रात्रीची कामे उरकून आईने झोपायला जाण्याआधी मिहीरच्या रूममध्ये डोकावून बघितलं. टेबल लॅम्प चालू होता. मिहीर टेबलावरच डोकं टेकून गाढ झोपी गेला होता. मिहीरला नीट बेडवर झोपायला सांगायला म्हणून आई हळूच रूममध्ये शिरली. पाहते तर मिहीर कुठल्यातरी पुस्तकावर डोकं ठेवून झोपला होता. आईने त्याच्या डोक्याखालून अलगद ते पुस्तक काढलं. ती मिहीरची डायरी होती. वाचावी की नाही या संभ्रमात असतानाच मिहीरचे बाबाही तिथे आले.
‘‘काय गं? कसला विचार करते आहेस?’’ मिहीर जागा होऊ नये म्हणून बाबांनी कुजबुजत विचारलं.
‘‘मिहीरची डायरी.’’ आई डायरी दाखवत हळूच म्हणाली.
‘‘हो! त्याच्या आजोबांनी शिकवलं होतं नं त्याला गेल्या वर्षीपासून डायरी लिहायला.’’
‘‘या वर्षीचं पहिलं पान लिहिलंय.. १ जानेवारीचं.’’
‘‘पण हा रडत होता की काय?’’
‘‘का हो? असं का वाटतंय तुम्हाला?’’
‘‘अगं पहा नं! दोन-तीन ठिकाणी पाण्याचे थेंब पडल्यासारखं दिसतंय. पण अक्षर पुसलं गेलं नाहीए.’’
‘‘हो! खरंच की. वाचून पाहुया का त्याने डायरीमध्ये काय लिहिलंय ते?’’ आईने असं म्हटल्यावर बाबाही विचारात पडले.
‘‘गेले काही दिवस तो जरा उदास-उदास दिसतोय म्हणून म्हणते. काही डायरीत लिहिलं असेल तर समजेल तरी आपल्याला. हल्ली तो फारसा बोलतही नाही आपल्याशी. योगायोगाने हे पान उघडं राहिलंय, तेवढंच वाचू.’’ आईने वाचण्याचा आग्रह धरला.
‘‘ठीक आहे. वाचूया.’’ आई आणि बाबा दोघे मिहीरच्या बेडवर बसले. मिहीरने चक्क आई-बाबांना पत्र लिहिलं होतं. आई हळू आवाजात वाचू लागली

प्रिय आई-बाबा,
डायरी लिहायला सुरुवात करून आज मला बरोब्बर एक र्वष झालं. मागच्या वर्षी धरलेला रोज डायरी लिहिण्याचा संकल्प मी पूर्ण केला, आजोबांनी सांगितलेला.. या नव्या वर्षांतही मी तो सुरू ठेवणार आहे. माझी ही नवी डायरी खूप मस्त आहे. प्रत्येक दिवसाला दोन-दोन पानं दिली आहेत. रोजचं मनातलं साठलेलं हवं तितकं लिहा. भरपूर लिहा..
डायरी लिहायला लागल्यापासून मला खूपच हलकं-हलकं आणि मोकळं वाटतंय. आजोबा म्हणायचे, ‘डायरी म्हणजे माणसाच्या मनाचं प्रतिबिंब असतं. मनातले कुठलेही विचार- जे आपण कित्येकदा कुणाला सांगू शकत नाही, ते आपण डायरीमध्ये सहज लिहून काढू शकतो.’ गेल्या वर्षीपासून मला खऱ्या अर्थाने डायरीच्या रूपात एक बेस्ट फ्रेंड मिळाली आहे. ती फक्त माझं ‘ऐकते’. मला काही सांगायला जात नाही की भांडण करत नाही. असंही कुणीतरी हवंच नं? नाहीतरी सगळे सारखे मला सांगतच असतात, उपदेश करत असतात- ‘मिहीर तू असं कर, मिहीर तू तसं करू नकोस.’ मात्र मला काय हवंय हे कुणीच ऐकून घेत नाही. खूप राग येतो याचा कधी कधी.
आजोबांनी मला गेल्या वर्षी आपल्या सोसायटीबाहेरच्या स्टेशनरीच्या दुकानदाराकडून डायरी गिफ्ट आणून दिली होती. म्हणून या वर्षी आजोबा नसले तरी मी माझ्या पिगीबँकमधल्या पैशातून ती डायरी आणायला गेलो. तिथे तर आजोबांची आठवण म्हणून त्या दुकानदाराने मला ती फ्री देऊन टाकली. आपले आजोबा आपल्याला अचानक सोडून गेल्यावर मी खूप घाबरलो होतो. कारण तू आणि बाबा ऑफिसात असता. तेव्हा मला दिवसभर आजोबांचीच तर सोबत असायची! मी त्यांना दिवसभरात घडलेल्या सगळ्या लहानसहान गोष्टी सांगायचो. ते देवाघरी गेल्यानंतर मी अगदी एकटा पडलो होतो. पण त्यांची ही डायरी लिहिण्याची कल्पना आता माझी साथ देते. शाळेत किंवा घरी घडलेली छोटय़ातली छोटी गोष्ट मी या डायरीत लिहून ठेवतो.
