चिंटूच्या आजीच्या मनात बऱ्याच दिवसांपासून सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घ्यायचा मानस होता, तो अखेर पूर्ण झाला. गडावरून यायला तशी रात्र झाली होती. चिंटू व मिनीला आपले आजी-आजोबा दमलेले दिसले. चिंटूच्या आईच्याही हे लक्षात आल्यावर ती म्हणाली, ‘‘मिने, हे कोमट तेल घे अन् तू आणि दादा मिळून आजी-आजोबांच्या पायाला तेल लावून जरा त्यांचे पाय चेपून द्या.’’
आईच्या या आज्ञेचे पालन करत दोघांनीही आजी- आजोबांच्या पायाला तेल लावलं. आई-आजोबा इतके दमले होते की, त्यांना लगेचच झोप लागली. आणि मिनी व चिंटूही त्यांचे पाय चेपता चेपता तिथेच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या चिंटू म्हणाला, ‘‘मिनुडे, मला किनई एक स्वप्न पडले.’’
‘‘मला पण!’’ मिनीही चटदिशी म्हणाली.
‘‘सांग तुला कुठले स्वप्न पडले!’’
मिनी आपले स्वप्न सांगू लागली. ‘‘मी आजीचे पाय चेपून देत होते. तेवढय़ात ‘‘आई..आई..गं, बरं वाटतंय गं सोनुले.. थकले पाय आता,’’ असे म्हणत आजी झोपूनही गेली. आणि मीही आजीच्या पायाशीच झोपून गेले. तेवढय़ात आजीचे पाय माझ्याशी बोलू लागले. ‘‘अगं, मिने, आम्ही लहानपणी दोरीवरच्या उडय़ा, लांब उडय़ा व पळण्याच्या शर्यतीत खूप बक्षिसे मिळवली होती. अंगणामध्ये पाय दुखेपर्यंत दगड का माती, अप्पा- रघी, राऊंड-ए-रन, खांब- खांब खांबोळी, ठिकरी.. असे खेळ खेळायचो. मग शुभंकरोती, परवचा म्हणून झाले की मग तुमचे पणजोबा गोष्ट सांगत. मग गाढ झोपी जात असू. नाही तर तुम्ही, सारखे टी.व्ही.च्या पुढे बसून असता. पायांची कधी मांडी- नाही तर पाय ताणून वेडेवाकडे बसता. त्या वेळी आम्हाला खेळायला मस्त अंगण होतं. तुमच्या आजीचं लग्न झाल्यावर ती सासरी आली. मग काय आमचं आपलं तुरुतुरु चालणं, पळणं सुरू व्हायचे. म्हणजे अंगण शेणानं सारवणं, त्याआधी झाडलोट, झाडांना पाणी घालणं अशी कामं सुरू असत.’’
तेवढय़ात आजीचे हात म्हणाले, ‘‘जरा आम्हालाही बोलायला ठेव की काही तरी. हे बघ मिने, त्या वेळी आमच्यापाशी यंत्रे नव्हती. त्यामुळे दळण, कांडण, वाटण सारं या हातांनी करावं लागे, सुरेख रांगोळी रेखाटणं, निवडणं, टिपणं, धुणं धुणं सारं सारं आम्ही केलंय. अगं, आजीचे हात-पाय चांगले आहेत ना म्हणूनच या वयालासुद्धा ती गडावरही चढू शकली. पायऱ्या असल्या म्हणून काय झालं? पण दोघेही गड चढले की नाही! कारण तुमच्या आजी-आजोबांनी आम्हा साऱ्या अवयवांवर खूप प्रेम केलं गं! म्हणूनच आम्ही त्यांना साथ देत आहोत, थोडीशी कुरकुर होते खरी! ’’
मग डोळ्यांतले पाणी पुसत पुसत डोळे म्हणाले, ‘‘अगं, मिने, तरुणपणी तुझ्या आजीचे डोळ्यांचं काय वर्णन करू गं? टप्पोरे, पाणीदार आणि बोलके! बारीक.. बारीक.. भरतकाम- निवडणं, टिपणं करून आम्ही थकलो.’’
कान म्हणाले, ‘‘अगं मिने तुझ्या आजीचं लग्न झाल्यावर तिच्या कानात म्हणजे आमच्यामध्ये कायम हिऱ्याच्या, मोती-पोवळ्याच्या, पाचूच्या, माणकांच्या कुडय़ा असायच्या. आताशी आम्हाला नाही पेलवत असे जडजड दागिने!’’
