‘‘आज्जी, आज आमच्या शाळेत ना गंमत झाली. एक कुणीतरी सर आले होते. त्यांनी आमचा वेगळाच गेम घेतला..’’ मल्हार आजीला गंमत सांगत असतानाच त्याच्या वर्गातली शेजारीच राहणारी चार्वीही आली. दोघांनी एकदमच बोलायला सुरुवात केल्यावर आजी म्हणाली, ‘‘एकेकाने सांगा की!’’
‘‘मी आधी.’’- मल्हार.
bal02‘‘आजी, त्या सरांनी क्लासमध्ये प्रत्येकाला जवळ बोलावून एकेक चित्र दाखवलं आणि त्याविषयी पटापट जास्तीत जास्त वाक्यं बोलायला सांगितली.’’
‘‘मला ना स्टेशनचं चित्र दाखवलं!’’ मल्हारचं वाक्य तोडून चार्वी मधेच म्हणाली.
‘‘आधी मी.’’ – मल्हारनं तिला अडवलं.
‘‘आजी, मला ना चौपाटीवरच्या सनसेटचं मस्त पिक्चर दाखवलं. पण या गेमची एक अट होती- संपूर्ण चित्राबद्दल जे काही बोलायचंय ते फक्त आपल्या मातृभाषेतूनच.. म्हणजे आपल्या मराठीतूनच बोलायचं. हिंदी किंवा इंग्लिश शब्द वापरला तर आऊट.’’
‘‘अरे वा! म्हणजे खूपच वेगळा गेम घेतला सरांनी.’’ – आज्जी.
‘‘हो आज्जी. त्या सरांना १३-१४ भाषा बोलता येतात. आणि त्यांनी सांगितलं, की ते एखाद्या भाषेत बोलायला लागले की मग दुसऱ्या कुठल्याही भाषेतील शब्द अजिबात वापरत नाहीत.’’ – मल्हार.
‘‘हो. म्हणजे अगदी शुद्ध भाषा बोलतात ते. आमच्याशीही खूप छान बोलले. आणि आम्हालाही असेच बोलत जा, असं सांगितलं त्यांनी.’’ चार्वीनं अधिक माहिती पुरवली.
‘‘व्वा! मग तुम्हा दोघांनी किती वाक्ये बिनचूक सांगितली? आणि त्याला मार्क वगैरे होते का?’’ – आज्जी.
‘‘आज्जी, मला ना फक्त चारच मरक भेटले.’’ – चार्वी.
‘‘चार्वी, किती वेळा सांगितलंय, की निर्जीव वस्तूला ‘भेटणं’ म्हणायचं नाही. माणसं एकमेकांना ‘भेटतात’ आणि मरक ‘मिळतात’.’’ आजीनं दोन शब्दांवर अधिक जोर देत समजावलं.
‘‘सॉरी आज्जी, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवीन.’’ चार्वी पुटपुटली.
‘‘आज्जी, मला चौपाटीचं पिक्चर दाखवल्यावर सनसेट, बीच वगैरेला पटपट मराठी शब्द आठवलेच नाहीत. मग काय.. पाचच मरक मिळाले मला,’’ मल्हार हिरमुसून म्हणाला.
‘‘पण यावर्षी आमच्या क्लासमध्ये देवगडहून जय नावाचा मुलगा आलाय. खरं तर मला तो बावळट, dumb वाटतो. पण आज मात्र त्या सरांसमोर खूप शायनिंग मारत होता. कारण पूर्ण चित्र त्यानं मराठी शब्द वापरून सांगितलं. आणि मग काय.. त्याला दहा मार्क्‍स मिळाले ना!’’ – इति मल्हार.
‘‘ए, तुला वाटतो तितका काही तो बावळट वगैरे नाहीये हं! आल्यापासून सायन्स आणि मॅथ्ससध्ये तोच फर्स्ट येतोय..’’ चार्वीची वकिली सुरू झाली.
‘‘तसा हुशार असेल गं तो.. पण मॅडमनी काही प्रश्न विचारले किंवा काही डिस्कस करायची वेळ आली की इंग्लिश बोलताना कशी तंतरते त्याची- पाहिलंस का?’’ मल्हार जरा जास्तच फुशारून म्हणाला.
‘‘असू दे.. असू दे.. तुमचा मुद्दा लक्षात आलाय माझ्या.’’ त्यांचा वाद थांबवत आजी म्हणाली, ‘‘तुमच्या संभाषणातून मला काही प्रश्न पडलेत. त्याची उत्तरं द्याल का?’’
‘‘हो.. विचार की!’’ दोघेही एकदम उत्तरले.