बाबा, मला तो दुकानदार विचारत होता, की मी डायरी लिहितो म्हणजे मी मोठेपणी लेखक होणार का म्हणून. मी एकदम विचारातच पडलो. हो! कारण आत्तापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सी.ए. किंवा इंजिनीअर होणार एवढंच मला माहीत होतं. मी लेखकही होऊ शकतो? आई, तुला माहिती आहे, मी लहान-लहान कविता करतो. पण तुम्हाला सांगायची माझी कधी हिंमतच नाही झाली. आई-बाबा असं का झालं? मी तुमच्याशी मोकळेपणाने का नाही बोलू शकत?
बाबा, तुम्ही सी.ए. आहात. तुमची खूप मोठी फर्म आहे. आई, तू कम्प्युटर इंजिनीअर आहेस. तुझ्या ऑफिसात तू खूप मोठ्ठय़ा पोस्टवर आहेस. त्यामुळे तुम्ही सारखे माझ्याकडून वर्गात, क्लासमध्ये पहिलं येण्याची अपेक्षा ठेवता. मी आता सातवीत आहे. तुम्ही हे आधीच ठरवून टाकलंय, की मला या वर्षीचीही स्कॉलरशिप मिळायलाच हवी, चौथीची मिळाली होती म्हणून. त्यासाठी मी स्विमिंगचा क्लास, रोजच्या अभ्यासाच्या टय़ुशन्स करून आता गेले वर्षभर स्कॉलरशिपचे क्लासही करतोय. खूप दमतो मी या सगळ्याने. मला खरं तर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसायचंच नव्हतं. पण मी हे उघडपणे नाही सांगू शकलो तुम्हाला. मला हे सगळं एका वेळेस करणं खूप जड जातंय.
समजतंय, की मला अभ्यास करायला हवा आणि मी तो स्वत:हून करतोदेखील. पण अशा अवास्तव अपेक्षा ठेवल्या की त्यातला आनंदच मुळी निघून जातो. या वर्षीच्या टर्मिनल परीक्षेत मी दुसरा आलो. साहील पहिला आला. आई, तू मला किती रागावलीस, आठवतंय? अगं, पण साहीलसुद्धा चांगला अभ्यास करू शकतो ना? दर वेळेस माझाच पहिला नंबर कसा गं येईल? तोही कधीतरी पहिला येऊ शकतो! हे माझ्यासारख्या सातवीतल्या मुलाला कळतं, पण तुम्हा इतक्या मोठय़ा माणसांना ते का समजत नाही? आणि मला सांग, तू किंवा बाबा प्रत्येक परीक्षेत पहिले आला होतात का तुमच्या लहानपणी? मग ही अवास्तव अपेक्षा माझ्याकडूनच का?
आई-बाबा, अहो, मीच काय पण ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हीही तुमच्या लहानपणी ऐकली असेलच ना? मग आपल्या कुवतीप्रमाणे एखादा फुल स्पीडमध्ये गेला काय किंवा सावकाश गेला काय, योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचलो की झालं ना? स्पर्धा असावी हो, पण आता त्याचं ओझं वाटू लागलंय.
शाळेत मराठीच्या क्लासमध्ये एकदा बाईंनी पाडगावकरांची ‘‘चिऊताई दार उघड’’ ही सुंदर कविता ऐकवली होती आणि त्याचा अर्थ समजावला होता. मला ती इतकी आवडली की मी क्लास संपल्यावर बाईंना भेटून लगेच ती उतरवूनपण घेतली आणि तोंडपाठ केली. त्यातल्या काही ओळी मनाला इतक्या लागल्या. ऐका तुम्हीही :
मोर धुंद नाचतो म्हणून, आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून, आपण का खिन्न व्हायचं?
तुलना करीत बसायचं नसतं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं!
आई-बाबा, माझंही वेगळेपण आहे हो! ते शोधायला मला मदत करा.
