घनदाट अशा जंगलात एक ससा राहत होता. तो अतिशय भित्रा होता. हवेने झाडाची झालेली सळसळ, एखादा पक्षी उडाल्याने झालेला आवाज किंवा झाडाचे एखादे पान पडण्याचा अवकाश, की हा ससा घाबरलाच म्हणून समजा. तो घाबरून सुसाट पळतच सुटे. बरं, हा ससोबा एक-दोन दिवस नाही तर वर्षांचा होईस्तोवर घाबरत होता. आता तो चांगलाच मोठा दिसू लागला होता आणि आता सारखं सारखं घाबरण्याचा त्याला स्वत:लाही चांगलाच कंटाळा आला होता.
‘‘मी कोणालाही घाबरत नाही! बघा, बघा मी किंचितही घाबरत नाही आणि सर्व कसं जागच्या जागी आहे!’’ जंगलात तो जोरात ओरडला. त्याच्याभोवती म्हातारे ससे जमले. छोटे पिटुकले ससे पळत आले.. सगळेजण ऐकू लागले ससा कसा फुशारक्या मारतोय ते. लांबुडय़ा कानाचा, तिरळ्या डोळ्यांचा, आखूड शेपटीचा ससोबा काय म्हणतोय हे स्वत:च्या कानांनी ऐकूनही त्यांचा विश्वास बसत नव्हता, कारण आतापर्यंत ससोबा कोणाला घाबरला नाही, असं कधी झालंच नाही.
‘‘ए तिरळ्या, तू लांडग्यालाही घाबरत नाहीस?’’ एकाने त्याला विचारलं.
‘‘होय, लांडग्यालाच काय मी कोल्ह्य़ाला, अस्वलाला आणि कोणाला म्हणजे कोणालाच घाबरत नाही!’’
हे मात्र अगदीच हास्यास्पद होतं. तरूण ससे आपल्या तोंडावर पुढचे दोनही पंजे ठेवून खि-खि करत हसले. म्हातारे प्रेमळ ससे कोणी आपले दात दाखवत तर कोणी दात लपवत, कोणी गालातल्या गालात तर कोणी जोरात मोठय़ानं हसत म्हणाले, ‘‘हे खूपच गमतीदार आहे सशा!’’
‘‘हं, यात काय हसण्यासारखं आहे!’’ ससोबा म्हणाला.
सर्वानाच हे ऐकायला विचित्र आणि गमतीदार वाटत होतं. यामुळे हसता हसता कोणी उडय़ा तर कोणी कोलांटउडय़ा मारू लागले.
‘‘हो, इथे हसण्यासारखं काय आहे?’’ आपला साहसवीर ससा ओरडतच म्हणाला. ‘‘जर लांडग्यानं माझ्यावर झडप घातलीच तर मीच त्याला खाऊन टाकेन.’’
‘‘काय मूर्ख आहे हा ससा.’’ सर्व जण म्हणू लागले.
सशाच्या साहस गप्पांनी सर्वाचं चांगलंच मनोरंजन होत होतं.
सशाला घाबरवण्यासाठी सर्व ससे ‘‘लांडगा-लांडगा इथेच, इथेच आहे तो जवळपास.’’ असं ओरडत सुटले. दुसरीकडे एक भुकेलेला लांडगा खरोखर जंगलात फिरत होता. एकदम त्याच्या मनात आलं, ‘‘जर एखाद्या सशाची मेजवानी आज मिळाली तर!’’ आणि त्याला लांब कुठे तरी ह्य़ा सशांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आता मात्र तो थोडा थांबला, त्याने इकडे तिकडे वास घेतला आणि लपत-छपत तो पुढे-पुढे सरकू लागला. सर्व ससे जोर जोरात हसत होते. लांबुडय़ा कानाचा, तिरळ्या डोळ्यांचा, आखूड शेपटीचा ससा तर जरा जास्तच करत होता.