‘‘ जय अभ्यासात हुशार आहे. पण त्याला सफाईदार इंग्लिश  बोलता येत नाही म्हणून तुला तो बावळट आणि काय ते, हां.. dumb  वाटतो. हो ना?’’ आजीनं विचारलं. मल्हारनं फक्त मान डोलावली.
‘‘मग मला सांगा- ज्यांना फक्त सफाईदार आणि फाडफाड इंग्लिश बोलता येतं, त्यांनाच फक्त smart आणि हुशार समजायचं का? आपल्याकडेच काय, संपूर्ण जगात अशी लाखो विद्वान माणसे आहेत- ज्यांना इंग्रजीचा गंधही नाही.. म्हणजे इंग्रजी भाषा बोलता येत नाही. आणि काहींना तर समजतही नाही..’’ आजी म्हणाली.
‘‘हो आजी, आम्ही समर व्हेकेशनमध्ये जर्मनीला गेलो होतो नं, तिथे कित्तीतरी जणांना इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि समजतही नव्हतं. काही वेळा आम्हाला तिथं खूप प्रॉब्लेम आला.’’ –  चार्वी.
तोच धागा पकडून आजी म्हणाली, ‘‘हो ना! तरीही जर्मनी या देशानं किती प्रगती केलीय ना? इंग्रजी येत नाही म्हणून आपण त्यांची हुशारी नाकारणार का?’’ दोघांनी नकारार्थी माना डोलावल्या.
‘‘आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हं. जयला फाडफाड इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तू त्याला बावळट समजतोस. त्याची टिंगल करतोस. पण इंग्रजी ही अखेर परकीयच भाषा ना! त्याला त्याची मातृभाषा उत्तम येते की नाही? आता मला मोकळेपणानं सांगा हं, तुम्हाला तुमच्या स्वत:च्या मातृभाषेतून- मराठीतून सलग पाच-सात वाक्येही बोलता येत नाहीत म्हणून जयनंही तुम्हाला बावळट समजून तुमची टिंगल केली तर कसं वाटेल तुम्हाला.. सांगा पाहू?’’
त्यांना विचारात पडलेलं पाहून आजी म्हणाली, ‘‘अरे, मला इतकंच पटवून द्यायचंय, की विशिष्ट भाषा लिहिण्यानं किंवा छान बोलण्यानं माणसाची हुशारी ठरवता येत नाही. खरं तर जगातील कुठलीच भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. सर्वच भाषा छान, सुंदर आहेत. तुमच्या त्या सरांसारख्याच तुम्हीही जास्तीत जास्त भाषा शिका, म्हणजे जगातील छान गोष्टी, नवनवीन माहिती तुम्हाला आपसूकच मिळेल. पण सर्वात आधी आपली मातृभाषा स्पष्ट आणि बिनचूक बोलायला, लिहायला आणि वाचायला शिका. मग पुढच्या स्पर्धेत तुम्हीही मराठी बोलताना अडखळणार नाही.’’
‘‘पण आज्जी, त्यासाठी काय करायचं आम्ही?’’- मल्हार.
‘‘मला एक कल्पना सुचलीय. पटतेय का सांगा.. येत्या २७ फेब्रुवारीला मी तुमच्यासाठी मराठीतील छान छान गोष्टींची, कविता, गाण्यांची, शब्दकोडय़ांची पुस्तके आणीन. तुमचा शाळेचा अभ्यास संपला की ती वाचून काढा. नवनवीन शब्दांचे अर्थ समजून घ्या. एकमेकांशी शब्दांचे खेळ खेळा. कुठे अडचण आली तर मी आहेच समजवायला. तुम्ही मनापासून प्रयत्न केलात तर काहीच कठीण वाटणार नाही.’’ – आजी.
‘‘पण आजी २७ फेब्रुवारीच का?’’ चार्वीची शंका.
‘‘बरा प्रश्न विचारलास! अगं, थोर मराठी साहित्यिक, नाटककार आणि कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारीला जन्मदिवस असतो. आणि तो दिवस मराठी भाषेच्या सन्मानार्थ आपल्याकडे ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. तेव्हा त्यानिमित्तानेच तुम्हा फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या  smart मुलांची मराठी शिकवणी घ्यायची आहे. बोला- आहे तयारी?’’ आजीनं हसत हसत विचारलं.
‘‘पुरे ना आज्जी.. आम्ही तुझ्या मराठी शिकवणीसाठी ‘ready’..  नाही, ‘तयार’ आहोत.’’ मल्हार व चार्वी हसत म्हणाले.
-अलकनंदा पाध्ये