दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण उत्साहाने, आनंदाने गणेशोत्सवाची सुरुवात करतो. उद्याच आपल्याकडे गणरायांचे आगमन घराघरांत होणार आहे.

गणेश पूजा केवळ भारतातच नव्हे, तर  जगाभरातही लोक भक्तीभावाने करीत असतात. अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे १० दिवस अबालवृद्ध गणपतीची पूजा, आरत्या, स्तोत्र, भजन, अथर्वशीर्ष पठण यामध्ये तल्लीन झालेले असतात. गणेश ही देवता विज्ञान, निसर्ग, पर्यावरण, आरोग्य यांचं महत्त्व सांगणारी देवता आहे. आज आपण गणेशाचं वैज्ञानिक रूप जाणून घेणार आहोत.

Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

गणपती हा शंकर-पार्वती यांचा मुलगा आहे. गणपतीला हत्तीचे मस्तक चिकटविले आहे. म्हणून त्याला गजानन, गजमुख, गजवदन असेही म्हणतात. हत्ती हा प्राणी बुद्धिमान आहे. श्रीगणेशसुद्धा बुद्धीची देवता आहे. म्हणूनच आपण गणेशाला ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ असं म्हणतो. गणपती ज्ञानदेवता असल्याने आपण तिचे सतत स्मरण करतो. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनानेच करण्याची आपली प्रथा आहे.

आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतीची कामं पूर्ण झालेली असतात. भाद्रपद चतुर्थीला शेतातलीच माती घेऊन त्याचा गणपती बनवून त्याची पूजा करावी, असं आपल्या प्राचीन ऋ षीमुनींनी सांगितलं आहे. ओंकार स्वरूप गणपती म्हणजे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे तत्त्व आहे. पृथ्वी आपलं भरणपोषण करते. आपल्याला संपन्नता देते. या पृथ्वीविषयी म्हणजे मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करावी असे सांगितले आहे. म्हणून गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीचीच असावी. काही लोक प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठय़ा मूर्ती करतात. थर्मोकोलची मखरे करतात. पण पाण्यात विसर्जन केल्यानंतर या मूर्ती, मखरं पाण्यात विरघळत नाहीत. मग नदीत, तलावात तो गाळ साचून राहतो. पावसाळ्यात थोडय़ाशा पावसानेही मग पूरसदृश स्थिती निर्माण होण्यासाठी ते एक कारण ठरते. म्हणून कोणाचीही कसलीही हानी होऊ नये यासाठी कृत्रिम तलावात या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे.

गणेशाची पूजा एकाग्रमनाने मनोभावे करावी. पूजा केल्याने ती करणाऱ्यात चांगला बदल झाला पाहिजे. आपले दुर्गुण कमी झाले पाहिजेत. गुण वाढले पाहिजेत. या हेतूनेच गणेशाची प्रार्थना करावी.

गणेशाला लांब सोंड असते. सोंड म्हणजे त्याचं नाक. दूरवरचा सुगंध समर्थपणे घेण्याची क्षमता या लांब नाकात असते. पुढे घडणाऱ्या घटनांचे सूचन या नाकामुळे होत असते.

गणेशाचे डोळेही बारीक असतात. सूक्ष्म आणि दीर्घ दृष्टीची प्रेरणा देणारे हे डोळे आपल्याला दूरदर्शी वृत्तीचीच देणगी देत असतात.

गणेशाचे कान सुपासारखे लांब असतात. लांब कान उत्तम श्रवण करण्याचे द्योतक आहेत. सूप फोलकटं टाकतं आणि टपोरे टपोरे स्वच्छ दाणे जवळ घेतं. आपणही गणेशासारखंच फक्त चांगलं तेच कानांनी ऐकून सार ग्रहण करायला शिकलं पाहिजे.

गणेशाला लंबोदर म्हणतात. ऐकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी तो पोटात साठवून ठेवतो.

गणेशाच्या चार हातांपैकी एका हातात अंकुश असतो. दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथा हात प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देत असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंवर संयम ठेवण्यासाठी अंकुश नेहमी प्रयत्न करतो. पाश इंद्रियांनाही शिक्षा करतो आणि शत्रूंनाही शिक्षा देतो. एका हाताने मोदक खातो. आणि एका हाताने प्रसन्न मनाने भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही भरभरून देत असतो.

