकाने उत्तर दिले, ‘‘तसं नाही आत्या. आजोबांच्या नावाने आम्ही कॉलनी आणि परिसरातील मुलांसाठी ग्रंथालय सुरू करत आहोत.’’
‘‘अरे पण गं्रथालय करणार कुठे?’’
त्याची सोय झाली बाबा. आपल्या शेजारी रहिमतकाका आहेत ना, त्यांच्या गॅरेजमध्ये आहे जागा. सामानापुढे पडदा लावून आम्ही पुस्तकाच्या पेटय़ा ठेवणार. आमच्या खाऊच्या पैशातून हे ग्रंथालय सुरू करीत आहोत. वर्गणी फक्त सहा महिने एक पुस्तक वर्गणीदाराने द्यायचे.’’ आजोबा खूश झाले. साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.आजोबांनी मुलांना विचारले, ‘‘तुमच्या या ग्रंथालयाचे नाव काय?’’
‘विश्वनाथ ग्रंथालय,’ रमणने सांगितले.
राधिका म्हणाली, ‘‘आजोबा सायंकाळी आमच्या ग्रंथालयाचे तुमच्या हस्ते उद्घाटन आहे. आम्ही जय्यत तयारी केली आहे.’
सायंकाळी साऱ्यांचा चहा झाल्यावर सारी मुले रहिमतचाचांच्या बंगल्यावर गेली. रहिमतचाचांनी गॅरेज उघडून खुच्र्या लावून ठेवल्या होत्या. मुलांनी फुलांची सजावट केली होतीच. मुलांनी आजोबांच्या हातात दोरी दिली. आजोबांनी दोरी ओढली. ‘विश्वनाथ ग्रंथालय’ नाव पाहून आजोबांचे मन भरून आले. आजोबांच्या मित्रांनी मुलांचे अभिनंदन केले. आणि पुस्तके आणायला छोटी देणगीही दिली. सर्वाना पेढे वाटले, असा झाला आजोबांचा तुला-समारंभ!