त्याबरोबर आजीचे चाफेकळी नाक म्हणाले, ‘‘हो ना! नाकात हिरे- माणिक- मोत्याची नथ असायची. अगं मिने, तिचे केस तर काय वर्णू? लग्नाच्या आधी लांबसडक वेणी, मग लग्नानंतर खोपा, कधी अंबाडा, त्यावर गजरा तर कधी शेवंतीची वेणी, तर कधी कधी सोन्याचे फूल असायचे. आता रुपेरी चंदेरी केसांचा छोटासा अंबाडा घालते. आजी हुशारही आहे. पावकी-निमकी, पाढे अजूनही तोंडपाठ आहेत बरं! सारे हिशोब तोंडपाठ! कॅलक्युलेटरची कधी गरजच भासली नाही बघ तिला.’’
मिनी एकदम सांगता सांगता भानावर आली आणि आईला म्हणाली, ‘‘आई, हे सारे अवयव खरे बोलले का गं माझ्याशी?’’
‘‘हो गं मिनू, सारं सारं खरं आहे गं! दोघंही कायम आनंदी आणि समाधानी असतात. हेच तर त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे.’’
‘‘आता दादोबा तुमचे स्वप्न सांगा?’’ असं आईनं म्हणताच दादाही पुढे सरसावला. ‘‘अगं आई, माझ्या स्वप्नात आजोबांचे अवयव माझ्याशी बोलले. ते म्हणाले, ‘आज वयाच्या ऐंशीव्या वर्षी थकलो आता. लहानपणी शाळा लांब म्हणून चालत गेलो. कॉलेजला सायकलवरून तर नोकरी लागल्यावर बस, लोकलच्या मागे धावायचो. भाजी मंडई, घरातल्या सामानाच्या जड जड पिशव्या घेऊन पायी पायी यायचो. खूप कष्ट केले रे आम्ही, पण आता तुझे बाबा स्कूटर नाही तर चारचाकीतून फिरवून आणतात आणि दूरदेशीच्या प्रवासाला विमानाने नेतात. बरं वाटतं रे! ’’
तेवढय़ात आजोबांचे कान म्हणाले, ‘‘मोठ्ठय़ानं बोला रे.. आता वय झालं आणि या वाहनांच्या कर्कश आवाजाने ऐकू येत नाही. आम्ही थकलो तशी आजोबांनी कानातली भिकबाळीपण काढून ठेवली. आधीच तुमचे आजोबा तरतरीत त्यातून आमच्या भिकबाळीने ‘दरारा’ दिसायचा. त्यातून कमावलेलं शरीर! भरपूर व्यायाम करायचे. आता फिरायला जातात.’’ तेवढय़ात टीपॉयवर ठेवलेली कवळी एकदमच रडू लागली. सगळे अवयव म्हणाले, ‘‘आता तुला काय झालं गं रडायला?’’ तशी ती म्हणाली, ‘‘आजोबा ऐंशी वर्षांचे आहेत. तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ आहात. मी मात्र शेवटी कृत्रिमच. गरज असली की तोंडात नाही तर बाहेर. तुमचा हेवा वाटतो मला! असू देत. पण काम झाले की आजी- आजोबा आम्हाला ब्रशने स्वच्छ करतात व पुसून स्वच्छ डबीत ठेवतात. केवढं प्रेम करतात ना आजी-आजोबा आपल्या देहावर!’’
‘‘अरे चिंटू, म्हणूनच तर त्यांचे अवयव त्यांना या वयातही साथ देतात. चिंटू-मिनू, तुमच्या आजी- आजोबांच्यातला नियमितपणा व शिस्तीचा आदर करा.. म्हणजे कसा म्हणून काय विचारताय? त्यांच्या तब्येतीचे रहस्य म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य आहार! शरीर धडधाकट असेल ना तर ‘बुद्धी’ही नीट काम करते.’’ सगळे अवयव एकदमच म्हणाले.
दोघांची स्वप्नातील गोष्टी ऐकून घेतल्यावर आई म्हणाली, ‘‘मग चिंटू, मिने.. तुमच्या या स्वप्नातून एक लक्षात येतंय का की, शरीराला योग्य व्यायाम दिला की तब्येतही चांगली राहते. तासन् तास टी.व्ही.समोर बसणं, वाट्टेल ते खाणं हे शरीरासाठी वाईटच. मग काय ठरवलंय?’’
‘‘आई, आम्ही नियमित व्यायाम करणार. योग्य तोच आहार घेणार. नवीन वर्षांचा हाच आमचा संकल्प!’’ दोघंही आनंदाने म्हणाले.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..