दोस्तांनो, सध्या तुमचा सुट्टीचा धमाल महिना सुरू आहे ना! मज्जाच मज्जा आहे ना तुमची. मग सुट्टी एन्जॉय करताय की नाही? नो स्कूल, नो होमवर्क, नो एनी टेन्शन.. अशी धमाल चाललीय ना! तुमच्या या आनंदात थोडीशी भर घालावी आणि घरातल्या मोठ्ठयांकडून शाबासकी मिळावी असं घडलं तर? काय आवडला हा विचार! खूपच आवडलेला दिसतोय. तुमच्या खुललेल्या चेहऱ्यावरून लक्षात येतंय ना ते. मग त्यासाठीच काही टिप्स बरं का!
तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरूनच घरातल्या मोठय़ांकडून शाबासकी मिळवू शकता. हो, हो, सावकाशीने ऐका, घाई करू नका. यात हीच तर गंमत आहे. घाई करायची नाही. नाहीतर सगळ्यांचाच बोऱ्या वाजेल. ही कल्पनाशक्ती तुम्ही हॉलमधल्या वस्तूंच्या मांडणीत वापरू शकता. आधी विचार करून हॉलची मांडणी छानशी बदलून सर्वाना सुखद धक्का देऊ शकता. घरात आई, आजी यांची छोटी छोटी कामं सोपी करण्यासाठी काही नवीन युक्ती शोधून काढू शकता. ही कामं म्हणजे- भाजी धुऊन देणे, कपडे वाळत घालणे, कपडय़ांच्या घडय़ा घालणे.. ही कामं तुम्ही नक्कीच करू शकता. मी अजून लहान आहे, असं कारण सांगू नका. कारण कल्पनाशक्तीसाठी कोणी लहान-मोठं नसतं बरं का!
प्रवीण सातवीत असताना सुट्टीमध्ये आमच्या घरी आला होता. आमच्या घराच्या स्वयंपाकघरातून अंगणात कोणी आलेलं दिसत नाही म्हणून स्वयंपाकघराच्या भिंतीला खिडकी पाडायची हे अगदी पक्कं झालं होतं. पण तो म्हणाला, ‘भिंत कशाला फोडताय. इथे खिडकीत आरसा लावला तर दिसेल की अंगणातलं.’ आणि खरंच आरशाने काम सोप्पं झालं. आम्हा मोठय़ांना कठीण वाटणारं कोडं त्यानं झटक्यात सोडवलं. मग, तुम्हीही असा प्रयत्न करणार ना! संयमाने प्रयत्न तर करा. यश नक्की मिळणारच.
मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com