गणेशाचे पाय लहान असतात. पोट म्हणजे शरीर मोठं असतं म्हणून तो वेगाने धावू शकत नाही. कोणतेही काम घाईगर्दीने उतावीळपणे करू नये. घिसाडघाईने केलेले काम यशस्वी होतेच असे नाही. म्हणून निश्चित प्रगती साधण्यासाठी हळूहळू, पण यशस्वी व्हावे हेच यातून सूचित होत असते.

उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. उंदीर मायेचे, प्रलोभनांचे प्रतीक आहे. या सर्वानाच गणेश आपल्या नियंत्रणात ठेवतो. आपणसुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त असलेली सारी प्रलोभनं नियंत्रणात ठेवली पाहिजेत. तरच आपलं ध्येय आपल्याला गाठता येईल.

गणपतीला ‘मोदक’ प्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद देणारे मोदक भक्तजनांनाही आवडतात. खारीक, खोबरे, खसखस, खडीसाखर आणि खिसमिस हे पाच पदार्थ घालून एकत्र केलेले पंचखाद्य गणपतीला विशेष प्रिय आहे. हा पंचखाद्याचा नैवेद्य पौष्टिक  असतो. आरोग्यवर्धकही असतो.

गणपती बुद्धिमान आहे. चतुर आहे. कार्तिकेय आणि गणेशाच्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणेशाने आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून येणाऱ्या कार्तिकेयाच्या कितीतरी अगोदर येऊन गणेशाने शर्यत जिंकली. आईवडिलांच्या सेवेसाठी गणेश त्यांच्या अवतीभवती राहिला. आपणही आपल्या आईवडिलांची त्यांच्या वार्धक्यात सेवा केली पाहिजे.

गणपतीला दुर्वा प्रिय आहेत. दुर्वा शरीराचा दाह शांत करणाऱ्या आहेत. गणेशाला मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोतरा, तुळस, कव्हेर, शमी, आघाडा, डोरली, रुई, अर्जुन, विष्णुक्रान्ता, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्ती अशी एकवीस प्रकारच्या वनस्पतींची पानं म्हणजे पत्री प्रिय आहेत. म्हणून ही पत्री वाहिली जाते. गणेशाला आवडतात म्हणून तरी लोक यातल्या काही वनस्पतींची आपल्या परिसरात लागवड करतात. त्यांना वाढवितात. या सगळ्या वनस्पती औषधी आहेत. आपल्या आरोग्यासाठी या उपयुक्त आहेतच. पण पर्यावरणाचा समतोल राखायलाही या मदत करतात.

शरीराच्या आरोग्याएवढंच मनाच्या आरोग्याचंही महत्त्व आहे. घरोघरी आरास, आरत्या, भजनं, अथर्वशीर्ष पठण, प्रबोधन-मनोरंजनाचे सार्वजनिक गणपतीसमोरील कार्यक्रम, नातेवाईक, पाहुणेमंडळी, मित्रमैत्रिणींचे हास्यविनोद या सगळ्या मौजमजेमध्ये गणपतीचे दिवस खूप आनंद देतात. पुन्हा नव्या कार्याला उत्साह, ऊर्जा देतात. आणि यातच विसर्जनाचा दिवस उजाडतो. गणेशाचं विसर्जन मनाला हुरहुर लावते. घरचाच माणूस परगावी जातो असं वाटतं आणि म्हणून मग पुन:पुन्हा ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशा विनवण्या करत बाप्पाचं विसर्जन केलं जातं.

पण हा उत्सव साजरा करताना आणि विसर्जन करतानाही आपण सगळ्यांनीच जागरूक राहिलं पाहिजे. कर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावून वृद्धांना, लहानग्यांना, आजारी व्यक्तींना आणि सर्वच नागरिकांना आपल्याकडून त्रास होत नाही ना? कृत्रिम रंग, फटाके यांचा वापर करून विषारी घातक द्रव्ये हवेत पसरविली जात नाहीत ना? निर्माल्य इकडे तिकडे न टाकता ते निर्माल्य कलशातच ठेवले जात आहे ना? आपली गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करून स्वयंशिस्तीचं पालन आपल्याकडून होत आहे ना? या सगळ्याची काळजी आपण घेतली आणि ‘गपणती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असं म्हणत गणेशाचं विसर्जन केलं तर आपल्या या सणाचा आनंद आपण अनेकानेक वर्षे घेऊच. पण आपल्या पुढच्या अनेक पिढय़ांनासुद्धा हा निर्भेळ आनंद घेता येईल.

मेधा सोमण