‘‘ए बंधू, थांब, आत्ता तुला खातो!’’ लांडग्याने मनात विचार केला आणि तो त्या बढाईखोर सशाकडे विशेषत: लक्ष देऊन पाहू लागला. सशांना या लांडग्याच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यामुळे या घाबरट सशाच्या बोलण्यावर सगळेजण पहिल्यासारखेच हसत होते. घाबरट ससा टुणकन उडी मारून एका झाडाच्या खोडावर आपल्या मागील दोन्ही पायांवर बसला आणि जोरात ओरडला, ‘‘ए घाबरटांनो ऐका! माझ्याकडे बघा आणि कान देऊन ऐका! हे बघा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. मी..मी..मी..’’ आता मात्र त्याची चांगलीच बोबडी वळली.
लांडगा त्याच्याकडे पाहत असल्याचे सशाच्या लक्षात आले आणि त्याला श्वास घेणंही कठीण झालं. त्यानंतर मात्र कोणाला काही कळायच्या आत एक विचित्रच गोष्ट घडली. त्या घाबरट सशाने एखाद्या चेंडूसारखी वर उंच हवेत उडी घेऊन, एकदम लांडग्याच्या लांब तोंडावर जाऊन आदळला. परत वरच्यावरच उडी घेऊन त्याने लांडग्याच्या पाठीवर दणका दिला. पुन्हा एकदा हवेतच गर्रकन उसळी घेऊन त्याने लांडग्याला आणखी एक जबरदस्त दणका दिला. स्वत:च्या अंगावरची साल उतरली तरीही चालेल अशा तयारीतच आज जणू काही त्याच्या अंगात आवेश संचारला होता. त्यानंतर मात्र तो बिचारा ससा त्याच्या अंगात त्राण असेपर्यंत जीवानिशी पळत सुटला होता. त्याच्यामागे लांडगाही धावतो आहे आणि आपल्या पंजांनी आत्ता तो त्याला पकडतो की काय, तोंडात घेतो की काय.. असा त्याला भास होत होता. शेवटी जेव्हा अंगातले त्राण संपले तेव्हा बिच्चाऱ्या सशाने डोळे गच्च मिटले आणि मेल्याचे सोंग करत गवतात पडून राहिला. आणि इकडे लांडगा दुसऱ्या दिशेने पळत सुटला. जेव्हा ससा अचानक त्याच्यावर आदळला तेव्हा त्याला वाटले की, कोणी तरी त्याच्यावर गोळीच झाडली आहे. त्यामुळे लांडग्यानेही धूम ठोकली होती. जंगलात काय कमी ससे असतात का? पण हा ससा काही तरी अजबच होता.
हा सारा प्रकार पाहून ससे अचंबित झाले होते. किती तरी वेळ त्यांना काही समजतच नव्हतं. कोणी जवळच असलेल्या बिळात शिरले, कोणी गवतात लपले, तर कोणी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळत सुटले. बऱ्याच वेळानंतर सगळ्यांनाच लपून बसण्याचा कंटाळा आला आणि हळूहळू हिंमत करून, वर डोके करून सर्व जण पाहू लागले.
‘‘आपल्या सशानं लांडग्याला चांगलंच घाबरवलं! ’’ सगळेच आनंदानं ओरडू लागले.
‘‘जर का आपला ससा नसता तर आज आपण जिवंत राहणं शक्यच नव्हतं. कुठे आहे तो आपला ससुल्या?’’ एक जण म्हणाला.
सगळे जण सशाला शोधू लागले, पण तो हिंमतवान ससा कुठेच सापडत नव्हता. त्याला दुसऱ्या कोल्ह्य़ाने तर खाल्ले नाही ना? असे नाही नाही ते विचार सगळ्यांच्या मनात येऊ लागले. आणि शेवटी ससुल्या सापडला तो गवतात. घाबरून तो मरणासन्न अवस्थेत पडला होता.
‘‘उत्तम, ए तिरळ्या!’’ सर्व ससे एका सुरात ओरडले. ‘‘ए, तिरळ्या, मस्त घाबरवलंस हं तू म्हाताऱ्या लांडग्याला. आम्हाला वाटलं की, तू उगाचंच बढाया मारतो आहेस की काय, धन्यवाद, भावा! आम्ही तुझे खूप आभारी आहोत!
(मूळ रशियन कथा)
विद्या स्वर्गे-मदाने vedvidya07@gmail.com

 

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Giraffe has to face many problems while drinking water shocking video
“आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…” जिराफाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल यामागचं कारण
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : भरकटलेल्या युद्धांचा पोरखेळ ..