आई, तू मला हट्टाने गेल्या वर्षीपासून स्विमिंगच्या क्लासला घातलंस. कारण त्यामुळे फिटनेस वाढतो, बुद्धी तल्लख होते. पण मला मुळीच आवडत नाही स्विमिंग. या वर्षीच्या अ‍ॅन्युअल स्पोर्ट्स डेला मला एकही बक्षीस मिळालं नाही तर तू नाराज झालीस. पण मला नाही झेपत रनिंग रेस वगैरे. स्विमिंग, स्पोर्ट्स ठीक आहे, पण खरं सांगू? मला गेल्या दोन वर्षांपासून तबला शिकायचाय. पण तुला संगीत शिकणं पटत नाही. अभ्यासाचा वेळ वाया जातो, म्हणून तू मला तबला शिकू दिला नाहीस. गांधर्व विद्यालय आपल्या घराच्या कित्ती जवळ आहे! पण इतक्यांदा विनवण्या करूनसुद्धा तू मला तिथे कध्धी तबला शिकायला जाऊ दिलं नाहीस.
आजोबा नेहमी म्हणायचे की, तुमची खरंच इच्छा असेल, तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली असेल आणि सचोटीने मेहनत करायची तयारी असेल तर ती कधीही शिकायला सुरू करू शकता. मला खरंच या वर्षीपासून तबला शिकायचाय. पण माझी ही इच्छा या डायरीतल्या पानावरच राहणार आहे हे मला माहीत आहे. पण इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड..
मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करायचा नेहमीच प्रयत्न करीन.
तुमचा, मिहीर.

हे पत्र वाचून आई-बाबा सुन्न होऊन एकमेकांकडे बघू लागले. त्यांनी एकाच वेळेस टेबलावर झोपलेल्या मिहीरकडे पाहिलं. आईच्या डोळ्यांतून तर टचकन पाणीच वाहू लागलं.
‘‘आपण आपल्या इच्छा-आकांक्षा मिहीरवर लादू लागलो होतो का हो? इतके दिवस तो आपल्या अपेक्षा पूर्ण करायचा आटोकाट प्रयत्न करतोय, पण त्याच्या मनाचा, त्याच्या इच्छांचा आपण कधीच विचार केला नाही.’’ आई कापऱ्या आवाजात म्हणाली.
‘‘आपणही या रॅट-रेसचे गुलाम झालोय. आणि त्यामुळे आपल्याही कित्येक आवडीच्या गोष्टी करायच्या राहूनच गेल्या, नाही?’’ बाबा हताशपणे म्हणाले.
‘‘बरं झालं या डायरीमुळे आपले डोळे उघडले,’’ आई मिहीरच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत म्हणाली.
‘‘बऱ्याचदा मुलंही मोठी शिकवण देऊन जातात आई-वडिलांना.’’ बाबा हलकं हसत म्हणाले. टेबलावर झोपलेल्या मिहीरला झोपेतच चालवत बाबांनी बेडवर व्यवस्थित झोपवलं. त्याला पांघरूण घालून त्याच्या कपाळाचा हलका पापा घेतला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर बाबांनी मिहीरला जवळ बोलावून त्याच्या हातात एक एन्व्हलप दिलं. मिहीरने ते जरा घाबरतच उघडलं. पण त्याचा चेहरा लगेच खुलला. कारण तबला शिकण्याकरिता बाबांनी गांधर्व विद्यालयाचा फॉर्म आणला होता.
‘‘मिहीर, यात कसलीच अपेक्षा नाही. फक्त तुझ्या आनंदाकरिता तू आता तबला शिकायचा आहेस.’’ बाबा डोळे मिचकवत म्हणाले.
‘‘हो! आणि तुझ्या कविताही आम्हाला वाचून दाखवायच्या.’’ आई-बाबांना चहा देत म्हणाली. मिहीरने चमकून आई आणि बाबांकडे पाहिलं.
‘‘बाबा, आई, तुम्ही माझी डायरी वाचलीत?’’ मिहीर जरा दुखावल्यासारखा म्हणाला.
‘‘हो! आणि पत्रही. पण फक्त तेवढंच. आम्हाला माहिती आहे की कुणाचीही डायरी अशी वाचू नये. पण आमचं बाळ का उदास आहे त्याचं कारण या डायरीमुळे, तुझ्या पत्रामुळे आमच्या लक्षात आलं. सॉरी बेटा. असं पुन्हा कधीच होणार नाही.’’ आई मिहीरचा गालगुच्चा घेत म्हणाली.
‘‘आई, मीपण अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही.’’
‘‘अरे, ते आम्हाला पक्कं माहीत आहे बेटा. यू आर अ व्हेरी गुड बॉय.’’ बाबांनी मिहीरची पाठ थोपटली. बऱ्याच दिवसांनी मिहीर मनमोकळा हसला. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. आईनेही त्याला जवळ घेतलं. तो त्याच्या रूममध्ये त्याच्या कवितांची वही आणायला उडय़ा मारत गेला. इतक्या दिवसांनी मिहीरचा खुललेला चेहरा पाहून आई-बाबांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकलं.
n mokashiprachi@gmail.com